राज्य संकटात असताना सत्तेसाठीचा खेळ चीड आणणारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:12 AM2019-11-25T07:12:50+5:302019-11-25T07:13:16+5:30
फोडाफोडी करणार नाही, असे सांगत कॉँग्रेसच्या नावाने खडे फोडणाऱ्या आणि आपले राजकारण शुचिर्भूत असल्याचा दावा करणाºया भाजपचे हे कसले राजकारण म्हणायचे? महाराष्ट्र अस्मानी-सुलतानी संकटात असताना सत्तेसाठीचा हा खेळ चीड आणणारा आहे.
सत्तासुंदरीचा मोह कुणालाही सुटलेला नाही. ती प्राप्त करण्यासाठी वाटेल त्या थराला जाणे, हे राजकारणात नवे नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर त्यातही एक नैतिकता होती. मात्र, रात्रभर ज्या पद्धतीने खेळ केला गेला आणि सकाळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली गेली आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने रात्रीत राष्ट्र वादी कॉँग्रेस पक्षालाच भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला; तो राज्याची वैचारिक नीतिमत्ता, राजकीय परंपरा धुळीला मिळविणारा आहे. राज्यात सत्तेसाठी गेला महिनाभर जो काही खेळखंडोबा चालला आहे, तो पाहून तमाम महाराष्ट्रातील जनतेवर ‘याचसाठंी केला होता का मतदानाचा अट्टाहास’ असे म्हणत डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी कौल दिला; परंतु या दोन्ही पक्षांच्या जागा घटल्या. त्यातूनच शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेला उभारी आली. मुख्यमंत्रिपदासह ‘फिफ्टी-फिफ्टी’चा आग्रह तिने धरला. अमित शहांंच्या उपस्थितीत सत्तावाटपाचे हे सूत्र ठरल्याचा शिवसेनेचा हा दावा भाजपने फेटाळून लावला आणि इथेच त्यांच्या तीस वर्षांच्या संसाराच्या काडीमोडाची बीजे रोवली गेली. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देत नसाल तर सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसशी संधान साधले.
आम्हाला विरोधात बसण्याचा कौल मतदारांनी दिला आहे. आम्ही विरोधातच बसू, असे सांगणारे या दोन्ही पक्षांचे नेते शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेला तयार झाले. त्यासाठी त्यांनी शिवसेनेला तिची विचारधारा गुंडाळून ठेवायला लावली. मात्र, मुख्यमंत्रिपदासह राज्याची सत्ता दृष्टिपथात आली असतानाच अजित पवार रात्रीत भाजपच्या गोटात जाऊन बसले. सोबत त्यांनी दहा आमदारांनाही नेले. यामुळे महाराष्ट्र हादरला. अशी अनेक वादळे लीलया पेलणारे शरद पवार यांनीही पुतण्याच्या या बंडानंतर परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली ती पाहता राजकारणात अजित पवार एकाकी पडल्याचे चित्र सध्या दिसते आहे. शिवसेनेला पाठिंब्याची पत्रे द्यायला मुदतवाढ नाकारणा-या, राष्ट्रवादीलाही अधिक वेळ देण्यास संधी न देणा-या राजभवनाने ज्या गतीने भाजपच्या सत्तेसाठी रात्रीत हालचाली केल्या आणि नव्या सरकारचा शपथविधी उरकून घेतला, हा सारा प्रकारच महाराष्ट्राला नवा आहे. त्यांच्या या कृतीला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यावर रविवारी सुनावणीही झाली. राज्यपालांचे आदेश सादर करा, असा आदेश देत न्यायालयाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. राज्यपालांनी ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. मात्र, इतका वेळ न देता ते कर्नाटकप्रमाणे तातडीने करायला लावावे, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
जादा वेळ दिल्यास भाजपला घोडेबाजार करायला वाव मिळेल, असे सांगितले जात असले तरी आपले आमदार फुटू नयेत यासाठी सर्वच पक्षांनी दक्षता घेतली आहे. काय होणार ते विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी कळेलच; मात्र १९७८ मध्ये वसंतदादांच्या विरोधात बंड करून ‘पुलोद’चे सरकार स्थापन करणाºया शरद पवारांपुढे त्यांच्या पुतण्यानेच बंड करून आव्हान दिले आहे. यात भाजप जिंकला काय किंवा शिवसेना जिंकली काय, विश्वासार्हता पवारांचीच पणाला लागली आहे. ती टिकविण्यात काका यशस्वी होणार की पुतण्या, हे त्याचवेळी कळेल. मात्र फोडाफोडी करणार नाही, असे सांगत कॉँग्रेसच्या नावाने सतत खडे फोडणा-या आणि आपले राजकारण शुचिर्भूत असल्याचा दावा करणा-या भाजपचे हे कसले राजकारण म्हणायचे? अवघा महाराष्ट्र अस्मानी आणि सुलतानी संकटात असताना सत्तेसाठी जो खेळ राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मांडला आहे, तो चीड आणणारा आहे.