- डॉ. शुभांगी पारकरसोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी मैदानी खेळांना कधीच विसरली, परंतु हे विसरणे नव्या ‘व्हर्च्युअल गेम्स’च्या विश्वाला प्रोत्साहन देणारे ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून मैदानावरचे क्रिकेट एन्जॉय करणारी पिढी आता मोबाइल, टॅब्सच्या स्क्रीनवर क्रिकेट खेळून सेंच्युरी गेल्याच्या गप्पा मारू लागली आहे. एवढेच नव्हे, तर पूर्वी साधे-सोपे असणारे खेळ आता आॅनलाइन रिवॉर्ड्स, चॅलेंज आणि लेव्हल्सच्या कात्रीत अडकल्याने, हेच गेम्स जिवावर बेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अंधेरीत अवघ्या १४ वर्षांच्या मनप्रीत सिंगने ‘ब्लू व्हेल’ नावाच्या गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.शालेय वयातील मुले आणि तरुणपिढी मोबाइल किंवा व्हिडीओ गेम्सच्या आहारी गेले आहेत. तरुणाईला गेम्सचे व्यसन लागलेले असून, गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडले आहेत. विरंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ आता तरुणाईच्या जिवाशी खेळू लागले आहे. तरुणांना इंटरनेटच्या माध्यमातून गेम्स खेळण्याचा जणू छंदच जडला आहे. त्यांच्या या छंदामुळे बाजारात कंसोल्स व पोर्टेबल डिव्हायसेसच्या आॅनलाइन भागीदारीत वाढ झाली आहे, परंतु हे आॅनलाइन गेम्स आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. मोबाइल गेमचा मुलांना लागलेला लळा पालकांना सर्वच दृष्टीने महाग पडू लागला आहे. या गेमच्या व्यसनापायी मुले तासन्तास एकाच जागी बसून स्वमग्न होऊ लागली आहे. गेमच्या नादात त्यांना कशाचेही भानही राहिलेले नाही. मुलांनी मोबाइलवर गेममुळे अभ्यासाला सुट्टी दिलेली आहे. शालेय वयातील मुलांना अभ्यासातून ‘ब्रेक’ म्हणून त्यांच्या हातात मोबाइल, टॅब्स देणे असो किंवा मग ताणतणावातून ‘रिलॅक्स’ होण्यासाठी गेम्स खेळण्याची सवय असो, हे टाइमपास म्हणून गेमिंग करणे दिवसागणिक धोक्याचे ठरत आहे. टॅब्स, कॉम्प्युटर, लॅपटॉप्स आणि मोबाइलवर आॅनलाइन गेम्स खेळणाºया लहानगी मुले-मुली तरुण, तरुणींना दृष्टिदोष, निद्रानाश थकवा, चिडचिडेपणाचा त्रास सुरू होतो. त्यांना बºयाच समस्यांना तोंड द्यावे लागते. झोपेत असतानाही वेगवेगळे भास होतात, विस्मरण, एकाग्रतेचा अभाव, ग्रहणशक्ती कमी होणे, योग्य निर्णय घेता न येणे असे गंभीर परिणाम होण्याची भीती असते. एखादे वेळी पाल्य किंवा तरुण या आॅनलाइन गेमिंगच्या जाळ््यात अडकले असेल, तर पहिल्यांदा त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जावे. त्यानंतर समुपदेशनासोबतच हळूहळू त्याचे गेम खेळण्याचे तास कमी करावे. काही दिवसांनी गेम खेळण्याची सवय आठवड्यातून एकदा करण्यात यावी. याशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि समुपदेशनाचे सेशन्सही सुरू ठेवावेत. या वयोगटातल्या पालकांनी आपल्या मुलांशी वेळोवेळी संवाद ठेवणे आणि इंटरनेटसारख्या माध्यमातून गेम्सपासून दूर कसे राहावे, याचे मार्गदर्शन करणे योग्य ठरेल .आॅनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे सर्वांत महत्त्वाचे कारण एकमेकांतील संवाद हरविणे हे आहे. त्यामुळे हा सुसंवाद आपल्या कुटुंबीयांसोबत, आप्तेष्ट आणि मित्रपरिवारासह करणे ही काळाची गरज आहे. आजही मोबाइलच्या आहारी गेलेल्या कित्येक तरुण आणि लहानग्यांवर मानसोपचार तज्ज्ञांद्वारे उपचार सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत. दिवसभर आॅफिसला जाणाºया पालकांमुळे लहान वयातच बळावत चाललेला एकटेपणा, या लहानग्यांना गेम्सच्या आहारी जाण्यास भर पाडतो. पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांना समजून घ्यावे, त्यांचे ऐकून घ्यावे आणि त्यांच्यावर दबाव न आणता, गेमिंगच्या आभासी विश्वापासून त्यांना दूर जाण्यास प्रवृत्त करावे. जेणेकरून ही मुले भविष्यात मानसिक रुग्ण होण्यापासून किंवा गेमिंगमुळेस्वत:च्या जिवाला दुरावण्यापासून परावृत्त होण्यास मदत होईल.
(लेखिका केईएम रुग्णालयात मानसोपचार विभागाच्या प्रमुख आहेत.)