- किरण अग्रवाल
निवडणुकीच्या राजकारणातले प्रस्थापित फंडे टाळून लढण्याचे धाडस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखवू शकतात, कारण त्यांचे काम बोलते. इतरांना ते शक्य होणार आहे का? कारण त्यासाठी काम दाखवावे लागेल. सर्व इच्छुकांसमोर तेच मोठे आव्हान असणार आहे.
राजकारणात केवळ नावाने निभावून जाण्याचे दिवस सरले, आता काम बोलते हेच खरे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच आपल्या अकोला दौऱ्यात यासंदर्भात जे सांगितले ते अगदी खरे आहे; पण हे किती लोकप्रतिनिधींना उमगते हाच खरा प्रश्न आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी अकोल्यात आले असता त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मनमोकळे बोलले. आत आणि बाहेर वेगवेगळे काही नसले की माणूस मोकळेच बोलतो. गडकरीजी यासाठी खातकिर्त आहेत. मागे बुलढाण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतानाही त्यांनी असेच ‘मोकळे’ बोलत कार्यकर्त्यांना कामाच्या बळावर पक्ष पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. आमचे दुकान जोमात आहे; पण जुने कार्यकर्ते दिसत नाही अशी खंतही त्यांनी त्यावेळी बोलून दाखविली होती. बरे, बावनकुळे यांच्यासारखे पक्ष पुढे नेण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या, असे भलते सलते गडकरींचे बोलणे नसते, तर ज्येष्ठत्वाच्या नात्याने इतरांना मार्गदर्शक ठरावे असे त्यांचे अनुभवाचे बोलणे असते. आताच्या अकोल्यातील संबोधनातही तोच अनुभव आला, जो सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरावा.
राजकारण आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. निवडणूक लढविणे सोपे राहिलेले नाही. याअनुषंगाने बोलताना ‘मी प्रामाणिकपणे सेवा करतो. माझे काम बोलते. त्यामुळे मी आता चहापाणी करणार नाही. लक्ष्मीदर्शनही घडविणार नाही, मते द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ...” असे गडकरी परखडपणे बोलून गेले. असे बोलायला धाडस तर असावे लागतेच; पण तसे कामही असावे लागते. गडकरी यांनी तेवढे पेरून ठेवले आहे. त्यामुळे काय उगवेल, याची त्यांना चिंता नाही. पेरणीच करपलेले नेते असे धाडस दाखवू शकत नाहीत, म्हणून त्यांना कामाऐवजी इतर ‘नाजूक’ मुद्यांवर स्वार होऊन निवडणूक लढविण्याची वेळ येते.
लोकसभा व विधानसभेचेच काय, अगदी स्थानिक पातळीवरील महापालिका व जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचे उदाहरण घ्या, ‘माझे काम बोलेन, आणि त्याबळावरच मी निवडणूक लढेन’ असे किती जण सांगू शकतील? तर अगदी अपवादात्मक नावे व आकडा समोर येईन. गडकरी अधूनमधून नागपुरात स्कूटरवरून फिरताना व साध्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतानाही दिसतात. आपल्याकडे तर नगरसेवकसुद्धा चारचाकी गाडीच्या खाली उतरताना दिसत नाही. महापालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात आल्यापासून तर नगरसेवकही गायब आहेत. जनतेचा कोणी वालीच उरलेला नसल्यासारखी स्थिती आहे. जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्या बैठकाच वादावादीने गाजतात, म्हणावी तशी कामे समोर दिसत नाहीत.
आता निवडणुका समोर असल्याने अनेक नेते घराबाहेर पडलेले दिसत आहेत. अमुक निवडणुकीसाठी तमुकची तयारी चर्चिली जात आहे, त्यादृष्टीने कोणी बाप्पा गणरायांच्या आरतीला दिसले तर कोणी महालक्ष्मीच्या प्रसादाला. आगामी सणावारांच्या पार्श्वभूमीवर हे फॅड आणखीनच वाढेल. मतदारांचे मोबाइल निवडणुकेच्छुक नेत्यांच्या शुभेच्छा संदेशांनी भरून वाहतील; पण कामांबाबत बोलताना फारसं कोणी दिसत नाही. नाही म्हणता आता काहींच्या विकासकामांची भूमिपूजने होऊन नारळ फुटत आहेतही; पण त्यापूर्वी साध्या खड्ड्यांच्या रस्त्यांवर पडून अनेकांची डोकी फुटली आहेत हे विसरता येणार आहे का?
महत्त्वाचे म्हणजे, रस्ते-वीज-पाणी याकडे तर वेळोवेळी लक्ष द्यावेच लागते. ते केले म्हणजेच विकास नव्हे. विकास मोजायचा तर नवीन काय घडविले गेले, हे पाहिले जाते. अकोला काय किंवा एकूणच पश्चिम वऱ्हाडात, जुन्याच योजना किंवा प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्याची यादी मोठी आहे. अकोल्याचेच उदाहरण घ्या, अन्य ठिकाणी विमानतळ आकारास येऊन उड्डाणे सुरू झालीत, येथे आहे त्या धावपट्टीवरून अजून विमान उडू शकलेले नाही. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे घोंगडेही भिजतच पडले आहे. म्हणायला नवीन उड्डाणपूल साकारला; पण एके ठिकाणी त्याचे पाडकाम करावे लागले व तो रस्ता अजून सुरू झालेला नाही. अशा स्थितीत येथे कुणाचे कोणते काम बोलेल?
सारांशात, निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशात उमेदवारी इच्छुकांची गर्दी होणे स्वाभाविक असले तरी, मतदारराजा जागृत झालेला असल्याने गडकरी म्हणालेत त्याप्रमाणे संबंधितांचे कामच बोलणार आहे. तेव्हा, कोणाचे कोणते काम बोलते हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.