महाराष्ट्रातील ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय अत्यंत आवश्यक व धाडसी असा आहे. राज्याच्या विविध भागांत कोरोनाचा सुरू असलेला धुमाकूळ पाहता स्वत: सुरक्षित राहून इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा, प्रत्येकाने घरातच बसणे, हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा त्रास सोसणे अत्यंत गरजेचे आहे. पण सकाळी घराबाहेर पडून रात्रीपर्यंत कामाच्या गाड्याला जुंपून राहणे अंगवळणी पडलेल्या आपणा सर्वांना दिवसभर नुसते घरात बसून राहणे महाकठीण जाते, हेही तेवढेच खरे आहे. अभ्यास, खेळ व मित्रमंडळी यात दिवस भुर्रकन उडून जाणाऱ्या मुलांना घराच्या चार भिंतींच्या आत कोंडून राहणे नक्कीच सोपे नाही. शेवटी टीव्ही पाहण्यास व मोबाईलवर टाइमपास करण्याचाही कंटाळा येऊ लागतो, पण कठीण वाटत असले तरी घरातच बसण्याशिवाय काही पर्याय नाही. खचून गेलो तर कोरोनाविरुद्धची ही लढाई आपण कशी जिंकणार? या लढाईत प्रत्येकाला सैनिक व्हावे लागेल, असे मी याच स्तंभात आधी लिहिले होते. या लढाईत बंदूक वा तलवार चालविणे गरजेचे नाही. या युद्धात आपल्या धैर्याची व समंजसपणाची कसोटी लागणार आहे. आपण संयम सोडला नाही व आणखी काही दिवस घराबाहेर जाण्याचे टाळले तर कोरोना संसर्गाची साखळी तुटेल. त्यानंतर आपल्याला विजयी मुद्रेने घराबाहेर पडायचेच आहे! मग आपले पूर्वीचे जगणे नव्या उमेदीने व उत्साहाने सुरू करू.
तर मग आता काळाच्या या कोºया पानावर उत्साह व उमेदीचे सुंदर चित्र कसे चितारायचे त्याबद्दल जरा बोलूया! माझे स्वत:चेच उदाहरण मी देईन. लहान असताना व नंतर तरुणपणीही पेंटिंग हा माझा आवडता छंद होता, पण नंतर काळाच्या ओघात कामाचा व्याप वाढत गेला व हा छंद बाजूला पडला. ताडोबाच्या जंगलात मी देशातील अनेक ख्यातकीर्त चित्रकारांना पेंटिंग करण्यासाठी एकत्र केले तेव्हा सुमारे २५ वर्षे सुप्तावस्थेत राहिलेला माझा हा छंद पुन्हा एकदा मनाच्या कप्प्यातून बाहेर आला. जंगलातील त्या कलाशिबिरात मीही पेंटिंग केले. पुन्हा कामाच्या व्यापात अडकलो व पुन्हा तो छंद मागे पडला. आता कोरोना विषाणूने आणलेल्या ‘कोविड-१९’च्या साथीने माझ्यावरही घरात बसण्याची पाळी आली तेव्हा माझ्या रंगकुंचल्यांचे सृजन सुरू झाले. मी एक चित्र काढले व त्याला नाव दिले ‘कोरोना’. काही चांगल्या पुस्तकांचे वाचनही सुरू आहे. सुचतील त्या कविताही लिहून काढतोय. कधी मनपसंत जुनी गाणी व गझला ऐकतो, तर कधी शास्त्रीय संगीताच्या स्वरलहरींतून मिळणारी ऊर्जा अंगात उतरविण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही कलेची खासियतच अशी आहे ती तुमच्यात सकारात्मकता निर्माण करते. तुमच्या मनाला धीर व समाधान देते.
या कठीण काळाला सकारात्मकतेने सामोरे जाणे हाच उत्तम मार्ग आहे. निसर्गाने हा मोकळा वेळ तुम्हाला सुप्त राहिलेले छंद व शौक पुरे करण्यासाठी, कुटुंबीयांच्या सान्निध्यात राहून परस्परांना अधिक जवळिकीने समजून घेण्यासाठीच तर दिला आहे. तुमच्या पत्नीने कोणते फूल आवडते असे विचारले तर तुमच्यापैकी अनेक उत्तर देताना गडबडून जातील. ही वेळ जुनीच नाती नव्या ओळखीने उजळण्याची आहे. गेल्या २५-३० वर्षांत ज्यांच्याशी मोकळेपणाने बोलता आले नाही, अशा अनेक लोकांशी मी आत्ता बोलतोय. मी माझ्या बहिणीशी बोलत होतो. त्या आर्किटेक्ट आहेत. वेळ कसा काय घालवताय, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, मनन-चिंतनाला भरपूर वेळ मिळतोय, तेव्हा घरांची सुंदर डिझाईन तयार करतेय.दैनंदिन जीवनाच्या धामधुमीत बहुतेकांना मुलांकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. मुलांना त्यांना नीट समजूनही घेता येत नाही. ही वेळ ती उणीव भरून काढण्यासाठी आहे. मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या. त्यांना भारताचा गौरवशाली इतिहास समजावून सांगा. पूर्वी जगाने प्लेग व हैजासारख्या भयंकर साथींवर कशी मात केली ते त्यांना सांगा. भारत कसा बलशाली केला, हे समजू द्या. याने त्यांच्यातही सकारात्मकता येईल. त्यांचे मन खंबीर होईल.निसर्गाने आपल्याला आत्मचिंतनाची ही संधी दिली आहे. भूतकाळाचा धांडोळा घ्या व भविष्यातील योजनांची आखणी करा. शिवाय निसर्गाविषयी विचार करायलाही विसरू नका. आपण निसर्गावर घाला घातला तर त्यातून आपलाच विनाश होणार आहे. पुढील पिढ्यांसाठी सुंदर निसर्ग सांभाळून ठेवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर जे काही करता येईल ते करण्याचा संकल्प करा. अखेरीस मी एवढेच सांगेन. भयमुक्त राहा. चिंतामुक्त राहा. दोषमुक्त राहा. आपल्या मनात एक सुंदर सृजनाचे घरटे बांधा. असे केल्याने या संकटातून आपण पूर्वीपेक्षा अधिक चांगला व बळकट माणूस म्हणून बाहेर पडू याबद्दल मला जराही शंका नाही. यातून आपण आपले आयुष्य उज्ज्वल व या जगाला सुंदर नक्कीच बनवू.विजय दर्डा(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)