यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् या ओळींसोबतच ...बेटा विनोद...च्या हाकेने विनोदभाऊ दचकून जागे झाले. उठत असतानाच त्यांचा हात पलंगाला लागून असलेल्या टेबलवरील मोबाईलकडे गेला... पण मोबाईल शांत होता, तरीपण अर्धवट झोपेत असलेल्या भाऊंनी तो कानाला लावून ...एस सर..! म्हणूनच टाकले.एवढ्यात पुन्हा तोच धीरगंभीर आवाज.वत्सा, विनोद... तो मोबाईल खाली ठेव आणि इकडे बघ...एव्हाना भाऊ झोपेतून पुरते जागे झाले होते. त्यांनी आवाजाच्या दिशेने बघितले...पाहतो तो काय, पुढ्यात साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे. महाभारतात कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ज्या विराट रूपाचे दर्शन घडवले, अगदी त्याच रूपात. ते रूप पाहून विनोदभाऊ पलंगावरून उडी मारूनच भगवंताच्या चरणी लीन झाले.धन्य झालो भगवंत...पार्थानंतर या पृथ्वितलावर तुमचे विराट रूप बघण्याचा मान केवळ मलाच मिळाला. बास्स् एक रिक्वेस्ट आहे... या रूपात तुमच्यासोबत एक सेल्फी घेऊ द्या! हा फोटो सर्व पाठ्यपुस्तकांच्या मुखपृष्ठावर छापून टाकतो. एवढे बोलून भाऊंनी मोबाईल हातातसुद्धा घेतला. प्रत्येक गोष्टींचे भांडवल करणाऱ्या या पोलिटिकल वत्साला कोणत्या भाषेत झापावे हे क्षणभर भगवंतालाही उमजले नाही. काहीशा नाराजीच्या सुरातच ते म्हणाले, ठेव तो मोबाईल... मी येथे सेल्फी काढायला आलो नाही तर तुमच्या ‘सेल्फिश’ राजकारणाचा जाब विचारायला आलो आहे.सर...काही चुकले का आमचे? -विनोदभाऊभगवंत : ते सांगतो नंतर, पण आधी मला हे सांग...हे सर...सर, काय लावले. मघासुद्धा मी आवाज दिला तेव्हा मोबाईल उचलून ‘एस सर...’ म्हणालास.विनोदभाऊ : त्यावेळी मी झोपेत होतो सर...सॉरी.. भगवंत. मला वाटलं वर्षावरून फोन आहे. संवयीने निघून गेले ‘एस सर’भगवंत : बरं आता मुख्य मुद्याकडे वळू. ही भगवद्गीता कॉलेजमध्ये वाटण्याचे राईटस् कुणी दिले तुम्हाला? मी महाभारतात काय म्हणालो होतो...यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत कअभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् कयाचा अर्थ ठाऊक आहे...?विनोदभाऊ : हो..सर..आय मीन भगवंत.जेव्हा-जेव्हा धर्म संकटात येईल, अधर्माची वृद्धी होईल तेव्हा-तेव्हा मी साकार रूपाने प्रकट होईल.भगवंत : मग...बुडाला धर्म? केवळ बीजेपी संकटात आहे म्हणजे संपूर्ण हिंदुत्व संकटात आहे, असे वाटते काय तुम्हाला? आणि असं काही असतं तर दिलेल्या वचनाप्रमाणे मीच प्रकट होऊन भगवद्गीता सांगितली असती सार्वांना. ही गीता वाटण्याचे उपद्व्याप का? (भगवंताच्या भडिमाराने भाऊ गांगरून गेले.)विनोदभाऊ : कसं सांगू भगवंत...धर्म बुडाला नाही हे खरंच. पण ‘आॅफ द रेकॉर्ड’ सांगतो. बीजेपी संकटात आहे एवढे नक्की? म्हणूनच हा छुपा अजेंडा.भगवंत : कसला छुपा अजेंडा. मध्येच ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणता...दिले प्रभू रामचंद्राला घर? ते आपले ‘कुणी घर देता का घर’ म्हणून सतत पाटेकरी आवाजात विचारतात? बांधले अयोध्येत राममंदिर?काही नाही...मी आपला म्हणत राहतो...कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...आणि तुम्ही...२०१९ च्या निवडणुकात फलप्राप्ती व्हावी म्हणून कर्मकांड करीत आहात. एवढे बोलून भगवंत अंतर्धान पावले. आता खरंच मोबाईल वाजला...पलीकडून सांगण्यात आले...उद्या तयार राहा. भगवद्गीतेवरून सभागृहात पुन्हा राडा होऊ शकतो.
यदा यदा हि धर्मस्य...
By दिलीप तिखिले | Published: July 14, 2018 12:13 AM