- सुधीर लंकेमंत्रिपद हे पानावर पडलेल्या दवबिंदूसारखे असते. कधी पानावरून घरंगळून पडेल हे सांगता येत नाही. म्हणून मंत्रिपद गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ऐशआरामी बंगला खाली करून संगमनेरला जाण्याची तयारी ठेवा. नंतर शेतात काम करण्यास तयार राहा, असे आपल्या पत्नीला सांगणारा एक माजी मंत्री व तत्त्वनिष्ठ नेता बी.जे. खताळ यांच्या रूपाने राज्याने गमावला आहे.राजकारणात तत्त्वाशी तडजोड न करणारा, स्वत:च्या मुलाबाळांसाठी प्रॉपर्टी न जमविणारा, स्वत:चा बंगला न बांधू शकलेला नेता म्हणून खताळ हे राज्यात अजरामर राहतील. नगर जिल्ह्यातील संगमनेरमधून आमदार म्हणून ते चार वेळा निवडून आले. पण मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी त्यांनी स्वत: कधी धडपड केली नाही. उलट मुख्यमंत्रीच त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान अढळ करत असत.पुढारी आणि मंत्री म्हटले की राजकीय महत्त्वाकांक्षा, सत्तेची लालसा हे विकार अंगी जडतात. अशा वेळी खताळ यांचे जीवनकार्य व तत्त्वे उठून दिसतात. वयाची शंभरी गाठेपर्यंत स्वत:ची प्रकृती आणि मेंदू या दोन्ही बाबी शाबूत ठेवत त्यांनी राजकारण केले. राजकारणात येण्यापूर्वी नगर जिल्ह्यासह पुणे, औरंगाबाद, विजापूर येथे त्यांची वकिली नावाजली. १९४८ मध्ये नगर जिल्ह्यात कम्युनिस्टांनी सावकारांविरुद्ध उठाव केला होता. त्यात एक सावकार ठार झाला. खुनाचा आरोप असलेल्या कॉम्रेड्सच्या बाजूने खताळ पाटलांनी न्यायालयात उभे राहावे म्हणून कॉ. श्रीपाद डांगे त्या वेळी संगमनेरला आले होते. खताळ तो खटला लढले व जिंकले. ते पुढे न्यायाधीश झाले. पण नियुक्तीच्या दिवशीच राजीनामा देऊन काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आले. १९५२ साली ते विधानसभेची पहिली निवडणूक लढले. पण पराभूत झाले. १९५७ सालीही त्यांना पक्षाने उमेदवारी देऊ केली. मात्र, काँग्रेसची भूमिका संयुक्त महाराष्टÑाच्या बाजूने अनुकूल नसल्याने त्यांनी ही निवडणूक लढविण्यास नकार दिला.१९६२ मध्ये आमदार होत ते राज्यात मंत्री झाले. १९८५ पर्यंत ते राजकारणात सक्रिय होते. नंतर ठरवून निवृत्ती घेतली. यशवंतराव चव्हाण, कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले या मातब्बर मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. त्यांच्या मुलाला १९६४ साली डिप्लोमानंतर बी.ई.ला प्रवेश घ्यायचा होता. त्यांचा बंगला हा त्या वेळी शिक्षण खात्याचे उपमंत्री असलेल्या जी.डी. पाटील यांच्याशेजारीच होता. पाटील यांनी चिठ्ठी दिल्यास हा प्रवेश मिळू शकणार होता. हा विषय जेव्हा मुलाने खताळ यांच्यासमोर मांडला तेव्हा ते म्हणाले, ‘तू स्वत:च्या लायकीवर मोठा हो. माझ्या मोठेपणाचा फायदा घेऊन इंजिनीअर होण्यापेक्षा स्वत:च्या लायकीवर व्ही.टी. स्टेशनवर हमाल झाला तरी मला आनंद वाटेल.’ त्यांनी आपले वारसदार तयार केले नाहीत. खताळांच्या सुना नोकरी करतात हे काहींना नवल वाटायचे. त्यावर खताळांचे उत्तर होते, ‘मी त्यांच्यासाठी इस्टेट जमवली नाही. त्यामुळे त्यांच्या संसारासाठी त्यांनी योग्य ती भूमिका बजावली पाहिजे.’ते गांधीवादी होते. इंदिरानिष्ठ होते. मध्यंतरी ‘मसकाँ’मध्येही होते. आमदार असूनही गावाकडे एसटीने प्रवास करायचे. शेतावर जायचे. ते सहकारमंत्री असताना शेती खात्याच्या एका अधिकाºयाला त्यांनी नालाबंडिंगचे काम सांगितले. या अधिकाºयानेही ते काम केले. पण, हे काम नियमबाह्य ठरत अधिकाºयाचे निलंबन झाले. ही बाब जेव्हा खताळांना समजली तेव्हा त्यांनी या खर्चाची जबाबदारी घेत आपला राजीनामा यशवंतराव चव्हाणांकडे पाठविला. त्या वेळी चव्हाण म्हणाले, ‘अहो खताळजी, मी तुम्हाला राजीनामा देण्यासाठी नाही तर राज्यकारभार चालविण्यासाठी मंत्रिमंडळात घेतले आहे.’ हे काम खताळांनी लोकांच्या आग्रहाखातर करायला सांगितले होते. चव्हाणांना ही बाब समजली तेव्हा त्यांनी कामाचा खर्च तर मंजूर केलाच, पण पुढे १९६७ मध्ये त्यांच्याकडे शेती आणि पाटबंधारे खातेच सोपविले. अंतुलेंच्या काळात सिमेंट घोटाळा गाजला. तेव्हा सिमेंट वाटप, सिमेंट परवाने हे खाते खताळ यांच्याकडेच होते. पण, अंतुलेंच्या सिमेंट वाटपाच्या धोरणाला विरोध करत खताळ यांनी त्या एकाही फाइलवर स्वाक्षरी केली नव्हती. अंतुले यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आल्यानंतर खताळ यांना या पदासाठी विचारणा झाली. पण त्यांच्या पत्नी प्रभावती यांचे म्हणणे होते, ‘जेथे फुले वेचली तेथे गोवºया उचलणे नको. तुम्ही मंत्रालयात राजीनामा देऊन या. मी सामान आवरून ठेवते.’ राजकीय निवृत्तीनंतरही खताळ असेच साधेपणाने जगले. संगमनेरच्या साध्या वाड्यात पहाटे व्यायाम, दिवसभर वाचन-लेखन यात ते रमत. ताठपणे उभे राहत व बोलतही. शेती, पाटबंधारे, सहकार या क्षेत्रात त्यांनी दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले.(आवृत्तिप्रमुख, लोकमत (अहमदनगर))
राजकीय काळोखाच्या पटलावर चमकणारा काजवा
By सुधीर लंके | Published: September 17, 2019 5:23 AM