- मधुकर भावेजॉर्ज गेला... एकापरीने यातनांमधून त्याची सुटका झाली. कामगारांच्या प्रश्नांसाठी झुंजणारा जॉर्ज, गेली ५० वर्षे जवळून पाहिला. मृत्यूशी झुंजणारा जॉर्जही गेली ६ वर्षे पाहात होतो. आयुष्यभर रस्त्यावर लढलेला हा माणूस. त्याच्या आयुष्याची अखेर अशी यातनामय व्हायला नको होती, पण जॉर्जच्या जीवनात कोणतीच गोष्ट सरळ नव्हती. चार वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर लाटणे घेऊन उतरणाऱ्या लढाऊ मृणालताई गेल्या. त्यानंतर, स्त्री चळवळीचे लाटणे मोडूनच पडले. जॉर्ज गेल्याची बातमी आली आणि मुंबईच्या रस्त्यावरचा सगळा लढाच इतिहासजमा झाला. मुंबईचा कामगार पोरका झाला. मुंबईचा टॅक्सी ड्रायव्हर, मुंबई महापालिका सफाई कामगार, बेस्ट कामगार, मुंबईचा चित्रपट कामगार, मुंबईचा हॉटेल कामगार... किती संघटनांची नाव? ६० संघटनांच्या अध्यक्षपदी जॉर्ज होता. किती संप केले, हिशोब नाही. किती वेळा बंदी हुकूम मोडून तुरुंगात गेला, हिशोब नाही. पोलिसांचा मार किती वेळा खाल्ला, गणती नाही. सगळेच काही अफाट आणि अचाट. उजाडले की कधी एकदा रस्त्यावर उतरतो, असे वाटणारा आणि १८-१९ तास काम करणारा असा कामगार नेता पुन्हा जगात होणे नाही. ६० वर्षांपूर्वी मी मुंबईत आलो आणि मला प्रेमाचा पहिला आधार मिळाला तो जॉर्जचा. पेडर रोडच्या पुलावरून खाली उतरले की डाव्या हाताला पानगल्ली आहे. त्या पानगल्लीच्या कोपºयात महेश्वरी मेन्शनमध्ये तळमजल्याला १० बाय १० च्या खोलीत जॉर्ज राहायचा. राहायचा म्हणजे फक्त रात्री झोपायला यायचा. तेसुद्धा १२-१च्या पुढेच. मुंबईतील त्याच्या जीवनात ४-५ तासांपेक्षा जॉर्ज कधी झोपला असेल, असे वाटत नाही.१९५५ साली मुंबईतल्या गोदी कामगारांसाठी पहिल्यांदा ‘मुंबई बंद’ करणारा जॉर्ज आणि आयुष्यभर कामगारांच्या सभेमध्येच संध्याकाळ घालविणारा जॉर्ज.. मुंबईतल्या अनेक व्यवसायातील कामगारांना पगार, वेतन भत्ते, बोनस, कामाचे तास अशा अनेक सुविधा ज्याच्या लढ्यामुळे मिळाल्या, तो जॉर्जच होता. मुंबईच्या कामगाराला प्रतिष्ठा देण्यात कॉमे्रड डांगे आणि जॉर्ज या दोन नावांखेरीज तिसरे नाव नाही.संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा ऐन भरात होता, तेव्हा या लढ्याची मुख्य शक्ती मुंबईच्या रस्त्यावरील ‘कामगार’ हीच होती. कॉम्रेड डांगे यांच्या गिरणीकामगार युनियनचे ६० गिरण्यांतील २ लाख कामगार जसे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले होते. त्याचप्रमाणे, जॉर्जच्या सर्व संघटनांमधील सर्व भाषिक कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईच्या रस्त्यावर होते.जॉर्जच्या लढ्यातील सगळ्यात मोठे आंदोलन होते १९६२ च्या केंद्रीय कर्मचाºयांच्या संपात. मुंबईची लोकल अडविणार, असे जॉर्जने जाहीर करून टाकले. रेल्वे कर्मचारी संपात सहभागी झाले असताना, काही संप फोड्यांकडून लोकल चालविण्याचा प्रयत्न झाला, जॉर्जने तो प्रयत्न हाणून पाडायचे ठरविले. लोकल अडविण्याची तारीख त्यांनी जाहीर करून टाकली. दादर स्टेशन जाहीर करून टाकले. तो दिवस आज डोळ्यासमोर आहे. सैन्याने वेढा दिल्यासारखा दादर पश्चिम रेल्वेचा प्लॅटफॉर्म दिसत होता. पोलीस जॉर्जला मुंबईभर शोधत होते आणि जॉर्ज प्लॅटफॉर्मवर गर्दीतच उभा होता. फक्त त्यांनी चष्मा काढून टाकला, कोट घातला. त्याला कोणी ओळखलेही नाही. लोकल आली... क्रमांक २च्या प्लॅटफॉर्मवरून जॉर्जने उडी घेतली. तो लोकलसमोर आडवा पडला. पाठीवर पोलिसांच्या उड्या पडल्या. पोलिसांनी जॉर्जचे पाय पकडून पटरीवरून त्याला गुरासारखे फरफटत नेले. त्या दिवशीचा जॉर्जचा तो आवेश मनावर कायमचा कोरला गेल्यासारखा आहे. २० पोलिसांनी जॉर्जला पकडले आणि हातात साखळदंडासकट कडी घातली.जॉर्ज आणखी एका कारणाकरिता जगभर प्रसिद्ध झाला. १९६७ साली मध्य मुंंबई लोकसभा मतदारसंघातून त्यावेळचे केंद्रीय मंत्री स. का. पाटील यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर करून खळबळ उडवून दिली. स. का. पाटील मुंबईचे सलग तीन वर्षे महापौर होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते मंत्री. मुंबईत त्यांचा दरारा. जॉर्जने उमेदवारी जाहीर केली, तेव्हा लोक जॉर्जला हसत होते, पण जॉर्जने ३० हजार मतांनी स. का. पाटलांना पराभूत केले. १९६७च्या निवडणुकीनंतर जॉर्ज दिल्लीत गेला, पण जॉर्जचे मुंबईचे तेज त्याला दिल्लीत टिकविता आले नाही. जॉर्ज सत्तेत शोभणारा माणूसच नव्हता. काही माणसांना सत्ता शोभून दिसत नाही. भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेला जॉर्ज, त्याचे लढाऊपण संपून गेले. त्यामुळे भाजपाचा मंत्री म्हणून जॉर्ज भावलाच नाही.प्राध्यापक हुमायुन कबीर यांची कन्या लैला कबीर हिच्याशी विवाह झाला, त्या दिवशी जॉर्ज दिल्लीत खूप खूश होता. विवाह अयशस्वी झाल्याचे त्याला जाणवले, त्या वेळी असहाय झालेला जॉर्जही मी पाहिला. भावनात्मक जॉर्ज खूप वेगळा होता. रस्त्यावर लढणारा जॉर्ज वाघ होता, सार्वजनिक जीवनातला जॉर्ज आक्रमक होता. एकाकी असलेला जॉर्ज अतिशय हळवा आणि असहाय वाटायचा. गेल्या वर्षीच जॉर्जला भेटलो होतो. माणसांना तो ओळखतही नव्हता. लढाऊ जॉर्जची ती असहायता पाहावत नव्हती. जॉर्ज थकेल, असे कधी वाटलेच नव्हते. जॉर्ज असहाय होईल, असेही कधी वाटले नव्हते. जॉर्जचे ते आक्रमक रूप डोळ्यासमोर कायम आहे. तोच जॉर्ज कायमचा आठवत राहील.(लेखक लोकमतच्या नागपूर, जळगाव, नाशिक आवृत्तीचे माजी संपादक आहेत)
जॉर्ज... शेवटचा लढाऊ नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 4:42 AM