काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील स्नायूंची ठेवणच अशी असते की जिच्यापायी अशा व्यक्ती सदा हसतमुखच असतात किंवा दिसतात तरी तशा. अकराव्या लोकसभेचे सभापती पूर्णो अजिटोक संगमा हे याचे ठळक उदाहरण. मेघालयासारख्या दुर्गम भागात जनप्रतिनिधित्व करीत नऊ वेळा लोकसभेत दाखल होण्याचा आणि त्याच्या आगेमागे मेघालयाचे मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते आणि केन्द्रात मंत्री अशी विविध पदे धारण करण्याचा मान त्यांच्या नावावर आजही रूजू आहे. नव्वदच्या दशकात स्थायी स्वरुपातील लोकसभा दिवास्वप्न वाटावे अशी चमत्कारिक स्थिती देशात निर्माण झालेली असताना संगमा यांना लोकसभेचे सभापतीपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली खरी पण उणेपुरे दोन वर्षांचाच काळ त्यांना मिळाला. परंतु तरीही त्यांची या अल्प काळातील कारकीर्दही संस्मरणीय ठरली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बलाबलात फारच थोडा फरक असतो तेव्हां सभागृह चालविणे अधिकच कठीण असते. पण संगमा यांनी ते करुन दाखविले, ते त्यांच्या मिठ्ठास वाणीच्या मदतीने. ते मूलत: काँग्रेस कार्यकर्ते. युवक काँग्रेसपासून त्यांचा काँग्रेस प्रवास सुरु झाला. दुर्गम भागातील एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून असेल वा अन्य कारणांनी असेल काँग्रेसनेदेखील त्यांना भरभरुन दिले. परंतु केन्द्रातील रालोआची याआधीची सत्ता संपुष्टात आल्यानंतर आणि काँग्रेसला अन्य पक्षांसोबत आघाडी करुन का होईना सत्ता स्थापन करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर सोनिया गांधी याच पंतप्रधान होतील असे गृहीत धरुन काँग्रेसमधील जी मंडळी अस्वस्थ झाली होती, त्यांचे म्होरकेपण करणाऱ्या शरद पवार, आणि तारीक अन्वर यांच्यासोबत पूर्णो संगमाही होते. तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तिघा नेत्यांच्या मनात बहुधा त्यावेळी स्वत:च्या लोकप्रियतेविषयी अफाट कल्पना असाव्यात. या कल्पनेपायीच मग संगमा यांनी भाजपातर्फे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणब मुखर्जी यांच्या विरुद्ध आपली उमेदवारी पुढे रेटली. ही बाब शरद पवारांना रुचली नाही कारण काळाची पावले ओळखून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सावरुन धरण्यासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली होती. तितकी राजकीय चतुराई संंगमांपाशी नसावी. परिणामी पवारांनी संगमांना पक्षातून डच्चू दिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संगमा पराभूत होणारच होते व तसे ते झालेदेखील. तेथेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची गाडी उताराला लागली. काही काळ त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये एक फेरी मारुन नंतर स्वत:चा वेगळा पक्षदेखील काढून पाहिला, पण त्यांचे राजकीय पुनर्वसन काही होऊ शकले नाही. संपुआच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची कन्या अगाथा संगमा केन्द्रात राज्यमंत्री झाली व तितकेच समाधान पित्याला मिळू शकले. पण आता संगमा यांच्या निधनाने हे सारे इतिहासजमा झाले आहे.
‘पूर्ण’हास्य मावळले
By admin | Published: March 05, 2016 3:23 AM