विश्वास पाटील
साहित्य विश्वातल्या पायरसीबद्दल तुम्ही पुढे येऊन पोलिसात तक्रार नोंदवलीत शेवटी...
शेकडो लोकप्रिय पुस्तकांची पीडीएफ एकगठ्ठा फॉर्वर्ड होत आहे, हे माहिती असूनही दोन महिन्यांमध्ये एकही प्रकाशक हिमतीनं तक्रार करत नाही, म्हणून मीच तक्रार करण्याचा निर्णय घेतला. असा गुन्हा सिद्ध झाला की, सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आहे. आम्ही सज्जड पुरावे दिले आहेत. सिनेमा पायरसीची प्रकरणं पोलिसांनी खणून काढल्यामुळे बंद होऊ शकली आहेत. हे सगळं सुखासुखी होत नसतं. इतरवेळा आपण पुस्तकातून नेताजींच्या, पानिपतच्या गोष्टी सांगणार आणि या चिलटांना घाबरणार, असं कसं चालेल? साहित्यकृतींच्या पीडीएफ बेकायदेशीर प्रसारित होण्याचं दुखणं मोठ्या प्रकाशकांचं आहे असा समज होता. आता पायरसीवाल्यांनी सगळ्या धार्मिक पुस्तकांवर डल्ला मारलाय. धार्मिक पुस्तकं जर सगळीकडं ‘अशीच’ मिळाली तर निम्मा प्रकाशन व्यवसाय बंद पडेल. यावर आवाज उठवायला नको?
या गंभीर विषयाबद्दल लेखक-प्रकाशक दोघेही सारखेच संथ व निष्क्रिय दिसतात... का?
शिवाजी दुसऱ्याच्याच घरात जन्माला येऊ दे व आपल्या पोरानं बँकेत नोकरी करू दे, हीच वृत्ती सगळीकडे! कुणाला कसलीच जोखीम घ्यायलाच नको असते. पुस्तकांच्या पायरसीविरोधात पुढाकार घेऊन मी रितसर तक्रार नोंदवण्याचं ठरवल्यावर सुनील मेहतांसारखा प्रकाशक उघडपणानं माझ्यासोबत उभा राहिला. महेश केळुसकर, अशोक बागवे, व्यंकट पाटील असे बरेच जुने-नवे कवी, लेखक सामील झाले. पोलिसांकडून आता मोठ्या कारवाईला सुरूवात झाली आहे. बनावट पुस्तकं कुठून, कशी जात राहिली, याचा प्रत्येक धागा ते शोधून काढत आहेत. पायरसी म्हणजे बनावटी पुस्तकांची छपाई-विक्री आणि पीडीएफ फॉरवर्ड करणं हा रोग आहे. विशेषत: पुस्तकांच्या पीडीएफबाबतीत, ती मिळणं हा आपला हक्कच आहे, असं लोकांना वाटायला लागलंय. ‘एक होता कार्व्हर’च्या लेखिका वीणा गवाणकर म्हणाल्या, ‘लोक निर्लज्जपणे मलाच फोन करतात, की मॅडम तुमच्या पुस्तकाची पीडीएफ मिळेल का?’ - हा गुन्हा आहे, कायद्याचा भंग आहे, हे लोकांना कळतच नाही. लेखन हे सर्जनशील काम आहे, ते असं फुकट प्रसारित होतं, तेव्हा त्यात सामील असणाऱ्या सगळ्यांचं नुकसान होतं, अवमानही होतो. या अवमानाची मर्यादाही कुठंवर पोहोचलेय बघा, संकेतस्थळांवरून फिरणाऱ्या पाचशेपाचशे पानी पुस्तकाची त्यांनी तेहतीस पानी बुकलेट काढून जाहिरात केली आहे व बुकलेटच्या शेवटच्या पानावर ‘ही लिंक तुम्ही सगळ्या मित्रांना, वाचकांना पाठवा’ असं आवाहन केलं आहे. म्हणजे जणू ‘आम्ही गुन्हा करतोय, तुम्हीही सामील व्हा. सगळे मिळून गुन्हा करू या!’
लेखकाची रॉयल्टी सन्मानानं मिळत नाही असंही तुम्ही जाहीरपणानं व्यक्त केलं आहे....?
एकूणात सर्व भाषांमध्ये लेखकाला रॉयल्टी द्यायची नसते असाच गैरसमज आहे, विशेषत: प्रकाशकांचा. मराठीतही अनेक मोठे प्रकाशक आहेत जे अजिबात रॉयल्टी देत नाहीत. माझा अनुभव चांगला आहे. ‘सपना बुक स्टॉल’ या कर्नाटकातल्या प्रकाशन संस्थेनं २००१ साली भैरप्पांच्या हस्ते माझी ‘महानायक’ कादंबरी प्रकाशित केली. कार्यक्रमात पहिल्या प्रतीसोबत प्रकाशकांनी लिफाफ्यात रॉयल्टीचा चेक घालून दिला. मला वाटलं टोकन म्हणून पाचेक हजार दिले असतील. हॉटेलवर जाऊन पाहिलं तर पन्नास हजारांचा चेक होता. मी म्हटलं, हे कसं परवडतं? त्यावर ते म्हणाले, आम्ही बायंडरला थांबवू शकतो का? कागदवाल्याला थांबवू शकतो का? मग लेखकानंच काय घोडं मारलंय? - दुर्दैवानं ही परिस्थिती सगळीकडं नाही.
मराठी प्रकाशनव्यवसाय मंदीत आहे. लोकप्रिय लेखकही केवळ लेखनाच्या बळावर जगणं मुश्किल आहे म्हणतात. पण प्रकाशक मात्र बुडित गेल्याचं दिसत नाही. या मागचं गणित काय?
- तुम्हीच समजून घ्या हा बोलका प्रकार. तुमच्या दुकानांची संख्या वाढत असेल, मकानांची संख्या वाढत असेल तरीही धंदा परवडतच नाही, असा जप तुम्ही करत असाल तर ती मोठीच विसंगती नव्हे का? माझ्या ओळखीतल्या काही लेखकांनी खंडच्या खंड लिहिले आहेत, प्रकाशकांनी छापलेलेही आहेत. त्यांना अजिबात पैसे मिळालेले नाहीत. त्यांना मी विचारतो, का असं सहन करता? ते म्हणतात, ‘काहीच न होण्यापेक्षा निदान छापील स्वरूपात काम तर समोर आलं; हेच आम्ही जीवनाचं समाधान मानून घेतो.’ - दुर्दैवानं लेखकांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो. अशा वातावरणात मग पायरसी फोफावते तेव्हा ग्रंथनिर्मितीच्या एकूण साखळ्यांमध्ये गंभीरता हरवल्यामुळे गैरधंदा करणाऱ्यांचा लाभ होतो. बनावट पुस्तकं काढणाऱ्या प्रकाशकाला इन्कम टॅक्स भरायचा नसतो, लेखकाला मानधन द्यायचं नसतं, त्या मानधनावरचा करही भरायचा नसतो. सगळा फुकटा कारभार! म्हणून नवे असोत, की लोकप्रिय लेखक असोत त्यांच्या पुस्तकांची लगेच पायरसी होते. ग्रंथव्यवहाराच्या संस्कृतीला खीळ बसायला नको असेल तर अशा गुन्हेगारांचा गळा कायद्याच्या माध्यमातून लगेच आवळावा लागेल आणि हेही लक्षात घ्यावं लागेल, की पीडीएफ पुस्तकं आपण फॉरवर्ड करतो तेव्हा आपणही गुन्ह्यात सामील असतो.
मुलाखत : सोनाली नवांगुळ