- डॉ. अजित मगदूम२६ जून हा ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवनविरोधी दिन’ म्हणून संबंध जगात मानला जातो. ‘क्षणाची मजा आणि आयुष्यभराची सजा’ असेही व्यसनांबद्दल म्हटले जाते, ते अगदी खरं आहे. माणसाला अंतर्बाह्य पोखरणाऱ्या मादक पदार्थांची यादी खूप मोठी झाली आहे. सर्व प्रकारची मद्ये, तंबाखूपासून बनणाऱ्या तपकीर किंवा पेस्टपासून ते गुटका, पानमसाल्यापर्यंतचे सर्व प्रकार अलीकडच्या काळात जगभर अमली पदार्थांचे विषारी जाळे वेगाने पसरत आहे. भारतात तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनात अडकत असल्याचे चित्र आहे. अफू, गांजा, चरस, कोकेन, हेरॉईन, अँफिटामाईन, इफेड्रीन सारख्या अमली पदार्थांची विक्री व सेवन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईसारख्या शहरातल्या जुन्या, पडक्या इमारती, बंद कार्यालये, उड्डाण पुलाखालील जागा, बागांतील निर्जन कोपरे व इतर अनेक आडोशाचा जागा इथे गर्दुल्यांचे अड्डे आहेत. पालकांच्या मुलांवरील प्रेमाचा ओलावा कमी होत, घरातील तुटत चाललेले नातेसंबंध, व्यक्त होण्यासाठी मानसिक जवळीकतेचा अभाव, गुंतवून ठेवणाऱ्या सामाजिक माध्यमांमुळे खऱ्या मित्रत्वाचा, प्रेमाचा अभाव, यामुळे युवावर्गाची मानसिक अवस्था दोलायमान झाली आहे. सणावारालासुद्धा भेटीगाठी हा प्रसार मोडीत निघाला आहे. आभासी जगच प्रत्येकाला आपलेसे वाटत आहे. अशा परिस्थितीत आभासी, फसव्या अन् ‘खऱ्या’ जीवनात काही तरी सनसनाटी, मेंदूला झिणझिण्या आणणारे ड्रग पाहिजे असे वाटते. औद्योगिकरण, शहरीकरण आणि स्थलांतर, यामुळे आपली मुळे कुठल्या कुठे हरवून गेलीत हे वास्तव आहे.गजबजलेल्या शहरामध्ये जीवच माझा लागत नाही.मी तर आता गावोगावी पूर्वज माझे शोधत आहे.या अप्पा ठाकूरांच्या ओळीप्रमाणे माणूस आज सगळ्यांपासून विलक्षण परात्म झाला आहे. म्हणूनच तो व्यसनांकडे वळतो आहे. हे प्रमाण पाहायचे झाल्यास, मिझोराममध्ये ४८.२०९ टन तर पंजाबमध्ये ३९.०६४ टन अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कमीत कमी १३ प्रकारचे अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतात तस्करी केली जाते. ज्याच्या किमती १.५ लाख ते २.५ कोटी रुपये प्रति किलो असतात. भारतात आल्यानंतर ३ ते ५ टक्के किमती दिल्ली व सीमेवरील राज्यात येताना वाढतात, तर मुंबईत आल्यावर ५ ते १० टक्क्यांनी त्याच्या किमती आणखी वाढतात.भारताची स्थिती आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ वाहतुकीचा मार्ग आणि दुसरीकडे अफू लागवडीचा पट्टा यांच्या कोंडीत सापडल्यासारखी स्थिती झाली आहे. विशेषत: पंजाब, मणीपूर व मिझोराम या सीमेवरील राज्यांना अमली पदार्थांच्या परिणामांचा तडाखा अधिक बसला आहे. दक्षिणपूर्व सुवर्णत्रिकोण (म्यानमान, थायलंड व लाओस) आणि दक्षिण पश्चिम सुवर्णचंद्रकोर (इराण, अफगणिस्तान व पाकिस्तान) या दोन्हीमध्ये येत असल्यामुळे भारताला अमली पदार्थांच्या सर्व धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. पंजाबपाठोपाठ उत्तराचल, हरियाणा, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय या राज्यात व इतरही राज्यात अमली पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण प्रचंड मोठ्या गतीने वाढत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने कुमारवयीन मुलांमध्ये अमली पदार्थांचा वाढता वापर होत असल्याचे अहवालात नमूद केले होते. याचा संदर्भ देऊन नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी त्यांच्या ‘बचपन बचाओ आंदोलना’तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, अमली पदार्थ हे शाळेच्या आसपास व इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत, तसेच त्यांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग यांनी २०१२ मध्ये जे सर्वेक्षण केले होते, त्याचा संदर्भ दिला होता. या अहवालानुसार भांग व गांज्या वापराचे प्रमाण भयावह आहे. सर्वात जास्त उत्तरांचल ७० टक्के, हरियाणा ६३ टक्के, मध्य प्रदेशात ६६.५ टक्के , तर महाराष्ट्रात ६०.६ टक्के आणि सिक्कीममध्ये ४७.७ टक्के असे होते. अमली पदार्थ इंजेक्ट करून घेण्याचे प्रमाण सर्वात जास्त मिझोराम येथे त्या पाठोपाठ मेघालय व राजस्थानात आहे. या व्यसनातून मानसिक विकृतीचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच आत्महत्येचेही प्रमाण मोठे आहे. यात सर्वात बळी जातो, तो तरुणाईचा. भारत हा युवकांचा देश म्हणून जगाचे भारताकडे लक्ष आहे, पण हा सुदृढ युवकांचा देश म्हणता येईल का, हा खरा प्रश्न आहे. या समस्येला प्राधान्य क्रमाने सोडवण्यासाठी शासन, समाज, स्वयंसेवी संस्था, पोलीस यंत्रणा या सर्वांनी मिळून ठोस पावले उचलली, तरच परिस्थिती नियंत्रणात आणता येईल.नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (ठउफइ) आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत ६४,७३७ अमली पदार्थांच्या गैरव्यवहारातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करी व वाहतूक करणाऱ्या ६४,३०२ लोकांना अटक करण्यात आली आहे. यात नेपाळी (२६६), नायजेरियन (२१०), ब्रम्हदेश (९६) या परदेशीयांचा समावेश आहे. या कारवायांद्वारे १,०५,१७३ टन अवैध अमली पदार्थ केवळ २०११ ते २०१३ या तीन वर्षांत जप्त करण्यात आले. यात ओपियम, मॉर्फिम, हेरॉईन, गांज्या, हशीश, कोकेन, इफेड्रीन मॅथॅक्लालन, एलएसडी, अॅसेटिक अॅनहायड्राइड व अॅम्फेटामाइन इत्यादीचा समावेश आहे.
मिळते क्षणाची मजा आणि होते आयुष्यभराची सजा
By admin | Published: June 26, 2016 3:36 AM