- प्रशांत दीक्षितनरेंद्र मोदी या व्यक्तीची पक्षावर जबरदस्त पकड आहे, ते हुकूमशहा किंवा सौम्य शब्द वापरायचा तर कठोर प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या संमतीशिवाय पक्षातील व्यक्ती शब्दही उच्चारू शकत नाही, अशी प्रतिमा भारतीय जनतेमध्ये तयार झालेली आहे. तथापि ही प्रतिमा कितपत बरोबर आहे, याची शंका यावी अशाही घटना घडत आहेत. किंबहुना पक्षातील कडव्या प्रवृत्तींना हाताळताना मोदी हतबल झालेले दिसतात. प्रज्ञासिंह ठाकूर हे याचे अलिकडील उदाहरण. या बाईंना उमेदवारी देऊन भाजपाने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला असे म्हटले तर वावगे ठरू नये. उमेदवारी मिळताच त्यांची वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कानपिचक्या दिल्या तरी त्या गप्प बसल्या नाहीत. करकरे यांच्याबद्दल तर त्यांनी अतिशय आक्षेपार्ह शेरेबाजी केली. या बाईंना ना अध्यात्म समजत आहे, ना राजकारण.त्यांना गप्प बसविण्यासाठी शेवटी निवडणूक आयोगाला बडगा उगारावा लागला. त्यांना दोन दिवस प्रचारासाठी बंदी करण्यात आली. त्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत त्या गप्प बसल्या. पण आज त्यांनी पुन्हा अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचा साक्षात्कार त्यांना कोणत्या ध्यानावस्थेत झाला ते कळण्यास मार्ग नाही. नथुराम गोडसेचे आततायी कृत्य हा भारतीय इतिहासातील कलंकीत क्षण आहे. प्रत्येक भारतीयाला व हिंदूंनाही त्याबद्दल खंत आहे. महात्मा गांधींबद्दल आदर नसणाऱ्यांची या देशात कमी नाही व प्रत्येक व्यक्तीने महात्मा गांधींबद्दल आदर दाखविलाच पाहिजे अशी सक्तीही करता येत नाही. खुद्द महात्मा गांधींना ते मान्य झाले नसते. पण महात्मा गांधींशी मतभेद असणारेही, अगदी कडवे वैचारिक मतभेद असणारेही, गोडसेचे कृत्य समर्थनीय मानत नाहीत. विरोधातील नेत्याची हत्या करण्याचा मार्ग हिंदू तत्त्वज्ञानातही बसणारा नाही. गीतेमध्ये युद्धाचे समर्थन आहे, व्यक्तिगत हिंसेचे नाही. आणि ते समर्थन काही तत्त्वासाठी आहे. अर्थात प्रज्ञा ठाकूर यांचा हिंदू तत्त्वज्ञानाशी संबंध असण्याचा संभव अगदी कमी आहे हे त्यांच्या आचारविचारांवरून कळते. समर्थ रामदासांनी दासबोधात कोरडे ओढलेल्या बुवाबाबांच्या संप्रदायातील त्या आहेत.गोडसेला देशभक्त ठरविणारे वक्तव्य जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा समज दिली. ठाकूर बाईंचे विधान पक्षाला मान्य नाही व ठाकूर यांनी त्वरित माफी मागावी, असा आदेश पक्षाने दिला. पक्षाचे प्रवक्ते जीव्हीके राव यांनी हा आदेश वाचून दाखविला. खरे तर अमित शहांनीही कडक समज देणे उचित ठरले असते. मोदी अनेकदा महात्मा गांधींचे नाव घेत असतात. महात्मा गांधींच्या खुन्याचे समर्थन करणार्याला कडक शब्दात तंबी देण्याचे काम त्यांनी अमित शहा यांच्यावर सोपवायला हवे होते. मोदींनी तसे केले नाही. निदान गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी केलेले नाही. शहाही गप्प आहेत. भाजपाचे अन्य नेतेही याबद्दल काही बोललेले नाहीत. यातूनच मोदींची व भाजपाची हतबलता दिसून येते.यापूर्वीही गोरक्षकांना मोदींनी जाहीर कानपिचक्या दिल्या होत्या. त्यांना फटके मारले पाहिजेत असे म्हणाले होते. त्याचा काहीही परिणाम गोरक्षकांवर झाला नाही. गोरक्षकांची आक्रमकता थोडी कमी झाली असली तरी घटना बंद झाल्या नाहीत. पक्षाने आदेश दिल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी यापुढे गप्प बसतील असे नव्हे. याचे कारण प्रज्ञा ठाकूर, बजरंग दल किंवा गोरक्षक हे भाजपाचे समर्थक असले तरी भाजपाचे कार्यकर्ते नाहीत. या कडव्या गटांना राजकीय विचार नाही. त्यांची वैचारिक जडणघडण ही पुराणांवर झालेली आहे. त्यांचे राहणीमान आधुनिक असले तरी विचार आधुनिक नाहीत. तेव्हा माफी मागितल्याने प्रज्ञा ठाकूरांच्या विचारात फरक पडणार नाही. जे डोक्यात बसले आहे ते कधी ना कधी उफाळून येणारच. प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाबद्दल भाजपाला खरोखर खंत वाटत असेल तर २३ मे रोजी त्या विजयी झाल्या तरी खासदारकीचा त्वरित राजीनामा देण्याची सक्ती त्यांच्यावर पक्षाने केली पाहिजे.मात्र मोदी तसे करू शकत नाहीत. कारण मते जमविण्यासाठी या गटांची गरज भाजपाला आजही वाटते. या गरजेपोटी मोदी, संघ परिवार व भाजपाचे नेते हतबल होत असावेत. भाजपाचा इतिहास पाहिला तर हा धागा अधिक स्पष्ट होईल.जनसंघ हे भाजापाचे पूर्वरूप. भारतीय जनता पार्टी असे त्याचे नंतरचे स्वरूप, १९८२मध्ये आले. देशातील मुख्य प्रवाहात राहायचे असल्यास कडवे हिंदुत्व, निदान काही काळ बाजूला ठेवले पाहिजे असे त्यावेळच्या भाजपच्या नेत्यांना वाटले. वाजपेयी, भैरोसिंग शेखावत, जसवंतसिंह, सुंदरलाल पटवा अशा नेत्यांचे तेव्हा पक्षात वजन होते. अडवाणीही त्यावेळी मवाळ होते. देवरस हे सरसंघचालक होते व गोळवलकर गुरुजींपेक्षा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्यावेळी गांधीवादी समाजवाद स्वीकारला. मात्र नंतरच्या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. भाजपाचा गांधीवाद जनतेने स्वीकारला नाही. राजकारणात राहायचे असेल तर हिंदुत्ववादी शक्तींना बरोबर घेऊनच वाटचाल करावी लागेल हे लक्षात घेऊन लालकृष्ण अडवाणी यांनी धूर्तपणे राम मंदिर मोहिमेशी भाजपाला जोडून घेतले. त्यानंतर पक्षाची ताकद सतत वाढत गेली.यानंतरच्या प्रवासात पक्षाचा प्रत्येक अध्यक्ष हा मागील अध्यक्षापेक्षा कडवा होत गेलेला दिसतो. बिझीनेस स्टॅन्डर्डमध्ये या मुद्दाचे विवेचन काही वर्षांपूर्वी झालेले आठवते. वाजपेयी-अडवाणी-मोदी-अमित शहा या प्रत्येकाने कडवेपणाची पुढची पायरी घेतली. आज अडवाणींसाठी अश्रु गाळणारे पत्रकार व नेते दोन दशकापूर्वी अडवाणींवर तिखट टीका करीत होते. आज अमित शहांच्या वक्तव्यांपुढे वाजपेयी फारच मवाळ वाटतात. पण एकेकाळी त्यांची वक्तव्ये जहाल ठरविली गेली होती. भाजपाच्या गेल्या चार दशकांच्या प्रवासात पक्षाचा दृष्टीकोन अधिकाधिक कडवा होत गेला. पक्षाने कडव्या हिंदुत्वाशी अधिकाधिक बांधून घेतले. हाच प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतही झालेला दिसतो. तेथील नेतृत्वही अधिकाधिक कडवेपणाकडे झुकलेले दिसते.भाजपाच्या नेतृत्वाची पुढची पिढी ही त्याहून कडवी आहे. आज मोदी व शहा यांच्या खालोखाल पक्षात लोकप्रिय आहेत ते आदित्यनाथ. ते व प्रज्ञा ठाकूर या एकाच पंथातील आहेत. भाजपामध्ये असे सांगितले जाते की आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यास मोदी तयार नव्हते. पण उत्तर प्रदेशातील आमदारांचा जबरदस्त दबाव दूर लोटून अधिक समावेशक व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे धाडस मोदी दाखवू शकले नाहीत. आज उत्तर प्रदेशात मोदी जितके लोकप्रिय आहेत, तितकेच आदित्यनाथ अनेक समाजागटांमध्ये अप्रिय आहेत. वाराणशीमधील लोकांच्या मुलाखती नुकत्याच इंडिया टुडेवर दाखविण्यात आल्या. स्थानिक लोकांनी, अगदी मुस्लिमांनाही, मोदींचे कौतुक केले व खासदार म्हणून मोदींच हवेत असेही सांगितले. मात्र त्याचवेळी आदित्यनाथ यांच्यावर कडक टीकाही केली. मुस्लीम मतांची मला गरज नाही असे आदित्यनाथ उघडपणे म्हणाले. त्याची प्रतिक्रिया मुस्लीमांबरोबर हिंदू मतदारांमध्येही उठली आहे. प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी देण्याचीही मोदींची तयारी नव्हती असे म्हणतात. दिग्विजय सिंग यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर दिग्विजयसिंग यांना धडा शिकविण्यासाठी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देण्याचे दडपण काही कडव्या हिंदुत्ववादी नेत्यांनी आणले. संघानेही त्यांना समर्थन दिले अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाली होती. मोदींना हे दडपण मान्य करावे लागले.काँग्रेसपेक्षा वेगळी विचारधारा देशात रुजविण्यासाठी भाजपा व संघ परिवाराचे प्रयत्न सुरू आहेत. हे वेगळेपण सुशासन, भ्रष्टाचार नसलेले प्रशासन, उद्योगस्नेही धोरणे व आधुनिक वैज्ञक व शिक्षण यातून दिसणार की कडव्या हिंदुत्वातून दिसणार हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसमधील घराणेशाही, वैचारिक गोंधळ, भ्रष्टाचार, धाडसी निर्णय घेण्यातील कुचराई व एकूणच मंद व दिशाहीन कारभार याला कंटाळलेला मोठा हिंदू समाज मोदींनी त्यांच्याकडे खेचला. या समाजामध्ये मोदींबद्दल अद्याप आस्था आहे. निर्णय घेण्याची धमक असलेला नेता म्हणून मोदींकडे हा समाज पाहतो. हिंदू असण्याचा या समाजाला अभिमान आहे. पण गोडसे, आदित्यनाथ वा प्रज्ञा ठाकूर असण्याचा नाही. याच समाजाने मोदींना बहुमत मिळवून दिले. आदित्यनाथ, प्रज्ञा ठाकूरने नाही. हिंदू अस्मिता जपून जगाशी कुशलतेने व्यवहार करू शकणारा ह्यआधुनिक हिंदूह्ण या समाजाला बनायचे आहे. प्रज्ञा ठाकूर वा आदित्यनाथ हे या समाजाला मान्य होणारे नाहीत. बहुमत मिळाल्यानंतर आधुनिक हिंदूंची मतपेढी तयार करण्याकडे मोदींनी लक्ष दिले नाही. मोदींनी भ्रष्टाचारमुक्त कारभार केला, अर्थव्यवस्थेला शिस्त लावणारी धोरणे आखली आणि परराष्ट्रीय धोरणात कणखरपणा आणला हे खरे असले तरी संघ परिवाराशी नाते ठेवणार्या कडव्या शक्तींच्या दबावाखाली ते येणार असतील तर हे त्यांचे गुण व्यर्थ टरतील. त्यांच्या बहुसंख्य मतदारांनाच ते आवडणार नाही. ८०च्या दशकातील गांधीवादी समाजवादीचा बुरखा मोदींनी घेऊ नये, पण गोडसेंना देशभक्त ठरविण्याची भाषा बोलणार्यांच्या कह्यातही जाऊ नये. कदाचित याच कारणांमुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर आश्चर्य वाटायला नको.(पूर्ण)
गांधीवादी समाजवाद ते देशभक्त (?) गोडसे, भाजपाचा हतबल प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 9:32 PM