डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपुरात गुरुवारी भारतीय बालरोग परिषदेस प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित असलेल्या समस्त डॉक्टर समुदायासमोर त्यांनी या क्षेत्राशी संबंधित जी विविध मते मांडली ती केवळ त्यांची एकट्याची नसून प्रातिनिधिक स्वरुपाची आहेत. सर्वसामान्य लोकांच्या मनात आज डॉक्टरांबद्दल ज्या भावना निर्माण झाल्या आहेत, डॉक्टर आणि रुग्णांमधील नात्यात अविश्वासाचा जो गंध येऊ लागला आहे त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ज्या भावना बोलून दाखविल्या त्याचा डॉक्टरांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. गडकरींची एक शैली आहे. एरवी आपल्या एखाद्या कार्यकर्त्याकडूनही चूक झाली की ते त्याची जाहीर शस्त्रक्रिया करीत असतात. ती सुद्धा अॅनस्थेशियाशिवाय. विशेष म्हणजे यामुळे कुणी दुखावतही नाही. नेमकी अशीच शस्त्रक्रिया त्यांनी काल डॉक्टरांची केली. देशातील सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि डॉक्टरांच्या तुटवड्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात ऊहापोह केला. त्याचाही विचार आता सर्व पातळीवर झाला पाहिजे. कारण या देशातील वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाचा ढासळता दर्जा चिंतेचा विषय झाला आहे. देशात निर्माण होणारे डॉक्टर्स, त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता यांच्यात अजूनही योग्य ताळमेळ बसलेला नाही. अनेक डॉक्टरांचा दर्जा हा भोंदू डॉक्टरांपेक्षा किंचित वरचा असल्याचे विधान खुद्द एका माजी आरोग्य सचिवानेच केले होते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या कमतरतेकडे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी लक्ष वेधले आहे. आजमितीस देशातील सुमारे ३९० वैद्यकीय महाविद्यालयांमधून वर्षाला जवळपास ५५ हजार डॉक्टर्स तयार होतात. सध्या आपल्या येथे साडेसात लाख डॉक्टर्स कार्यरत आहेत. म्हणजे १७०० लोकांमागे एक डॉक्टर असे हे प्रमाण आहे. ते अर्थातच कमी आहे. पण केवळ डॉक्टरांची संख्या वाढवूनही भागणार नाही. कारण डॉक्टर उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात जाऊ इच्छित नाहीत. सरकारी सक्तीचाही आता त्यांच्यावर परिणाम होईनासा झाला आहे. एकूण परिस्थिती बघता शासनानेही आता ढासळत्या आरोग्य सेवेबाबत केवळ डॉक्टरांना जबाबदार न धरता नवनवीन कल्पना, योजना आणि उपाय अमलात आणले पाहिजेत. यासाठी वैद्यकीय शिक्षणात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. याशिवाय खासगी आणि सरकारी भागिदारीतून डॉक्टरांची गुणवत्ता कशी वाढेल या दिशेनहीे प्रयत्न करावे लागतील.
गडकरींचा ‘डॉक्टरी’सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:44 AM