Ganpati Festival 2018 : गणेशोत्सव होवो गुणोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 09:51 PM2018-09-13T21:51:05+5:302018-09-13T21:58:04+5:30
‘सकलमतिप्रकाशु’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी मंगलमूर्ती गणरायाचे सार्थ वर्णन केले आहे. ओंकार स्वरूपाच्या उत्सवाचे स्वरूप आज बदलताना दिसते आहे. गणांचा, समूहांचा हा उत्सव गुणांचाही महोत्सव व्हावा, ही आजच्या काळाची गरज आहे. विद्या, कला, साहित्य, संस्कृती, ऊर्जा आदी अनेकविध गुणांचा हा तेजोनिधी आहे.
विजय बाविस्कर
गणपती आणि गुणपती असलेल्या मंगलमूर्ती गणरायाचे आगमन झाले. महाराष्ट्रात हजारो गणेशोत्सव मंडळांकडून सार्वजनिक स्तरावर, तसेच घराघरांतूनही ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात होत आहे. सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गजाननाचे आगमन आनंद, उत्साह निर्माण करणारे, उमेद व सद्भाव वाढविणारे तसेच सकलजनांची विघ्ने हरण करणारे आहे. दैनंदिन जीवनातील समस्यांनी मेटाकुटीस आलेल्या सामान्य माणसाच्या मनात नवी उमेद जागविणारे आहे. गणपतीचे आगमन म्हणजे सर्जनशीलतेच्या उत्सवाचे स्वागत करणे आहे. चैतन्याचे पाझर आणि भक्तीचे निर्झर समाजमनात प्रवाहित करणारे हे शुभागमन आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष दहा दिवस सर्वत्र निनादत राहणार आहे. सकल कलांचा अधिपती असलेला हा विद्याधिपती मानवी संस्कृती अधिक प्रगल्भ करणारा, विधायक प्रेरणा जागवणारा आहे. लोकमान्य टिळकांनी जाणीवपूर्वक या उत्सवाचे बीजारोपण समाजमनात केले. सामाजिक, सांस्कृतिक जाणीवा विकसित करत असतानाच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या उत्सवाने केले आहे. अमाप उत्साहाचा हा लोकोत्सव प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा घेऊन आता जगभरात उभा राहिला आहे. सर्व समाज एकसंध राखण्याची या उत्सवाने निर्माण केलेली भूमिका आजही तितकीच मोलाची आणि गरजेची आहे.
‘सकलमतिप्रकाशु’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी मंगलमूर्ती गणरायाचे सार्थ वर्णन केले आहे. ओंकार स्वरूपाच्या उत्सवाचे स्वरूप आज बदलताना दिसते आहे. गणांचा, समूहांचा हा उत्सव गुणांचाही महोत्सव व्हावा, ही आजच्या काळाची गरज आहे. विद्या, कला, साहित्य, संस्कृती, ऊर्जा आदी अनेकविध गुणांचा हा तेजोनिधी आहे.
गणपती हा जसा गणाधिपती आहे, तसाच तो गुणाधिपतीही आहे, याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. कोणताही अनाचार, दुराचार या काळात होणार नाही, यासाठी सर्व घटकांनी सजग आणि सतर्क राहायला हवे; नव्हे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या ज्या पुण्यातून आणि महाराष्ट्रातून गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला, त्याच पुण्यातील व महाराष्ट्रातील आजचे सार्वजनिक जीवन चिंता वाटायला लावणारे आहे. सध्याचे एकूणच वातावरण अस्थिरतेचे, दहशतीच्या सावटाखालचे आणि महागाईने होरपळून टाकणारे आहे. सामाजिक अभिसरण घडवणारा हा उत्सव म्हणूनच आजच्या काळाची गरज आहे. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चा प्रत्यय गणरायाच्या आराधनेतून मिळो आणि समाजाचा भविष्यकाल अधिकाधिक उज्ज्वल, समृद्ध होवो, हीच श्रीगजाननाच्या चरणी प्रार्थना!
(लेखक लोकमत पुणे अावृत्तीचे संपादक आहेत.)