अण्णा हजा-यांनी जवळ केलेली सारी माणसे यथावकाश काँग्रेस पक्षाच्या विरोधात गेली. त्यांच्यातल्या काही धाडसवाल्यांनी अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष जवळचा केला, तर समजूतदारांनी सत्तेवर असलेल्या भाजपामध्ये जाणे पसंत केले. केजरीवालांचा पक्ष दिल्लीच्या विधानसभेची निवडणूक लढला, सत्तेत आला आणि स्वत:हून पायउतार झाला. केजरीवाल हे त्यामुळे बेभरवशाचे नेतृत्व ठरले. ते तसे असल्याची पूर्वकल्पना असणाऱ्या शहाण्यांनी त्यांच्याविषयी सहानुभूती दाखविली; मात्र त्यांच्यासोबत जाणे टाळले. अशा शहाण्या पुढाऱ्यांत किरण बेदींचा समावेश आहे. दीर्घकाळ वाट पाहून आणि लाभशुभाचा विचार करून त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जाणकारांच्या मते त्या भाजपाच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार आहेत. देशातली पहिली आयपीएस अधिकारी म्हणून त्या ख्यातिप्राप्त आहेत. अनेक साहसी कामांनी त्यांना नंतरही मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे. तिहार तुरुंगाच्या प्रमुख पदावर असताना, त्या तुरुंगात अनेक चांगल्या सुधारणा घडवून आणल्याची एक महत्त्वाची नोंदही त्यांच्या नावावर आहे. मात्र या प्रसिद्धीनेच त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. आपण फार स्वच्छ व शुद्ध आहोत आणि बाकीची माणसे बऱ्यापैकी भ्रष्ट व अस्वच्छ आहेत असा स्वत:चा समज करून घेतलेली काही माणसे समाजात असतात. किरण बेदी त्यातल्या आहेत. त्यांच्या सुदैवाने अण्णा हजाऱ्यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन नेमक्या वेळी त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्याने किरणबार्इंना एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. मग त्यांच्या व्याख्यान-प्रवचनांचा धडाका सुरू झाला. समाजाला सद्वर्तन सांग, नीतीचा उपदेश कर आणि सारा देश भ्रष्टाचाराच्या गर्तेत कसा बुडाला आहे याच्या रुचकर कथा सांग, असे करण्याची संधीच मग त्यांना मिळाली. अण्णा हजारे उपोषण करीत राहतील आणि त्यात दीर्घकाळ खंड पडणार नाही, याचीही काळजी त्या काळात बार्इंनी घेतली. तेव्हाचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे अण्णांची समजूत घालायला जंतरमंतरवर गेले तेव्हा त्यांची बार्इंनी यथेच्छ नालस्ती तर केलीच; शिवाय ते कसे ‘भीतभीत’ आले आणि ‘भीतभीतच’ गेले त्याच्या नकलाही तेथे जमलेल्या लोकांसमोर त्यांनी करून दाखविल्या. अण्णांच्या आंदोलनाला नको तेवढे खतपाणी घालणाऱ्या माध्यमांनी बार्इंच्या त्या नौटंकीचीही तेव्हा बरीच भलावण केली. पुढे अण्णांचे आंदोलन विखुरले आणि रामदेवबाबांचे आंदोलन उधळले, तेव्हा बाईच्या वाट्याला राजकीय बेकारी आली. देशाचा उद्धार करण्याची आपली क्षमता वाया जात असल्याच्या चिंतेनेच मग त्या बेजार झाल्या. तरी देशात त्यांच्या समाजसेवी म्हणविणाऱ्या एनआरआय (म्हणजे विदेशी पैशावर स्वदेशी सेवा करणाऱ्या) संस्था आहेत. त्यांची मिळकतही भरपूर आहे. शिवाय एकाच प्रवासाची दोनदा बिले काढण्याची बार्इंना सवय आहे. तिसऱ्या वर्गाने प्रवास करायचा आणि पहिल्या श्रेणीचे बिल आयोजकांकडून वसूल करायचे याचाही त्यांना मोठा सराव आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची कहाणी एका राष्ट्रीय दैनिकानेच त्या काळात सप्रमाण प्रकाशित केली होती. अण्णांचे आंदोलन गेले, रामदेवबाबांचे निकालात निघाले व पुढे केंद्रातले डॉ. मनमोहनसिंगांचे सरकारही इतिहासजमा झाले. त्याची जागा नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने घेतली. किरण बेदी या दीर्घकाळ शासकीय सेवेत राहिल्या असल्याने त्यांना कोणताही पक्ष जवळचा वा दूरचा नव्हता. शिवाय त्या सेक्युलर वगैरे असल्याचे फारसे चर्चेतही कधी नव्हते. स्वच्छ भारत आणि भ्रष्टाचारमुक्त देश ही नरेंद्र मोदींची घोषणा बार्इंना भावणारीही होती. त्यामुळे त्यांचा पक्ष जवळ करणे त्यांना जमणारेही होते. काँग्रेसच्या राजवटीत त्यांच्या वाट्याला दिल्लीचे पोलीस प्रमुखपद आले नसल्याचा एक रागही त्यांच्या मनात होता. साऱ्याच गोष्टी अशा जुळून आल्याने बाईंनी काही काळ विचार करून भाजपात प्रवेश केला आणि आपल्याला असलेली राजकारणाविषयीची आस्था पूर्ण करून घेतली. दिल्लीत होणारा निवडणूक सामना प्रामुख्याने भाजपा व केजरीवालांचा आम आदमी पक्ष यात होणार आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत तेथे भाजपाला ३१, तर आम आदमी पक्षाला २८ जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षाला आठ जागांवर समाधान मानावे लागले. त्या निवडणुकीपासून आतापर्यंत देशाच्या व दिल्लीच्याही राजकारणात फारसा फरक झाला नाही. त्यामुळे येणारी निवडणूकही विधानसभेत कोणत्या एका पक्षाला बहुमत मिळवून देईल याची शक्यता कमी आहे. मात्र भाजपाने पंतप्रधानांपासून पक्षाध्यक्षांपर्यंतची आपली सारी ताकद त्या निवडणुकीत आजच उतरविली आहे. अरविंद केजरीवाल आपल्या पक्षासाठी निधी जमा करण्याच्या आणि त्यासाठी मोठाल्या जेवणावळी उठविण्याच्या प्रयत्नात आहेत. किरण बेदींची खरी अडचण त्यांनी एकेकाळी ज्यांच्या झेंड्याखाली भ्रष्टाचारविरोधाचे आंदोलन चालविले त्या केजरीवालांशी लढत देण्याची आहे. केजरीवाल आणि बेदी हे दोघेही लढवय्ये म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे दोन पुढारी एकमेकांविरुद्ध कसे लढतात हे या निवडणुकीत दिसायचे आहे.
कालचे मित्र आजचे शत्रू...
By admin | Published: January 19, 2015 1:24 AM