चि. गणेशासाठी महादेव शंकर टिळकांशी भांडतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:57 PM2018-09-18T12:57:32+5:302018-09-18T12:59:14+5:30
आजच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपावर मार्मिक भाष्य करणारी रचना...
>> ज्योतिर्मय टोमणे
कैलासावर परवा म्हणे भगवान शंकर लोकमान्यांशी भांडला,
देव्हाऱ्यातला देव टिळक तुम्ही रस्त्यावर का हो आणला?
पृथ्वीवर जायला गणेश खूप खूश असायचा,
दहा दिवस पाहुणचार घेऊन हसत हसत परतायचा...
पार्वतीलाही नव्हती चिंता, उलट थोडा आरामच होता,
मुलाचं कोडकौतुक पाहून, आईला आनंदच होत होता...
महानैवेद्य, महाआरत्यांचा भक्त घालायचे घाट,
गणरायाचा आमच्या वेगळाच होता थाट...
टाळ-मृदंगांचा ताल होता, नव्हता बेन्जोचा दणदणाट,
साधीच असायची आरास, नव्हता दिखाऊ झगमगाट...
उकडीचे २१ मोदक त्यावर साजूक तुपाची धार,
सखेसोयरे जमल्यावर नसायचा आनंदाला पारावार...
आता तर गणेशोत्सव आला की धडकीच भरते,
बाळाच्या काळजीने माता पार्वतीही गलबलते...
गणेशाचा पाय कैलासावरून निघत नाही,
बाबुराव, शांताबाईच्या भीतीने म्हणतो, नाही जात गं आई!
पण बिच्चारा पडला देव, न जाऊन चालेल कसं?,
त्याला निरोप देताना आम्हाला होतं कसंनुसं...
चौदा विद्यांच्या अधिपतीला करून टाकलंय गल्लीचा राजा,
दिवसरात्र सुरू असतो शूर्पकर्णांपाशीच बँडबाजा...
तो जाणतो ६४ कला, पण तुम्ही करता नुसता कल्ला
नृत्य करा, गाणी गा, पण बरा नाही हा हल्ला...
गणेशभक्तांची वाढतेय संख्या, लांबच लांब लागताहेत रांगा,
ह्यांना एवढंच विचारायला हवं, का भुलता रे वरलिया रंगा?
गणपती आहे लाडाचा, भक्तांची श्रद्धाही आहे खरी,
पण त्यासाठी जायलाच हवं का हो 'राजा'च्या दारी?
देव भक्तीचा भुकेला, देव बुद्धीची देवता,
उंचीवरून का मोजता त्याच्या शक्तीची क्षमता?
महादेवाचं म्हणणं ऐकून टिळक महाराज खजिल झाले,
'करायला गेलो एक' म्हणत खिन्नपणे खाली बसले...
स्वराज्यासाठी केला होता, देवा सारा अट्टहास,
आजचा उत्सव पाहून खरंच होतो मलाही त्रास...
ह्यांना विचारावंसं वाटतं डोकं ठिकाणावर आहे काय?,
एक प्रश्न सतत पडतो, सुराज्याबाबत माझंच चुकलं की काय?
लोक जमतात लाखांनी, पण कुठे होतेय जनजागृती,
उलट गर्दी पाहून वाटत राहते अपघात-घातपाताची भीती...
इतक्यात बाप्पा आला बाहेर, टिळकांना पाहून आनंदला,
मंगलमूर्तीच्या दर्शनाने लोकमान्यांचाही चेहरा फुलला...
ओळखून टिळकांच्या मनीचे भाव देवाने दिला धीर,
तुमचं काहीच चुकलेलं नाही नका होऊ अधीर...
तुमचा हेतू उदात्त होता, मनात नाही जराही राग,
उलट, तुमच्यामुळेच घेऊ शकलो स्वातंत्र्यलढ्यात सहभाग...
आजच्या गणेशोत्सवाच्या रूपाला नाही तुम्ही जबाबदार,
काळजी नसावी... बंद होईल हा भक्तीचा बाजार...
गर्दी, उंची, दिखाऊगिरीवर लिहिलं जातंय बरंच काही,
हळूहळू संपुष्टात येईल उत्सवातली राजेशाही...
चला आता जाऊन येतो पाहताहेत सारे वाट,
आता दहा दिवस एकच स्टेटस, झालंय झिंग झिंग झिंगाट!
(रेखाचित्रः अमोल ठाकूर)