डॉ. दीपक शिकारपूर, उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक
२०२४ आता जवळ येऊन ठेपले आहे. गेल्या दशकात तंत्रज्ञान विकास व अंमलबजावणीचा जो वेग होता त्यापेक्षा पुढील दशक अधिक क्रांतिकारी व वेगवान असेल. सर्वांना, विशेषतः एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या पिढीला जास्त सतर्क व जागरूक राहावे लागेल. या दशकात कोणत्या तंत्रज्ञानामध्ये कोणत्या दिशेने किती प्रगती होईल? त्यातील काही महत्त्वाचे प्रवाह असे असतील :
कृत्रिम बुद्धिमत्ता
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान, आपल्या जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम करेल. या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती झाली आहे. पुढील दशकातही मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. विशेषतः जनरेटिव्ह एआयच्या विकासामुळे आपल्याला अनेक नवीन सुविधा उपलब्ध होतील. उदाहरणार्थ, आपण घराचे स्वयंचलिकरण करू शकू, वाहन स्वयंचलितपणे चालवू शकू आणि आपल्या आरोग्याचे निरीक्षण करू शकू. उद्याचे स्मार्ट यंत्रमानव कौशल्ये शिकण्यास, कार्ये करण्यास सक्षम असतील.
अति वेगवान इंटरनेट
इंटरनेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग झाला आहे. लवकरच ५ जी उपलब्ध होईल नंतर दर दोन वर्षांनी पुढला जी असेल. गुगल फायबर आताच १ गिगाबाईट प्रतिसेकंद (नियमित वाय-फायपेक्षा शंभरपट अधिक वेगवान) इंटरनेट गती प्रदान करते आणि लाय फाय Li-Fi २२४ गिगाबिट प्रतिसेकंद वेगाने डेटा प्रसारित करण्यासाठी दृश्यमान प्रकाश संप्रेषण वापरते. इंटरनेट कनेक्शनच्या समस्या भूतकाळात जमा होतील आणि “इंटरनेट ऑफ थिंग्ज” जगभरातील घरगुती उपकरणे, वेअरेबल सेन्सर्स आणि इतर तंत्रज्ञान कनेक्ट करेल.
उद्याचे स्मार्टफोन
उद्याचे स्मार्टफोन हे नॅनो मीटर आकाराच्या चिप्स, १०८ मेगा पिक्सेलपर्यंतचे कॅमेरे, टूके रिझोल्युशन असलेले डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान यासारख्या नवीनतम तंत्रज्ञानांसह येतील. वापरायला हलके, फोल्डेबल (घडी घालता येऊ शकेल, असे) स्मार्टफोन्स अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम होतील. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान स्मार्टफोन्सला जलद गतीने चार्ज करण्यास मदत करेल.
सायबर सुरक्षा
सायबर क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा धोका वाढला आहे. पुढील दशकातही सायबर सुरक्षेचा धोका वाढत राहण्याची शक्यता आहे. सायबर सुरक्षेबाबतच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. हा साधारणत: ‘उंदीर मांजर’ प्रकारातला खेळ आहे. तपास यंत्रणा जागरूक झाल्या की सायबर गुन्हेगार नवीन तंत्र वापरतात. दुर्दैवाने हे गुन्हेगार पारंपरिक गुन्हेगारांसारखे नसून उत्तम शिकलेले बुद्धिमान व्यावसायिक असतात. अनेकदा ते डार्क वेब तंत्र वापरतात व काही तर देशाच्या बाहेर असतात. त्यामुळे त्यांचा माग काढणे अवघड असते.
व्हर्च्युअल रिॲलिटी (VR), आभासी वास्तव (AR)
VR आणि AR हे दोन तंत्रप्रवाह आहेत जी आपल्याला वास्तविकतेचे भ्रम (आभासी विश्व ) निर्माण करतात. त्यांच्या मदतीने आपण नवीन जगाचा शोध घेऊ शकू, नवीन गोष्टी शिकू शकू आणि नवीन अनुभव घेऊ शकू. मेटॅव्हर्स व अवतार निर्मिती फक्त गेमिंगसाठी वापरली जाणार नाही, व्यावसायिक (विशेषतः मार्केटिंग) क्रांती होईल. जागतिक व्हर्च्युअल प्रदर्शने सतत आयोजित केली जातील. त्यामुळे ग्राहक निर्मिती वेगाने वाढेल. प्रवास करून प्रदर्शनात भाग घ्यायची गरज नसेल.
ब्लॉकचेन
ब्लॉकचेन हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे जे डेटा सुरक्षित आणि पारदर्शकपणे साठवते. क्रिप्टो करन्सीमुळे ते थोडे बदनाम झाले असले, तरी पुढील दशकातही ब्लॉकचेनच्या क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. यामुळे नवीन आर्थिक प्रणाली निर्माण करू शकू आणि नवीन प्रकारचे डेटाबेस तयार करू शकू. deepak@deepakshikarpur.com