- सुधीर महाजन खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार आणि खा. रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील तिघेही नेते काहीना काही कारणांनी कायम चर्चेत असतात. यावेळी या तिघांच्या तीन तऱ्हा. औरंगाबादचे हनुमानभक्त खासदार चंद्रकांत खैरे यांनी परवा ‘जयभद्र’ म्हणत रिकाम्या आखाड्यात शड्डू ठोकला. माझ्या विरोधात कोणीही उभे राहू द्या, अलाने-फलाने आले तरी चिंता नाही. कोणीही आला तरी त्याला धूळ चारू. त्यांच्या या हुंकाराने सारेच अचंबित झाले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांचे वारे सोडा साधी झुळूकही नसताना रिकाम्या मैदानात खैरे का जोर बैठका काढतात याचाच उलगडा कोणाला होत नाही. पालकमंत्री रामदास कदमांशी त्यांनी जुळवून घेतलेले दिसते. शिवाय शिवसेनेतही आलबेल आहे. महानगरपालिकेत आयुक्त बकोरियांची बदली झाल्याने कोंडी फुटली आहे. नाही म्हणायला कन्नडचे त्यांचे स्वपक्षीय आमदार हर्षवर्धन जाधव मात्र त्यांच्या मागे लागलेले दिसतात. खैरेंचा त्यांच्यावरील रोष हा त्या तालुक्यातील शिवसेनेचे वेगळे गणित मांडण्याचा जाधवांचा प्रयत्न आणि खैरेंना तेथे आपले वर्चस्व कायम ठेवायचे यातून एक गोष्ट झाली. जाधवांनी आपल्याच खासदारांची प्रकरणे बाहेर काढण्याचा सपाटा लावला. १९९९ साली खैरेंनी खासदार निधीतून सावरखेडा-शिंदेवाडी, घारेगाव-तांदुळवाडी आणि खापेश्वर-झोडगाव या तीन रस्त्यांची कामे केली; पण ही तीन गावे कन्नड तालुक्यातील नाहीत तर या रस्त्याचा खर्च तालुक्याच्या खात्यावर कसा टाकला, असा जाधवांचा सवाल आहे. याशिवाय आलापूर, देभेगाव येथे खासदार निधीतून कामे केली ती कागदावर. प्रत्यक्षात काम झाले नसल्याचा गौप्यस्फोट हर्षवर्धन जाधवांनी केल्याने खळबळ उडाली. जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खैरे यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराने जाधवांच्या पत्नीचा पराभव केला, अशी ही धुसफूस आहे. सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा रुसवा आपोआपच निघाला. कोणाला त्यांची मिनतवारी करावी लागली नाही. नगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी पक्षाचे कोणतेच नेते आले नसल्यामुळे रुसलेल्या सत्तारांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांकडे पाठविला होता. काँग्रेस संस्कृतीची परंपरा पाळत चव्हाणांनी पण तो निर्णय न घेता फायलीला जोडला. परवा अचानक सत्तारांनी आपण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारत आहोत, अशी घोषणा केली आणि आपला रुसवा निघाल्याचेही सांगितले. दरम्यानच्या काळात पाऊस नसतानाही पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. जमिनीच्या प्रकरणातील वक्तव्यामुळे सत्तार चांगलेच अडचणीत आले. नेहमीच बॅकफूटवर असणारी तालुक्यातील भाजपची मंडळी आक्रमक झाली तीसुद्धा वरून आदेश आल्यामुळे. त्यांनी सत्तारांच्या विरोधात रान पेटवले, पण पेटलेल्या रानाची धग ते आठवडाभरही पेटती ठेवू शकले नाहीत; पण ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे सत्तार यांना झटका बसला हे निश्चित. त्यातून स्वत:ला सक्रिय ठेवण्यासाठी रिकाम्याच असलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या खुर्चीवर ते जाऊन बसले. गांधी भवनातील मरगळ ते कशी घालवतात हे पाहणे मनोरंजक असेल. कारण दुसरे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार आहेत आणि मरगळलेल्या पक्षात चैतन्य आणण्यासाठी सत्तार-पवारांना तीन पायांची शर्यत करायची आहे. ते ही शर्यत जिंकतात की एकमेकांच्या पायात-पाय घालतात, याचीच कार्यकर्त्यांसह सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे अस्सल ग्रामीण भाषेची उधळण करत सभा गाजवतात, नाही म्हणायला बोलण्याच्या ओघात कधी-कधी गाडी घसरते. ‘‘मी बारा भोकांचा (छिद्रांच्या) सायकलचा पाना आहे; कुठेही फीट बसतो’’ हे त्यांचे वक्तव्य फार गाजले होते. तर सायकल पानावाले दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी यशस्वी यादव यांची नियुक्ती रावसाहेबांच्या शिफारशीमुळे करण्यात आली, अशी माहिती पुढे आली आहे. ते जरी औरंगाबादेत राहत असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र जालना असल्याने औरंगाबादच्या आयुक्तपदी ‘आपल्या माणसाला’ त्यांनी का बसवले असा प्रश्न औरंगाबादच्या भाजपमधील भल्याभल्यांना पडला. बारा भोकांच्या पान्यामध्ये दानवेंनी हे तेरावे भोक काय-काय फीट करण्यासाठी पाडले आणि ते कुणा-कुणाला टाईट करतात अशीच ही चर्चा आहे.