किरण अग्रवाल
माणुसकी शिल्लक आहे का, असा प्रश्न उपस्थित होण्यासारख्या घटना नित्य वाढू लागल्या असताना गजानना श्री गणरायाचे आगमन झाले आहे. त्यांच्या आगमनाने व्यवस्थेतील विघ्ने तर दूर व्हावीच, शिवाय कुंठीत होऊ पाहणाऱ्या मानसिकतेत मांगल्याची ज्योत तेवावी, हीच प्रार्थना!
संपूर्ण खान्देशसाठी वरदान ठरणाऱ्या नारपार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची मंगलवार्ता घेऊन बाप्पांचे आगमन झाले आहे. या आगमनावेळी बाप्पांचाही प्रवास रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे खडतर झाला असेल, तेव्हा आता त्यासाठी बाप्पांनीच संबंधितांना सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा गैर ठरू नये.
निवडणूक तोंडावर असल्याने यंदा बाप्पांचे आगमन धडाक्यात झाले आहे. तसेही श्रावण संपून गणेशोत्सव आला, की त्यापुढे सर्व सणावारांचा कालावधी असतो. सर्वत्र चैतन्याचा माहोल आणि मांगल्याचीच बरसात असते. अशात निवडणूक समोर असली की विचारायलाच नको. मंडळांच्या वर्गणीची सोय होते आणि नेत्यांच्या जनसंपर्काची. अर्थात तसे का असेना, बाप्पांच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्य ओसंडून वाहते आहे. या श्रद्धेच्या व आनंददायी कार्यात सहभागी होत जनसंपर्काची संधी घेणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून जनता जनार्दनाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा आहे.
जळगावच नव्हे, तर संपूर्ण खानदेशातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न खूपच बिकट बनला आहे. गेल्यावेळी याच स्तंभात यासंबंधीची चर्चा करून झाली आहे. त्यानंतर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरा, पण गुन्हेच दाखल होणार असतील तर दुरुस्ती कशाला करायची; असा विचार होऊ नये म्हणजे झाले. बाप्पांच्या दर्शनासाठी ग्रामीण भागातून अनेक जण कुटुंबासह शहरात येत असतात. त्यांची ही वाट सुकर व्हावी म्हणून बाप्पांनीच संबंधितांना सुबुद्धी द्यावी.
महत्त्वाचे म्हणजे, अलीकडे कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातून पोलिसांकडे गुदरल्या जाणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे. भाऊबंदकीत खुनाचे प्रकारही पुढे आले आहेत. 30 लाख रुपयांसाठी परिचीतांनीच एका सेवानिवृत्त परिचारिकेचा खून करून तिचा मृतदेह नदीत फेकून देण्याची घटना नुकतीच समोर आली आहे. इतकेच कशाला; पोटच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पित्याच्या तक्रारीवरून आईवर गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर ओढवली आहे. कुठे शिल्लक आहे नातेसंबंधातील आपुलकी व माणसा माणसांमधील माणुसकी, असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घटना प्रतिदिनी घडत आहेत. विषण्ण करणारे सारे वातावरण आहे. ही अमंगलकारी मानसिकता बदलण्याची सुबुद्धी बाप्पा आपण द्यावी, कारण कायद्याला आता फार कोणी मनावर घेईनासे झाले आहे.
दुर्दैव असे की, समोर अन्याय अत्याचार होत असताना तो निमुटपणे बघून त्याचा व्हिडिओ बनविणारे वाढले आहेत; पण गैरप्रकाराला कोणी रोखतांना दिसत नाही. विद्वत्तेचा व समाजाच्या पुढारपणाचा ठेका घेतल्यागत स्वतःला मिरवणारे वाईटावर मोठ्या अहमहमिकेने चर्चा करतात, मात्र चुकणाऱ्याला त्याची चूक लक्षात आणून देण्याचे धाडस दाखवताना दिसत नाहीत. अनेकांचे मन अनेक कारणास्तव आक्रंदीत आहे, पण बधिरता आलेल्या समाजाला त्या वेदना कळताना दिसत नाहीयेत.
समाजात वाढीस लागलेली ही निबरता, निर्ढावलेपण कसे दूर करता येईल हाच खरा प्रश्न आहे. या बाबी मानसिकतेशी निगडित आहेत. मी व माझ्यातले गुंतलेपण वाढत चालल्याने इतरांबद्दलची बेफिकिरी ओढवली आहे. आपलाच गुंता आपल्याला सोडवता येईनासा झाल्यावर इतरांकडे कोण कसे लक्ष देणार? मोबाईलवरील सोशल मीडियातल्या गुरफटलेपणात खरी सामाजिकताच ध्वस्त होऊ पाहते आहे. वास्तवातल्या जगण्यापेक्षा आभासीपणात सुखा समाधानाचे शोध घेतले जाऊ लागले आहेत. तेव्हा यासंदर्भातले मानसिक बदल बुद्धीदात्या बाप्पालाच घडवून आणावे लागतील.
सारांशात, प्रश्न फक्त व्यवस्थेचेच नसून मानसिकतेचेही आहेत. सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षिततेसाठी मानसिकतेतीलच बदल गरजेचा आहे. बाप्पा गणराया हे बुद्धीदाता आहेत, तेव्हा बाप्पांनीच आता सुबुद्धी द्यावी आणि माणसातली माणुसकी जागवावी अशी प्रार्थना आहे.