‘दि युनायटेड स्टेट्स एक्स्प्रेस’ या विख्यात अमेरिकी नियतकालिकाने या शतकाच्या आरंभी जगातील दहा हजार निवडक प्रतिष्ठित जनांना एक प्रश्न विचारला. ज्यांना तो विचारला त्यात देशोदेशीचे अध्यक्ष, पंतप्रधान, सरन्यायाधीश, सेनापती, उद्योगपती, नोबेल विजेते, ज्ञानवंत, विचारवंत आणि मान्यताप्राप्त कुलगुरूंचा समावेश होता. ‘सन १००० ते २००० या एक हजार वर्षांच्या काळात जगात झालेला सर्वात मोठा माणूस कोणता’ या सरळसाध्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात त्या मान्यवरांपैकी ८,८८६ लोकांनी महात्मा गांधींचे नाव घेतले. ५६ जणांनी चर्चिल तर ४४ जणांनी लेनिन यांना त्यांची पहिली पसंती दिली. गांधीजींचे जागतिक असणे त्याआधीही सिद्ध झालेच होते. ‘पृथ्वीच्या पाठीवर आपली परिणामकारक पावले उमटवून गेलेला गांधी नावाचा माणूस कधी झाला होता यावरच पुढचे जग कदाचित विश्वास ठेवणार नाही’, असे उद््गार आईन्स्टाईनने फार पूर्वी काढले होते. आता संयुक्त राष्ट्र संघटनेने गांधीजींच्या हौतात्म्याचा दिवस हा जागतिक शांतता दिन म्हणून जाहीर केला आहे. गांधीजी एकट्या गुजरातचे नव्हते, कोणत्या जातिधर्माचे नव्हते, ते साऱ्या देशाचे व जगाचेही मार्गदर्शक नेते होते. एका अभ्यासकाच्या मते गांधीजी हे राम, कृष्ण आणि बुद्ध यांच्यासारखेच भारताच्या डीएनएचे भाग आहेत. त्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांनी ‘गांधीजी कुणा एका पक्षाची मालमत्ता नव्हे’ असे म्हणून त्यांचे छायाचित्र हटविण्याच्या आपल्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा जो प्रयत्न केला तो त्यांचा अपराध वा दोष नव्हे. महामानव कोणा एका वर्गाचे, धर्माचे, देशाचे वा पक्षाचे नसतातच. त्यांच्यावर साऱ्या जगाचाच हक्क असतो. मात्र हा हक्क सांगताना तो पुरेशा सन्मानाने सांगणे, तसे करताना त्याच्या प्रतिष्ठेला धक्का न लावणे आणि त्याच्या विचाराचे (जमलेच तर) वाटचालीचे काही प्रमाणात अनुकरण करणे आवश्यक असते. मात्र एखाद्या महापुरुषाला आपले म्हणत त्याची नुसतीच निंदानालस्ती करीत राहणे हा कमालीचा फसवा, व संतापजनक प्रकार आहे. निवडणुका जवळ आल्या की राजकारणातील अनेकांना महापुरुषांची आठवण होते. परवापर्यंत आंबेडकरांचे नावही न उच्चारणारे संघ- भाजपा आणि इतरही पक्षांचे लोक आताची आपली सत्ता टिकवायला जेव्हा आंबेडकरांचा उदो उदो करताना दिसतात, सतत शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावाचा उद्घोष करीत राहतात, तेव्हा ते असेच ओंगळवाणे आणि लाचार व स्वार्थमूलक प्रदर्शन असते. प्रथम गांधीजींचे छायाचित्र खादीच्या कॅलेंडरवरून काढून तेथे मोदींचे चित्र लावायचे, मग कुणा एकाने गांधीजींचे छायाचित्र नोटांवरूनही हटविण्याची मागणी करायची, तिसऱ्या एकाने मोदी हे आता गांधींपेक्षा चांगले ब्रँड आहेत असे म्हणायचे आणि चौथ्याने गांधी कुणा एकाचे नसून आमचेही असल्याचे सांगत (त्यांची बदनामी करण्याचा हक्क आम्हाला आहे) असे म्हणणे यातली लबाडी उघड आहे. पुन्हा हे सारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रुचेल असे परभारेच गृहीत धरून व त्यांना अंधारात ठेवून करायचे. यामध्ये बापू गांधींची जशी अवहेलना आहे तशीच ती पंतप्रधानांची फसवणूकदेखील आहे. गांधी हे देशाचे लोकदैवत आहेत आणि त्यांची नालस्ती करणाऱ्यांना जनतेने अनेक पिढ्यांपर्यंत नाकारले आहे. जे अजून तसे करतात त्यांच्याविषयीचा लोकक्षोभ मोठा आहे. त्यांच्या तसे करण्यामागचे हेतूही लोकांना चांगले ठाऊक आहेत. जगात मर्यादापुरुषोत्तम रामाचेही टीकाकार होते, श्रीकृष्णालाही शत्रू होते आणि बुद्धालाही विरोधाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांचे टीकाकार आणि हल्लेखोर इतिहासात कुठे राहिले नाहीत. अशा माणसांना काही काळ डफावर राहता येते; पण ते डफही मग त्यांच्या एकसुरी प्रचाराने उबगतात. अशा माणसांना सत्तेचे पाठबळ मिळते तेव्हा त्यांची चलती दिसते. पण सत्ताधाऱ्यांनाही त्यांचा वापर नाचे म्हणूनच करून घ्यायचा असतो. तो झाला की तेही त्यांना वाळीत टाकत असतात. सत्ताधाऱ्यांसमोरचा प्रश्न सत्ता टिकवण्याचाच तेवढा असतो. त्यासाठी ज्या ज्या, स्वत:ला बळकट करणाऱ्या इच्छुकांचा वापर करता येईल त्यांचा तसा वापर ते करून घेतात. संघ आणि आजचे सत्ताधारी यांना ही माणसे चांगली ठाऊकही आहेत. मात्र त्यांच्या तशा कारवायांमुळे समाजाची दिशाभूल होत नाही व ती होण्याचे कारणही नाही. जी माणसे जगाच्या वाटचालीला एखाद्या उंच दीपस्तंभासारखी मार्ग व प्रकाश दाखवितात त्यांच्यापुढे अशा प्रचारी काजव्यांचे फारसे चालतही नाही. दु:ख या माणसांविषयीचे नाही. ते आहे राजकारण व समाजकारणात कित्येक दशके काम करून नेतेपद मिळवणाऱ्या अनुभवी माणसांच्या अशा वेळच्या मौनाचे. अडवाणी अशावेळी काय करतात, मुरली मनोहर कुठे असतात आणि संघातली ज्येष्ठ माणसे मूग गिळून का असतात? एकतर त्यांना ते हवे असते किंवा त्यांच्याजवळ अशा उठवळांना आवरण्याचे सामर्थ्य नसते. काही का असेना अशा प्रवृत्ती समाजातील उथळ आणि किडलेली मने जगाच्या ध्यानात आणून देतात. हलक्या वस्तू पाण्यावर तरंगताना दिसाव्या तसे त्यांचे हे स्वरूप. त्यांना गांधींशी कर्तव्य नसते, आंबेडकर त्यांच्या विचारातही नसतात आणि हो, राम आणि कृष्ण हेही त्यांना त्या गंगेएवढेच सत्तेसाठी वापरायला हवे असतात.
गांधी स्वार्थासाठी हवे असतात!
By admin | Published: January 17, 2017 12:23 AM