- संदीप प्रधान
(पुण्यात बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. यावेळी राज यांनी ‘रॅपिड फायर राऊंड’मध्ये पवार यांना काही प्रश्न विचारले व त्याला त्यांनी उत्तरे दिली. राज यांचा शेवटचा प्रश्न ‘राज की उद्धव’ हा होता व त्याला उत्तर देताना पवार यांनी ‘ठाकरे कुटुंबीय’, असे मार्मिक उत्तर दिले. परंतु राज यांनी याकरिता आणखी काही प्रश्न काढले होते. मात्र ते कागद त्यांच्या पॅडमधून हरवले की काढून घेतले गेले ते (फुटाणे जाणो) मात्र ते कागद एका कोपºयात पडलेले सापडले. तोपर्यंत कार्यक्रम संपून पांगापांग झाली होती. त्यानंतर खासगी मैफिलीत राज यांची पवारांवर ‘रॅपिड फायर राऊंड’ पुन्हा सुरू झाली. त्याचे अर्थातच फार थोडे साक्षीदार होते...)
राज : बरं का... बरं का... मघाशी हरवलेले माझे काही कागद सापडल्येत विचारू का प्रश्न?पवार : अजून तुमचं पोट नाही का भरलं? चला विचारून टाका. होऊन जाऊ द्या तुमचं समाधान.राज : साहेब, बारामती की लवासा?पवार : शिवाजी पार्क... तेथे चांगली मोकळी जागा आहे. (गालातल्या गालात हसतात)राज : हेमंत टकले की जितेंद्र आव्हाड ?पवार : मी नाशिकला आहे की ठाण्यात त्यावर उत्तर अवलंबून आहे. (हंशा)राज : खंजीर की तलवार ?पवार : चरखा... पण मी माझा फोटो कुठल्याही डायरीबियरीवर छापणार नाही.राज : गोविंद तळवलकर की माधव गडकरी?पवार : पत्रकार, मुलाखतकार राज ठाकरे.राज : शरद काळे की सतीश सहानी?पवार : मी यशवंतराव चव्हाण केंद्रात असेन तर काळे आणि नेहरू सेंटरमध्ये असेन तर सहानी.राज : गोडबोल्या की कडकबोल्या?पवार : ‘बोल्या पर क्या बोल्या’ यावर बरचं अवलंबून आहे.राज : जिताडं की मटण?पवार : पेजारीला असलो तर जिताडं आणि बाकी कुठंही असलो तर मटणं.राज : डॉ. जब्बार पटेल की डॉ. रवी बापट?पवार : एक कलेचा डॉक्टर दुसºयाकडे डॉक्टरकीची कला. कलेखेरीज आरोग्य नाही आणि आरोग्याखेरीज राजकारणातील कलाकारी नाही. (प्रचंड हंशा)राज : क्रिकेट की गोल्फ?पवार : अर्थात गोल्फराज : ऊस की बीटरुट ?पवार : चांगला प्रश्न आहे. बीटरुटचा पर्याय स्वीकारला तर राज्यातील साखर कारखाने बाराही महिने चालतील. गेली काही वर्षे मी त्याकरिता महाराष्ट्राचं प्रबोधन करतोय.राज : ब्राझिल की फ्रान्स?पवार : मी ब्राझिलला वरचेवर जात असतो. तुम्ही बरचं होमवर्क केलय.राज : साहेब, आता शेवटचा प्रश्न... सुप्रिया की अजित पवार?पवार : डॉ. राजेंद्र पवार (राज यांचा चेहरा काहीसा प्रश्नार्थक)पवार : फुटाणे, चला पानं वाढा. मंडळींना मुंबईला जायचय.