- डॉ. रामचंद्र देखणेरंगमंचावरील कलाविष्काराची सुरुवात ही नांदीने होते. नमनाने होते किंवा गणाने होते. लोकरंगभूमीच्या प्रत्येक प्रकारात ‘गण’ सादर केला जातो. गण म्हणजे गणपतीचे स्तवन. गणपतीचे वर्णन. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास ‘गण’ म्हणजे गणपतीचे ‘लोकसंकीर्तन’ होय.गणपती ही विद्येची देवता आहे. ती कलेची देवता आहे आणि सारस्वताची ही देवता आहे. सर्व विश्वाच्या मुळाशी असणाºया ‘आद्य’ ज्ञानराशिरुप वेदांनी ज्याचे वर्णन करावे अशा वेदप्रतिपाद्य आणि सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणाºया स्वसंवेद्य आत्मरूपी गणपतीला वंदन करून ज्ञानदेव हे ज्ञानेश्वरीच्या महासारस्वताची वागपूजा करतात.वैदिक परंपरेशी जोडला गेलेला हा अथर्ववेदातील किंवा अथर्वशीर्षातील गणपती लोकमान्य झाल्यावर रिद्धी सिद्धीसह लोककलेच्या अंगणी येऊन नर्तन करू लागला.उपनिषदामधील ओंकार रूपापासून पुराणातील शिवसुतापर्यंत, तत्त्ववेत्यांच्या ब्रह्मरूपापासून लोककथांमधील गौरीवंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे रुप लोककलेच्या प्रत्येक अविष्कारात गणाच्या रूपात उभे राहिले. शाहिरी, तमाशा, लोकनाट्य, गोंधळ, जागरण, ललित या सर्वच लोककलाप्रकारात...आधी गणाला रणि आणिला।नाहीतरी रंग पुन्हा सुना सुना।असे म्हणत म्हणत गण सादर झाला की, कलेमध्ये रंग भरला आणि खरा लोकरंग उभा राहिला. याची अनुभूती कलाकारही घेतो आणि रसिकही. कलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि गणाचे सूर आणि स्वर गाताना तो रंगमंचाशी एकरूप होतो. लोककलाकारांचे रंगमंचाशी असणारे अद्वैत म्हणजे गण.लोककलावंत त्या रंगमंचावर प्रथम गणरायाशी बोलतो. त्याचा संवाद पहिल्यांदा गणाशी होतो मग जनाशी. लोककलाकार हा व्यावहारिक आहे. हे सारे चिंताग्रस्त मन तो गणरायाच्या पायी मोकळे करतो आणि मगच मुक्तपणे रंगमंचावर वावरतो. लोककलावंताचे अंतर्मन व्यक्त करायचे ठिकाण म्हणजे गण. गण हा त्यांचा सखा आहे, दाता आहे. सद्गुरू आणि प्रणेताही आहे. सप्तसुरांचा ताल धरून, संगीताचा शेला विणून, तो भावदर्शनाने जेव्हा गणरायाला अर्पण होतो तेव्हाच गण साकारतो. मग ‘आम्ही गण गातो... गण नाचतो’ ही अनुभूती घेऊन कलावंत आणि रसिकही सुखावतो.
‘गण’ गातो-नाचतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:13 AM