संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे. प्रात:स्मरणात गांधींचे नाव घेतले की मग सारा दिवस संघ आणि त्यांचे स्वयंसेवक गांधींविषयी भलेबुरे बोलायला मोकळे होतात. मोदी संघ स्वयंसेवक आहेत. ते गांधीजींच्या समाधीचे राजघाटावर जाऊन दर्शन घेतात मात्र त्याचे कारण त्यांना गांधींविषयी प्रेम आहे म्हणून वा गांधीजींच्या चरित्रावर ते विश्वास ठेवतात म्हणून नव्हे. तर गांधीजी जन्माने गुजराती आहेत आणि गुजरातमध्ये संघाचे सरकार असले तरी गुजराती जनतेची गांधीजींवर अपार श्रद्धा आहे म्हणून. मात्र तेवढ्यासाठी स्वातंत्र्याच्या लढ्याचा लोकेतिहास व त्याला गांधीजींचे लाभलेले तेजस्वी नेतृत्व जनमानसातून पुसून टाकण्याच्या संघाच्या उद्योगांपासून ते दूर नाहीत. त्यांनाही तसे झालेले हवे आहे. एकप्रकारे त्याचा जिवंत दाखलाच खादी ग्रामोद्योग आयुक्तालयाने आता सादर केला आहे. आयुक्तालयाच्या वतीने दर वर्षी एक दिनदर्शिका जारी केली जाते आणि तिच्यात चरख्यावर सूत कातणाऱ्या गांधींजींचे चित्र असते. पण यंदाच्या वर्षी जी दिनदर्शिका जारी करण्यात आली आहे, तिच्यातील चित्रामध्ये गांधीजींचे स्थान चक्क नरेंद्र मोदी यांना बहाल करण्यात आले आहे. त्यामागील कारण कोणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी जनतेला एकत्र करून तिला पेलता येईल असे सत्याग्रहाचे हत्यार तिच्या हाती देणे व तिला इंग्रजांविरुद्धच्या लढ्यातील सैनिक बनविणे हा गांधीजींनी घडविलेला चमत्कार जोपर्यंत लोकांच्या मनात आहे तोपर्यंत संघाला स्वत:ची दैवते जनतेच्या मनावर आरूढ करता यायची नाहीत. लो. टिळकांनी संघटित केलेला राष्ट्रीय असंतोष आणखी तीव्र करण्याचे व त्याला लोकलढ्याचे स्वरूप देण्याचे जे कार्य गांधीजींनी केले त्याला जगात तोड नाही. रिचर्ड अॅटनबरो या जगविख्यात दिग्दर्शकाने गांधीजींवर जो अप्रतिम चित्रपट काढला त्याचे चित्रीकरण काही काळ पनवेलजवळ सुरू होते. त्या चित्रपटातून टॉलस्टॉय आश्रमाची प्रतिकृती त्या जागी उभारली होती. त्यावेळी अॅटनबरोंची मुलाखत घेताना प्रस्तुत लेखकाने त्यांना प्रश्न विचारला, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते साऱ्या जगात झाले. अमेरिकेत वॉशिंग्टन, इंग्लंडात क्रॉमवेल व नंतर चर्चिल, रशियात लेनिन, चीनमध्ये माओ. एवढे सारे नेते जगाच्या पातळीवर असताना तुम्हाला गांधींवरच चित्रपट काढावा असे का वाटले’? अॅटनबरोंनी त्याला उत्तर देताना जे उद्गार काढले ते आजही साऱ्यांनी आपल्या हृदयावर कोरून घ्यावे असे आहेत. ते म्हणाले ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी वा स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घेऊन पुढे झालेले नेते जगात सर्वत्र झाले, मात्र हाती शस्त्र न घेणारा व आपल्या अनुयायांनाही नि:शस्त्र राहण्याचा आदेश देऊन स्वातंत्र्यासाठी लढणारा नेता फक्त तुमच्याच देशात झाला म्हणून’. नेमकी जी गोष्ट अॅटनबरोला भावली आणि जी नौरोजी, गोखले आणि टिळक यांच्यापासून गांधीजींपर्यंत परंपरेने आली तीच संघाला त्याच्या शस्त्रपूजनाच्या परंपरेमुळे मान्य नाही. त्यामुळे गांधीजींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्याचा लढा आणि त्यात सहभागी झालेला देशातील सामान्य माणूस हा संघाला त्याच्या गौरवाचा वा अभिमानाचा विषय कधीच वाटला नाही. व्यक्तिगत पराक्रम, एकेकट्याने केलेला त्याग व त्यासाठी झालेल्या भूमिगतांच्या तुटक चळवळी यांची त्याने आजवर प्रशंसा केली. हा मतभेदाचा मुद्दा नाही. तो प्रकृती भेदाचा परिणाम आहे. त्यामुळे गांधीजींचे ज्या कोणाशी जराही मतभेद झाले त्यांची तळी उचलणे व त्यांची थोरवी गाणे ही संघाची आजवरची परंपरा राहिली. जे गांधींवर टीका करीत होते वा त्यांच्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाखातर दूर होते एवढेच कारण त्या साऱ्यांना जवळचे मानायला संघाला पुरेसे वाटत आले आहे. सरदार पटेल हे गांधीजींचे सर्वात जवळचे व विश्वासू सहकारी होते. मतभेद बाजूला सारूनही ते सदैव गांधीजींच्या सोबत राहिले. गांधीजींच्या खुनात संघविचाराचा भाग आहे ही बाब सरदारांना मान्य होती. त्यासाठीच गृहमंत्री असताना त्यांनी संघावर बंदीही घातली होती. आज मात्र संघ आणि मोदी ‘सरदारांवर गांधीजींनी, त्यांना पंतप्रधान न करून अन्याय केला’ असे सांगताना दिसत आहेत. (सरदारांवरील आपले ताजे प्रेम दाखविण्यासाठी ते गुजरातच्या समुद्रात सरदारांचा जगात सर्वात उंच पुतळा उभारत आहे. तीन हजार कोटी रुपयांचा हा पुतळा सध्या चीनमध्ये तयार होत आहे ही गोष्ट त्यांच्या स्वदेशीत बसणारी आहे असेही त्यांचे मत आहे.) वास्तविक स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी सरदारांचे वय ७२ वर्षांचे होते व त्यांचे शरीर विविध आजारांनी आणि व्याधींनी जर्जर होते. १९४५ पासूनच त्यांच्या आजाराने मोठी उचल खाल्ली आणि मार्च १९४८ मध्ये (गांधीजींच्या खुनानंतर अवघ्या दीड महिन्यातच) त्यांना हृदयविकाराचा जबर धक्का आला. आपल्या आजाराची बाब लक्षात घेऊनच सरदारांनी १९३६ पासून दरवेळी आपल्याहून १४ वर्षांनी लहान असलेल्या नेहरूंचे नाव नेतृत्वासाठी पुढे केले होते, हे वास्तव संघाचे प्रचारक सांगत नाहीत. न सांगोत बिचारे. मात्र इतिहासाचे विडंबन त्यांनाही करता येणार नाही. गांधीजींचे छायाचित्र काढून टाकून जनमानसावरील गांधीजींची छाप त्यांना मिटविता येणार नाही. दिनदर्शिकेत गांधी असोत वा नसोत ते जनतेच्या मनात सदैव राहणारच आहेत.
छायाचित्र हटवून गांधी पुसता येणार नाही
By admin | Published: January 14, 2017 1:09 AM