नुकतीच पार पडलेली आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धा खऱ्या अर्थाने दिग्गजांची ‘ग्रँडस्लॅम’ स्पर्धा ठरली. रॉजर फेडरर, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या बलाढ्य चौकटीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला चॅम्पियन का म्हटले जाते हे सिद्ध केले. फेडरर आणि नदाल यांनी तर जागतिक पुरुष टेनिस गटात अक्षरश: राज्य केले. २००६ ते २०११ पर्यंत तब्बल आठ ग्रँडस्लॅमच्या अंतिम लढती या दोघांमध्ये झाल्या. यावरूनच फेड आणि नदाल यांचे वर्चस्व लक्षात येते. मात्र, दुखापतींमुळे दोन्ही खेळाडूंच्या खेळावर परिणाम झाला. तसेच, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे या नव्या दमाच्या प्रतिस्पर्ध्यांनी यानंतर फेडरर - नदाल यांच्या हुकूमशाहीला आव्हान दिले. नुसते आव्हानच दिले नाही तर त्यांना जेतेपद मिळवण्यापासून दूरही ठेवले. जोकोविच - मरे यांच्या धडाक्यापुढे फेडरर - नदाल यांचे पुनरागमन अशक्यातली गोष्ट ठरत होती. त्यामुळे अनेकदा त्यांच्या निवृत्तीची चर्चाही रंगत होती. मात्र, फेडरर - नदाल सहजासहजी हार मानणाऱ्यातले नव्हते. काहीवेळ स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहून केवळ आपल्या तंदुरुस्तीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून दोघांनी झोकात पुनरागमन केले. इतकंच नाही, तर पुनरागमनानंतर दोघांच्याही खेळात तोच जुना जोश दिसू लागल्याने आता जोकोविच - मरे यांच्यापुढेही नवे आव्हान उभे राहिले. आत, आॅस्टे्रलियन ओपनमध्ये जोकोविच आणि मरे लवकर पराभूत झाल्याने फेडररला संधी मिळाली अशी चर्चा अनेकजण करत असणार. पण यामुळे फेडररच्या यशाची किंमत कमी होणार नाही. ज्या मिशा झ्वेरेवने अव्वल खेळाडू अँडी मरेला चार सेटमध्ये नमवले त्याच युवा झ्वेरेवला पस्तीशीच्या फेडररने सरळ तीन सेटमध्ये लोळवून आपला दर्जा सिद्ध केला. दुसरीकडे, महिला गटातही विल्यम्स भगिनींचा धडाका राहिला. ३५ वर्षीय सेरेनाने यंदा आॅस्टे्रलियन ओपनचे जेतेपद पटकावून जर्मनीची दिग्गज खेळाडू स्टेफी ग्राफच्या विक्रमी २२ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडला. सेरेनाला गेल्या दोन वर्षांत युवा खेळाडूंकडून कडवी लढत मिळाली. अँजेलिक कर्बर आणि गरबाइन मुगुरुजा या युवा खेळाडूंनी तिला २०१६ साली अनुक्रमे आॅस्टे्रलियन आणि फ्रेंच ओपनमध्ये जेतेपदापासून दूर ठेवले. परंतु, सेरेनाने त्याचवर्षी विम्बल्डनमध्ये कर्बरला धक्का देत स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी केली. यानंतर आॅस्टे्रलियन ओपनच्या अंतिम फेरीत मोठी बहीण व्हीनसला धक्का देत तिने नवा अध्याय रचला. विशेष म्हणजे २००९ सालानंतर व्हीनसने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले. त्यातही विल्यम्स भगिनींनी तब्बल ९ वेळा जेतेपदासाठी लढल्या आहेत. एकूणच नदाल (वय ३०), फेडरर (३५), सेरेना (३५) आणि व्हीनस (३६) या दिग्गजांनी प्रत्येक युवा खेळाडूपुढे यंदाच्या आॅस्टे्रलियन ओपनमधून एक आदर्श उभा केला. खरं म्हणजे या चारही दिग्गजांकडे गमावण्यासारखे काहीही नव्हतं, परंतु तरीही या चौकटीची जेतेपद मिळवण्याची भूक कमी झालेली नव्हती. चॅम्पियन बनण्यापेक्षा चॅम्पियन हे बिरुद टिकवणे सर्वात कठीण काम असते आणि हेच आव्हान या चारही दिग्गजांनी यशस्वीपणे पेलले आहे.
दिग्गजांचे ‘ग्रँडस्लॅम’
By admin | Published: January 31, 2017 5:00 AM