ब्राझीलमधील रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय स्पर्धकांचा संच एकेक करुन परतला आहे. जे विजयी होऊन आले (यांची संख्या मोजायला एका हाताची बोटेदेखील जास्ती होतात) त्यांचे भव्य स्वागत होते आहे आणि ज्यांच्या पदरी निराशा पडली ते सारे ‘अनसंग हिरो’ गुपचूप आपापल्या घरी निघून गेले आहेत. या स्पर्धेचा जमाखर्च मांडायचा झाला तर दोन पदके, प्रचंड निराशा वा भ्रमनिरास आणि भली मोठी अप्रतिष्ठा वा बेअब्रू असाच मांडावा लागेल. स्पर्धेत पदक प्राप्त केलेल्या सिंधू आणि साक्षी या मुलींसह पदकांपासून वंचित राहिलेल्या पण ज्यांची कामगिरी पदकास स्पर्श करण्याइतपत चांगली राहिली अशा आणखी एका मुलीस व एका मुलग्यास केन्द्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. बॅडमिंन्टनच्या महिला एकेरी स्पर्धेचे रौप्य पदक प्राप्त केलेल्या सिंधूला तर कुठे ठेऊ आणि कुठे नको असे साऱ्यांनाच झाले असल्याने ‘यशाला अनेक बाप असतात पण अपयश पोरके असते’ या म्हणीची कोणालाही आठवण होऊन जाईल. अडथळ्याच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठणाऱ्या ललिता बाबर या महाराष्ट्र कन्येला शासकीय सेवेत सामावून घेण्याची घोेषणा इकडे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारी व्याख्येत घोषणा आणि वास्तव यात किती कमी किंवा किती अधिक अंतर असते आणि आॅलिम्पिकमधील अडथळ्याची शर्यत आणि सरकारी अडथळ्याची शर्यत यात कोणती शर्यत अधिक अवघड असते याचा प्रत्यय ललिताला अनायासेच येऊन जाईल. मात्र त्यासाठी तिला एक करावे लागेल. ‘मुख्यमंत्र्यांना एसीत बसून घोषणा करायला काय जाते, इथे जबाबदारी आमची असते, त्यामुळे सर्व पूर्तता केलीत तरच तुमच्या नस्तीचा पुढील प्रवास सुरु होईल’ हे करारी उद्गार ऐकण्याची तयारी ठेवावी लागेल. जमाखर्चातील पुढची बाब म्हणजे संपूर्ण देशाची झालेली बेअब्रू आणि अप्रतिष्ठा. मल्लविद्येच्या स्पर्धेतील नरसिंग यादव या मराठी मल्लाच्या आॅलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश या बेअब्रूचा कारक ठरला आहे. प्रत्येकच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने कृत्रिम ताकद वा सोशीकपणा प्रदान करणाऱ्या उत्तेजक किंवा अंमली पदार्थांचे सेवन करण्यावर निर्बन्ध आहेत. तसे कोणी करीत नाही वा केलेले नाही हे अत्यंत काटेकोरपणे तपासण्याची एक विशिष्ट पद्धतदेखील आहे. अशा तपासणीमध्ये नरसिंग यादव दोषी आढळला होता. त्यावर त्याने आपणहून उत्तेजक पदार्थांचे सेवन केले नव्हते तर घातपात करुन त्याला ते दिले गेले, असा युक्तिवाद केला गेला. तो राष्ट्रीय स्तरावरील अंमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेने स्वीकारला आणि नरसिंग रिओला रवाना झाला. पण हा दावा जागतिक पातळीवरील संस्थेने आणि नरसिंगच्या युक्तिवादावर विचार केलेल्या आंतरराष्ट्रीय लवादाने साफ फेटाळून लावला. लवादाने घातपाताचा युक्तिवाद तर धुडकावूनच लावला. त्यातून झाले काय की, आमच्या देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झालेले खेळाडूही सुरक्षित नाहीत अशी नामुष्कीची कबुली भारतानेच स्वमुखे जगासमोर दिली आणि लवादाने तीदेखील धुडकावल्याने भारताने यात लबाडी केली असा शिक्का मारुन घेतला. भारताला स्वातंत्र्य देण्यास खळखळ करणारे ब्रिटिश राज्यकर्ते भारताला उद्देशून ‘इंडिया ईज अ कन्ट्री आॅफ चीटर्स’ (भारत हा अप्रामाणिक लोकांचा देश आहे) असे जे काही कुशेषण वापरीत असत ते एकप्रकारे सप्रमाण सिद्धच करुन दाखविले गेले. या प्रकारात नरसिंगच्या हातून रिओ आॅलिम्पिक स्पर्धा तर गेलीच पण त्याच्यावर चार वर्षांची बंदी लागू करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून तो कायमचाच बाद झाला. दरम्यान नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेल्या दत्तू भोकनळ या जवानाने आपल्या अपयशाबद्दल खंत व्यक्त करताना, स्पर्धेत उतरण्यासाठी जो सराव आणि अन्य बाबी आवश्यक होत्या, त्यापैकी सरकारने काहीही उपलब्ध करुन न दिल्याचे म्हटले आहे. नेमबाजीसारख्या क्रीडा प्रकारातही संबंधितांची खंत हीच आणि अशीच असते. रिओ स्पर्धेचे सूप वाजण्यापूर्वीच तिथे जमलेले चिनी प्रशिक्षक टोकियोत भरणाऱ्या पुढील आॅलिम्पिक स्पर्धेच्या कसे तयारीला लागले आहेत याची केवळ वर्णनेच भारताने वाचायची असतात. कारण चीन ज्या पद्धतीने अगदी कोवळ्या वयातील मुला-मुलींकडून कष्ट करवून घेऊन त्यांना स्पर्धेत उतरविण्यासाठी तयार करतात तसे करण्याचा विचार चुकून उद्या भारतात कुणाच्या मनात आलाच (शक्यता तशी शून्यच) तर मानवाधिकारवाले आणि बालशोषण विरोधवाले पुढे सरसावणार नाहीतच याची खात्री नाही. काहीही न करता आयते आणि विनासायास सारे मिळाले पाहिजे हा देशाचा एकूणच स्थायी स्वभाव बनलेला असल्याने काही दिवस रिओची चर्चा, सत्कार, हळहळ आणि उसासे होत राहातील व त्यानंतर चार वर्ष म्हणजे टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धा उंबऱ्यापाशी येईपर्यंत अळीमिळी, गुपचिळी!
आता चार वर्ष अळीमिळी....!
By admin | Published: August 24, 2016 6:34 AM