अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांचे शपथविधी झाल्यानंतरचे भाषण ऐकणाऱ्यांना व्हाईट हाऊसमध्ये सभ्य पुरुष आल्याचे समाधान वाटेल. गेली चार वर्षे व्हाईट हाऊसमधील नेतृत्व सभ्यपणापासून कोसो दूर होते. लहरी, उतावीळ नेतृत्वाचा तेथे वावर होता. त्या नेतृत्वाच्या ना शब्दांना खोली होती, ना स्वभावाला. अमेरिकेतील गोऱ्या नागरिकांमध्ये भयगंड निर्माण करून, वंशवादी राजकारण रेटण्याची द्वेषपूर्ण आकांक्षा होती. अमेरिकेने ते नेतृत्व झिडकारले आणि बायडेन यांच्यासारख्या सभ्य, सुसंस्कृत नेत्याकडे देशाची सूत्रे दिली. अर्थात, बायडेन यांचा विजय ट्रम्प यांना मान्य नाही. बायडेन यांच्या हाती समारंभपूर्वक सत्ता सोपविण्याऐवजी आधीच व्हाईट हाऊस सोडण्याचा खुजेपणा ट्रम्प यांनी दाखविला. विजय आपलाच होता, बायडेन यांनी तो चोरला याच भ्रमात ट्रम्प अद्याप आहेत. हे मनोरुग्णतेचे लक्षण आहे. दुर्दैवाने कोट्यवधी अमेरिकन ट्रम्प यांच्या बालबुद्धीवर अजूनही विश्वास ठेवतात. ट्रम्प विजयी झाले, बायडेन नव्हे असे मानतात. अमेरिकेमध्ये पडलेली ही मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरचे आव्हान आहे. या आव्हानाला चहूबाजूंनी भिडण्याचा प्रयत्न बायडेन यांनी आपल्या भाषणात केला. अमेरिकेसमोरची आव्हाने त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली. कोविड, मंदावलेली अर्थव्यवस्था, शिक्षणाची आबाळ अशा भौतिक आव्हानांपेक्षा परस्परांचा कमालीचा द्वेष, वाढता वंशवाद, समाजात सर्वदूर पसरलेले भीती व संशयाचे वातावरण, हिंसा आणि संसदेवरील हल्ला या आव्हानांचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला.
अब्राहम लिंकन यांच्या काळात झालेले सिव्हिल वॉर, ९-११चा अमेरिकेवरील हल्ला, दुसरे महायुद्ध, आर्थिक मंदी या अमेरिकेवर याआधी कोसळलेल्या संकटाप्रमाणे आजचे संकट असल्याचे बायडेन यांनी नागरिकांच्या लक्षात आणून दिले. अमेरिका आतून दुभंगली आहे आणि त्यामुळे जगावरील तिचा प्रभाव संपत चालला आहे. याचा परिणाम व्यापारासह अमेरिकेतील सर्व क्षेत्रांवर होणार, हे बायडेन यांना समजले आहे. यामुळेच त्यांचा पहिल्या भाषणाचा सर्व भर हा परराष्ट्रीय धोरणे, कोविडवरील उपाययोजना यापेक्षा दुभंगलेली अमेरिका कशी सांधता येईल, याचे चिंतन करणारा होता. अमेरिकेसमोरील संकटावर बायडेन यांना एकच उपाय दिसतो, तो म्हणजे अमेरिकेचे ऐक्य. अमेरिका एक झाली की, अनेक समस्या सुटतील असे बायडेन म्हणतात. हे ऐक्य आणायचे कसे, तर एकमेकांना समजून घेऊन. एकमेकांचे ऐकू या, एकमेकांशी बोलू या, एकमेकांबद्दल आदर दाखवू या असे सांगून, मतभेद म्हणजे हातघाईची लढाई नव्हे हे त्यांनी लक्षात आणून दिले. मी माझे म्हणणे मांडीन, तुम्हाला ते पटले नाही तरी हरकत नाही. दॅटस् अमेरिका, असे बायडेन म्हणाले. सोशल मीडियाच्या सध्याच्या जगात प्रत्येक जण हातघाईवर आलेला असतो. व्हॉट्सॲपवरील ग्रुपमध्येही हातघाई सुरू असते. कोविडपेक्षा भयंकर अशी ही साथ आहे. बायडेन यांना हे कळल्यामुळे मतभेदामुळे ऐक्याला तडे जाऊ नयेत, असे ते म्हणाले.
बायडेन यांच्या भाषणात अमेरिका, अमेरिका हा जप सातत्याने होता. अमेरिका फर्स्ट हे ट्रम्प यांचे धोरण त्यांनी वेगळ्या व सौजन्यपूर्ण शब्दांत मांडले. वर्णद्वेष संपविणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी करताना अब्राहम लिंकन म्हणाले होते की, माझा आत्मा यामध्ये ओतलेला आहे. बायडेन यांनी लिंकन यांच्या वाक्याचा पुनरुच्चार केला आणि अमेरिकेला एकसंघ करण्यात माझा आत्मा गुंतलेला आहे असे ते म्हणाले. बायडेन यांनी २१ वेळा युनिटी या शब्दाचा उच्चार केला. अमेरिकेला पुन्हा एकसंघतेने उभी करण्याला ते किती महत्त्व देत आहेत हे यावरून लक्षात येईल. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी ट्रम्प यांचे काही आततायी निर्णय रद्द करून, उदारमतवादी प्रतिमेची पुनर्स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेला जगाबरोबर जोडण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. स्वतःला सांधण्यासाठी अमेरिकेला जगाची मदत लागणार आहे व जगाच्या अर्थव्यवस्थेसाठीही अमेरिका सुदृढ होणे आवश्यक आहे. बायडेन यांची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. धाडसी, उत्साही व आशावादी अमेरिका असा उच्चार त्यांनी केला आणि कमला हॅरिस यांच्या विजयाचा उल्लेख करून ‘कोण म्हणते परिस्थिती बदलत नाही,’ असा सवाल आत्मविश्वासने केला. आव्हानांची जाण, त्यावर मात करण्याचा आत्मविश्वास आणि उदारमतवाद हे बायडेन यांचे गुण आहेत. बायडेन यांच्या आगमनामुळे सभ्यता व मृदुता व्हाईट हाऊसमध्ये अवतरली असे सीएनएनने म्हटले आहे. बायडेन यांच्या भाषणातही ती उतरली. जगाबरोबरचा अमेरिकेचा व्यवहारही आता सभ्यतेने व्हावा, ही अपेक्षा.