- श्रीनिवास नागे (वृत्तसंपादक, लोकमत, सांगली)
स्टेजसमोरचं पब्लिक चेकाळलेलं. ग्राऊंडमध्ये तरण्या पोरांचा नुसता राडा. शिट्ट्या घुमायला लागलेल्या. डिमांडवर डिमांड. त्यातच गाणं वाजायला लागतं, ‘राऽऽती, अर्ध्या राती, असं सोडून जायाचं न्हाय...’ ती पब्लिककडं नजर टाकते. केसाची लडीवाळ बट उडवते... अन् ‘राऽऽती, अर्ध्या राती...’वर कंबर हलवायला सुरुवात करते. खल्लास! काळजाची झुंबरं हलतात. ‘सबसे कातील, गौतमी पाटील’च्या थेट आव्हान देणाऱ्या, घायाळ करणाऱ्या मादक अदांवर, फॅशनवर पोरं जीव ओवाळून टाकायला लागतात. डान्सचं, नखरेल ठुमक्यांचं गारूड दिसू लागतं. मध्येच ती मांडीवर शड्डू ठोकते. खुणेनंच शिट्ट्या वाजवायला सांगते. पब्लिक बेफाम नाचायला लागतं. स्टेजजवळ येऊन घिरट्या घालायला लागतं. उरात धडकी भरवणारा डीजेचा आवाज. गर्दी उसळते. चेंगराचेंगरीही. उतावळी पोरं, आंबटशौकीन स्टेजवर घुसायला बघतात; पण तगडे बाऊन्सर्स त्यांना मागं रेटतात. मग पोलिस पब्लिकमध्ये घुसतात, काठ्या चालवतात. जमाव मागं सरकतो...
फारच गडबड झाली तर कधी पोलिस कार्यक्रम बंद करायला लावतात, तर कधी आयोजकच डीजे बंद करतात. तोपर्यंत तिच्यापायी पोरांच्या हाणामाऱ्या होऊन गेलेल्या असतात. गेल्या सात-आठ महिन्यांपासून सबंध मराठी मुलुखात गौतमी पाटीलनं धुमाकूळ घातलाय. दहीहंडीपासून नवरात्रापर्यंत अन् गावातल्या यात्रा-जत्रांपासून ऊरूसापर्यंत... रांगायला लागलेल्या पोरांच्या, भाईच्या ‘बड्डे’पासून गावपुढाऱ्यांच्या बैलगाडी शर्यतीपर्यंतचं निमित्तही कमी पडतंय, तिच्या डान्स शोसाठी. पुढच्या सहा महिन्यांच्या तिच्या तारखा फुल्ल! एकेक सुपारी दीड-दोन लाखाची. मूळ खानदेशातल्या या बिजलीनं पुणे- कोल्हापूर- नाशिक- सोलापुरात वांड दंगा घातलाय. लावणी शो, ऑर्केस्ट्रातून बॅक डान्सर म्हणून नाचणारी अठ्ठावीस वर्षांची गौतमी सप्टेंबरमध्ये अचानक ‘फेमस’ झाली. ‘राऽऽती, अर्ध्या राती’ गाण्यावर तिनं अश्लील हावभाव केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. गाणं सादर करताना अंगावर पाणी ओतून घेतानाचा एक व्हिडीओ आला अन् अवघ्या महाराष्ट्राला तिचं नाव कळलं. तिच्या डान्सचे व्हिडीओ, रिल्स ट्रेंडिंगमध्ये आले. त्याचवेळी तिच्या डान्सवर, हावभावांवर आक्षेप घेण्यात आले. अदाकारी अश्लील असल्यानं नेटकऱ्यांनी धारेवर धरलं. काही ‘शो’मध्ये हुल्लडबाजी झाली.
मग लावणी कलावंत मेघा घाडगे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली, ‘गौतमी, खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हतं. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं? का या शाहिरांनी कवनं लिहिली? का पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला? विनाकारण लोककलावंतांनी पिढ्यान् पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेतले. आता माझे डोळे उघडले. मीही यापुढं पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओलीचिंब होईपर्यंत ओतेन. पायात घुंगरू घालू की नको? लक्षात नाही, तू घातले होतेस का? आम्ही आपले बसलोय अदाकारीची शिबिरं करत. कृपया मला हे सगळं शिकव. मला तुझी शिष्य बनवशील का? कारण आम्हालाही जगायचं आहे. कलेनं पोट भरत नाही हे कळून चुकलंय.’
- या पोस्टमागोमाग टीकेचा आगडोंब उसळताच गौतमीनं स्वत:हून माफी मागितली. एकदा नव्हे तीनदा! त्यानंतर तिनं अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स टाळण्यास सुरुवात केली. पब्लिक मात्र ते गाणं सुरू झालं की, अजूनही डिमांड करतं त्या स्टेप्सची. ती जीभ चावते, कानाची पाळी पकडते अन् मान हलवून नकार देते; पण तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबताना दिसत नाही.‘ही लावणी आहे का?’, असा सवाल करत जेव्हा नाक मुरडलं जातं, तेव्हा गौतमी हसते. हात जोडते. ‘पब्लिकला हवं ते नको का द्यायला’, हा प्रतिसवाल तिच्या मुखड्यावर असतो. ‘प्रेक्षकशरणता कोणत्या कलेत नाही दादा?’- असं ती विचारेल का, असंही वाटून जातं.यमुनाबाई वाईकर, शकुंतला नगरकरांची बैठकीची पारंपरिक, घरंदाज लावणी मागं पडून तमाशातली खडी लावणी लोकनाट्यांनी पॉप्युलर केली. खडी लावणी तमाशाच्या कनातीतच अडकलेली; पण पंचवीस वर्षांपूर्वी सुरेखा पुणेकर, संजीवनी मुळे-नगरकर, माया जाधव, छाया-माया खुटेगावकर त्यानंतर मेघा घाडगेंसारख्या नृत्यांगनांनी ती थिएटरमध्ये आणली. खास बायकांसाठी शो होऊ लागले. सीडी-डीव्हीडींचा रतीब सुरू झाला. मग थिएटरमधल्या ‘लावणी शों’चं पेव फुटलं. सळसळत्या तारकांनी नाव कमावलं. पब्लिकला खूळ लावलं. विठाबाई भाऊ मांग-नारायणगावकर, कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, संध्या माने-करवडीकर यांचे पारंपरिक लोकनाट्यांचे तंबू गुंडाळले जात असताना नव्या फटाकड्या पोरी लावणी शो करू लागल्या.
कमाई करू लागल्या, पब्लिकला कशावरही नाचायला भाग पाडू लागल्या. ‘पब्लिकला पाह्यजे’ अशी मखलाशी करत श्रृंगार रसाची वाटचाल बिभत्स रसाकडं होऊ लागली. अशा ‘शो’मधल्या आयटम साँगच्या दणदणाटात लावणी हद्दपार झाली. घुंगरांनी ढोलकीची साथ सोडली. लोककलेची शालीनता संपली, ती सवंग झाली! प्रेक्षकांचा दर्जा खालावला, पिटातला प्रेक्षक वाढला, असं एकीकडं दिसायला लागलं तरी या अधोगतीला प्रेक्षकांच्या आहारी गेलेले लोककलावंतही तितकेच जबाबदार ठरू लागले.गौतमीचे अर्ध्या-एक मिनिटांचे रिल्स, व्हिडीओ बघून ‘महाराष्ट्राचा यूपी, बिहार झालाय का?’ असं ट्रोलिंग होत असताना ‘महाराष्ट्राची सपना चौधरी’ असं बिरूदही ती मिरवते आहेच. ‘लावणी’च्या नावाखाली डान्स-स्टेज शो झालाय, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे तर अळवावरचं पाणी, जास्त दिवस टिकणार नाही, असं कोकलणारेच तिचे रिल्स गुपचूप बघताहेत. राजकीय मंडळी मिसरुड फुटलेल्या पोरांची गर्दी खेचण्यासाठी गौतमीला बोलवताहेत... अन् ती बाकीच्यांची सद्दी संपवत पोरांना नाचवतेय, ‘सरकार तुमी केलंय मार्केट जाम’च्या तालावर!- सध्यातरी आहे हे असं आहे!
(या चर्चेत सहभागी होण्यासाठी गौतमी पाटील यांच्याशी अनेकदा संपर्क करण्यात आला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.)