- दिलीप तिखिले‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दुसरों के घर पर पत्थर नही मारा करते’ एरवी हिंदी सिनेमात मारला जाणारा हा घिसापिटा डायलॉग परवा नागपूर अधिवेशनात भाव खाऊन गेला. हा डायलॉग फेकणारे दुसरे, तिसरे कुणी नसून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे साहजिकच डायलॉगचे वजन वाढले आणि सभागृह टाळ्या व हंशाने दणाणून गेले. (आता ह्या टाळ्या केवळ सत्ताधारी बाकांवरूनच पडल्या हे वेगळे सांगणे न लगे.)मुख्यमंत्र्यांनी एक बरे केले. ‘माझे घर काचेचे नाही’ हे आधीच सांगून टाकले. उगाच सरकारच्या पारदर्शी कारभारात डोके खुपसणारे ‘विघ्नसंतोषी’ आपल्या घरातही डोकावू लागले तर काय घ्या...! पण तूर्तास तरी त्यांना हा प्रॉब्लेम नाही कारण त्यांनी आपले जुने घर पाडून नवे बांधायला घेतले आहे. आता या नव्या घरात काचेचा अजिबात वापर होणार नाही अशा सूचना त्यांनी दिल्याचे समजते.देवेंद्रबाबू तसे स्पष्टवक्ते आणि तेवढेच शांत स्वभावाचे. पण... परवाचा त्यांचा आवेश वेगळाच होता. त्याला कारणही तसेच होते. गेल्या चार वर्षांच्या काळात प्रथमच त्यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा थेट आरोप करीत होते. या आरोपातील हवा काढताना बाबूंनी मग अशी काही बॅटिंग केली की विरोधकांना बॅकफूटवर जावे लागले. ‘तूमएक मारोगे तो हम दस’ अशा आवेशात त्यांनी मागच्या सरकारच्या काळातील २०० प्रकरणेच रडावर आणली. आता यात काचेचे घर कुणाकुणाचे आहे याचा ते शोध घेत आहेत म्हणे. यात पहिल्या क्रमांकावर आहेत (अर्थातच) विखे पाटील.पण...हा आरोप करण्यात आघाडीवर असलेल्या विखेंनी मात्र लगेच खुलासा करून टाकला... ‘मी काचेच्या नव्हे तर ‘दगडी घरात’ राहतो.नंतर विखेंना कुणीतरी गमतीने म्हणालेही..., काय राव...खुलासा करताना ‘दगडी घर’ म्हणण्याऐवजी ‘दगडी चाळ’ म्हटले असतं तर...!त्याने काय झाले असते...? विखे न समजून म्हणाले!काय झाले असते...? अहो...‘दगडी चाळी’चे नुसतं नाव ऐकून देवेंद्रबाबूच काय नरेंद्रभाईसुद्धा कधी तुमच्या वाटेला गेले नसते.अर्थात हा गमतीचा भाग सोडला तरी देवेंद्रबाबूंनी खेळलेल्या चालीने काँग्रेस आणि राष्टÑवादीची चिंता वाढली आहे हे खरे! या दोन्ही पक्षांत त्यावर विचामंथनही सुरू झाले.आपण त्यांची चार लफडी पुढे काय आणली, त्यांनी चक्क २०० ची यादी तयार करावी...? बहोत नाईन्साफी है ये...! राष्ट्रवादीचा कुणीतरी म्हणाला.त्यावर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया...जाऊ दे. आपली ६० वर्षांच्या काळातील २०० आणि त्यांची चार वर्षांतील तीन-चार. अॅव्हरेज काढा...सेम टू सेम.तिसरा म्हणाला...! डोण्ट वरी... वरुण राजाच्या कृपेने सर्वकाही ठीक होईल....आता हा वरुण राजा कोण आणि त्याचा येथे काय संबंध? दोन-तीन जणांची कोरसमध्ये पृच्छा.तिसरा : अहो...मी पावसाबद्दल बोलतोय! मुंबईत मुसळधार पाऊस पडतो म्हणून सरकारने अधिवेशन नागपुरात घेतले. इथे तर विधानभवनातच पूर. कसलं कामकाज होणार! मी तर म्हणतो असाच पाऊस पडू दे अन् मुख्यमंत्र्यांची ती २०० ची यादी वाहून जाऊ दे...!(तिरकस)
काचेचे घर आणि दगडी चाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:05 AM