शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पाकिस्तानचा लष्करप्रमुख कोणाचाच नसतो भाऊ! 'शेजाऱ्यां'ची फरफट अटळ आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:08 PM

भारत, चीन, अमेरिका आणि पाकिस्तान असे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांकडे गांभीर्याने आणि तेवढ्याच संशयाने पाहत आहेत! त्याची कारणे इतिहासात दडली आहेत.

>> संजय आवटे, संपादक, पुणे लोकमत 

झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे पंतप्रधान असताना, त्यांनी अनेक वरिष्ठांना डावलून जनरल झिया उल-हक यांना लष्करप्रमुख तर केलेच, पण 'हिलाल-ए-इम्तियाझ' असे सर्वोच्च पदक देऊन सन्मानितही केले. ही घटना १९७६ची. त्यानंतर अवघ्या वर्षभरात झियांनी लष्करी उठाव केला. भुत्तोंना पदच्युत केले. सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. एवढेच नाही, तर भुत्तोंना फासावर लटकवले. पाकिस्तानी लष्करप्रमुख कोणाचाच नसतो, हे समजण्यासाठी आणखी कोणत्या पुराव्याची गरज नाही. त्यापूर्वीचा अयुबखान यांचा अगदी पहिला अनुभव वेगळा नव्हता. तरीही, नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे आपले आहेत, असे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांना वाटत असेल तर काय बोलणार? जनरल परवेझ मुशर्रफ यांचा अनुभव नवाझ शरीफ विसरले असतील, तर विसरोत बापडे; पण पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे ट्रॅक रेकॉर्ड इतिहास विसरणार नाही. दूर कशाला, मावळते लष्करप्रमुख जनरल बाजवांनीच नवाझ शरीफांची दांडी उडवली आणि इम्रानच्या हातात बॅट दिली. पुढे मात्र त्याच बाजवांनी इम्रानची विकेट काढली. असो.  

लष्कराने अधिकृतपणे पाकिस्तानला तीन वेळा टाचेखाली घेतले. १९५८ ते १९७१. मग १९७८ ते १९८८. आणि, १९९९ ते २००८. गेल्या ७५ वर्षांपैकी ३३ वर्षे अधिकृतपणे लष्करी सत्तेची आहेत. मात्र, सदासर्वकाळ पाकिस्तानवर खरी सत्ता राहिली आहे ती लष्कराचीच! 'भारतापासूनची भीती' हाच पाकिस्तानच्या धोरणविश्वाचा आजवरचा केंद्रबिंदू राहिला आहे. भीती आली की तारणहार येतो. त्यातून लष्कर तारणहार झाले आणि लष्करी टाचांखाली लोकशाही तुडवली गेली. पाकिस्तानी अभ्यासक डॉ. आयेशा सिद्दीका यांनी 'Military Inc: Inside Pakistan's Military Economy' या प्रबंधात केलेली ही मांडणी वारंवार अधोरेखित होत असते. ही नेपथ्यरचना असताना लेफ्टनंट जनरल असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख झाले आहेत. जगातल्या सहाव्या क्रमांकाच्या बलदंड सेनादलाचे प्रमुख असणारे हेच असीम पुलवामा हल्ला झाला, तेव्हा पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे अर्थात आयएसआयचे प्रमुख होते. कॅप्टन अभिनंदन वर्धमान याच्या सुटकेच्या वेळी जे काही नाट्य सुरू होते, तेव्हाही पडद्यामागे असीम मुनीर महत्त्वाचे होते.

पाकिस्तानात सध्या इम्रान खान यांच्याविषयी मोठी सहानुभूती आहे. ती फक्त लोकांमध्ये आहे, असे नाही. लष्करातही आहे. इम्रान आणि असीम यांचे संबंध बरे नाहीत. पाकिस्तानात लवकरच सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. अशा वेळी लष्कराची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे पाकिस्तानातील अभ्यासकांना वाटते. अर्थात, लष्करप्रमुख फक्त लष्कराचे असतात. ते एकमेकांचे आर्थिक हितसंबंध सांभाळतात. मावळते लष्करप्रमुख जनरल बाजवांवर भ्रष्टाचाराचे एवढे गंभीर आरोप आहेत. पण पुढे त्याचे काय झाले॓? उलटपक्षी त्यांचेच 'शिष्य' असलेले असीम लष्करप्रमुख झाले! 'पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेश वेगळा झाला, तेव्हा जे काही घडले, त्याला सरकार जबाबदार होते, लष्कर नव्हे', असे बाजवा नुकतेच म्हणाले आहेत. खरे तर, लष्कराने तेव्हा केलेल्या अत्याचारांच्या कथा जगजाहीर आहेत. लष्कर मात्र फक्त चांगल्याचे श्रेय घेते आणि वाइटाचे खापर लोकनियुक्त नेत्यांवर फोडते.

सीमा सुरक्षित ठेवणे हे लष्कराचे मुख्य काम. पण, पाकिस्तानात देशांतर्गत दहशतवादी हल्ले ही सध्या मुख्य समस्या आहे. बलुचिस्तान, खैबर-पख्तुन्ख्वा, स्वात अशा भागांमध्ये दहशतवादी कारवाया भयंकर वाढल्या आहेत. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आल्यानंतर तर पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पूर्वी पाकिस्तान समजण्यासाठी तीन 'ए' महत्त्वाचे होते. अल्ला, आर्मी आणि अमेरिका. आता तीन 'सी' महत्त्वाचे आहेत. कम्युनलिझम, चीन आणि क्रेडिट! क्रेडिट म्हणजे, चीनने पाकिस्तानला दिलेल्या कर्जावर सध्या तिथली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. एखाद्या बड्या देशावरचे अवलंबित्व हा पाकिस्तानचा 'क्रोनिक' आजार आहे. मुळात, चीनसोबतची युती ही पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान सरकार यांनी संयुक्तपणे केलेली कृती नाही. ती चीन आणि पाकिस्तान यांच्या लष्करांची युती आहे. अशा वेळी असीम लष्करप्रमुख झाले आहेत. आज चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ आहे. नव्या समीकरणांची गरज चीनलाही जाणवत आहे. अमेरिकेची भूमिका बदलली आहे. योगायोग असा की, उपाध्यक्ष होण्यापूर्वी म्हणजे २००६ च्या सुमारास ज्यो बायडन अमेरिकी सिनेटच्या परराष्ट्र संबंध विभागाचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी भारत - अमेरिका संबंधांवर बोलताना असे म्हटले होते की, माझी 'व्हिजन' अशी आहे की, २०२० मध्ये भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र असणार आहेत. आता तर बायडन अध्यक्षच आहेत. बायडन यांची ती भूमिका वेगवेगळ्या निमित्तांनी अधोरेखित होत असते. 

अश्फाक परवेझ कयानी, राहील शरीफ आणि बाजवा यांच्याप्रमाणे असीम हे अमेरिकन वा ब्रिटिश मिलिटरी कॉलेजात शिकले नाहीत. त्यामुळे इतरांप्रमाणे अमेरिकेशी अथवा पाश्चात्य जगाशी त्यांचे बौद्धिक, भावनिक नाते नाही. झिया उल-हक यांची आठवण यावी, असे व्यक्तिमत्त्व या नव्या 'मुल्ला जनरल'चे आहे! जावेद नासीर 'आयएसआय'चे प्रमुख असतानाच, १९९३मध्ये मुंबई बॉम्बस्फोट झाले होते. जावेद नासीर हे कडवे धार्मिक अधिकारी. कट्टर धार्मिक लष्करप्रमुख आणि त्यात पुन्हा 'आयएसआय'ची पार्श्वभूमी हे सगळे लक्षात घेता, लेफ्टनंट जनरल असीम मुनीर भारतासाठी सोपे नसतील, असे अनेकांना वाटते. ते चीनचे झिया उल-हक ठरतील, असेही भय आहे. तर, 'मुल्ला जनरल' असल्याने धर्मांध दहशतवादी गटांना तेच नियंत्रणात ठेवू शकतील, असेही आडाखे बांधले जात आहेत. मूळ मुद्दा मात्र तोच आहे. लष्करप्रमुख बदलले, पण पाकिस्तानच्या धोरणविश्वाचा केंद्रबिंदू बदलत नाही, तोवर पाकिस्तानची फरफट अटळ आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान