- दिलीप तिखिलेराजधानी दिल्लीचा नंबर वन डॉन कोण...? पीएम मोदी की सीएम केजरीवाल...?? सध्या दिल्लीकर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात व्यस्त आहेत. अर्थात मोदीभार्इंचे नेटवर्क नॅशनल पातळीवर असल्याने तेच नंबर वन आहेत असे म्हणता येईल. त्या तुलनेत केजरीभार्इंची दादागिरी दिल्लीपुरतीच. पण केजरीभार्इंना हे मान्य नाही. गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला पाणी पाजल्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे. ‘दिल्ली मेरी है, और यहा मेरा ही राज चलेगा’ असे म्हणत त्यांनी अख्ख्या राजधानीत धुमाकूळ घातला आहे.गेल्या आठवड्यात तर हद्दच झाली. ‘घरमे घुस के मारुंगा’ च्या आवेशात त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल बैजल यांच्या घरातच धरणे, उपोषण सुरू केले. एक, दोन दिवस नाही तर तब्बल नऊ दिवस त्यांचे शासकीय निवासस्थान त्यांनी वेठीस धरले.बैजलही मोठे वस्ताद. मोदीभार्इंचेच शागिर्द. त्यांनीही मग निरोप पाठविला... केजरीभाई...मेरे अड्डेपे तो खुद चलकर आये मगर जाओंगे कैसे सोच लो...!...आणि बैजल यांची ही गर्भित धमकी खरीही ठरली. सिसोदियांना स्ट्रेचरवरूनच रुग्णालयात न्यावे लागले तर बाहेर पडताना केजरीभार्इंचेही बेहाल होते.या दोन गँगच्या भांडणात इकडे सुनीता वहिनी (मिसेस केजरीवाल) मात्र परेशान. आज येतील, उद्या येतील म्हणून रोज बिचाऱ्या लिंबूूपाणी करून ठेवायच्या. पण कसलं काय!... स्वारी नवमी करूनच अवतरली, आणि तेही बेहाल अवस्थेत.आल्याआल्याच केजरीभार्इंनी कपाटातले मफलर काढून डोक्याला बांधले आणि सुनीता वहिनींशी काही न बोलता कॉटवर अंग झोकले.आता मात्र वहिनींना राहावले नाही. गेले नऊ दिवस माझ्या डोळ्याला डोळा नाही आणि हा बुवा एक शब्द न बोलता चक्क झोपतोय...वहिनी : काय अजून मौन सुटले नाही वाटते?भाई गप्पच...वहिनी : मी काय म्हणते, कशाला दुसºयाच्या घरात घुसून धरणे, उपोषण करायचे. रस्त्यावर बैठका मारता ते तमाशे पुरे नव्हेत का?भार्इंचे ‘हु का चू’ नाही...वहिनी : आता समजले...लोक तुम्हाला चक्रम म्हणतात...ते उगाच नाही. रस्त्यात बसून धरणे देणे. कुण्याच्या घरात घुसून ठिय्या मारणे, शोभते का तुम्हाला हे. एका राज्याचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही! की अजूनही त्या अण्णांच्या आंदोलनातला एक कार्यकर्ता समजता स्वत:ला.(भाई एव्हाना घोरू लागले...ते पाहून वहिनींचा पारा आणखीच वर गेला...)वहिनी : चांगली नोकरी होती, सोडली... म्हणे, दिल्ली सर करायची आहे. हजारे बुवांना उल्लू बनवून दिल्लीवर झेंडाही फडकवला. पण हाती काय आले. अरे तुमचेच लोक तुम्हाला मानत नाहीत. हाती काही अधिकार नाही. पोलीसही तुमचे नाहीत. एवढेच काय तिजोरीची किल्लीही हाती नाही... म्हणे माझी दिल्ली.(कॉटवरून अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद नाही. वहिनींचा पट्टा चालूच...)...माझंही चुकलंच म्हणा...तुमच्या नादी लागून मी माझीही नोकरी सोडली. पण, इलाजही नव्हता. तुम्ही आपले रोज मोदीभार्इंच्या नावाने बोंबा मारायच्या आणि मी त्यांच्या सरकारात नोकरी करायची...कसं चालणार?वहिनींच्या तोंडून मोदीभार्इंचे नाव निघताच केजरीभाई मात्र दचकून उठले, आणि एकच वाक्य बोलले... चला...तयारी करा, बेंगळुरूला जायचे आहे उपचारासाठी.
राजधानी दिल्लीतलं ‘गँगवॉर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:54 AM