सद्गुरू पाटील
मनोहर पर्रीकर १९९४ साली गोव्यात सर्वप्रथम आमदार झाले तेव्हा पर्रीकर यांचे वय ३९ होते. पर्रीकरांकडे बंडखोर वृत्ती होती. भाजपमध्ये पर्रीकरांविरुद्धही शह-काटशहचे राजकारण ९४ सालापासून चालायचे. मात्र, पर्रीकर त्या अंतर्गत राजकारणाला पुरून उरले याचे कारण म्हणजे त्यांनी प्राप्त केलेली लोकप्रियता. मी म्हणतो तेच खरे, ही मनोहर पर्रीकर यांची स्वभावशैली काही वेळा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांना आवडत नसे. मात्र, पर्रीकर यांच्याकडे असलेली प्रचंड कष्ट करण्याची शक्ती व समाजात त्यांनी मिळवलेले स्थान यामुळे पर्रीकर यांच्याकडून नेतृत्वाची धुरा भाजप कधीच काढून घेऊ शकला नाही. सप्टेंबर २००९ साली लालकृष्ण अडवाणी यांना ‘आंबलेले लोणचे’ अशी उपमा जाहीरपणे देऊन पर्रीकर यांनी वाद ओढवून घेतला होता. अर्थात, अन्य कुणी नेता असता तर पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागले असते.
पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गेल्या आठवड्यात बंड करत भारतीय जनता पक्ष सोडला. पर्रीकर यांच्या कुटुंबातील हे पहिले बंड ठरले आहे. पर्रीकर यांचे बंधू अवधूत पर्रीकर यांचा आणि कुटुंबाच्या अन्य सदस्यांचा उत्पल यांना आशीर्वाद आहे. कारण उत्पलवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अन्याय केला ही पर्रीकर कुटुंबीयांची भावना आहे. स्वत: उत्पल खूप दुखावलेले आहेत. त्यांनी भाजप आनंदाने सोडलेला नाही. पक्ष सोडताना त्यांचे अंत:करण जड झाले होते. जो भाजप गोव्यात मनोहर पर्रीकर यांनी रुजवला व वाढवला, सत्तेपर्यंत नेला, त्याच भाजपत पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र पोरका झाला होता. राजकीयदृष्ट्या उत्पल यांना पक्षात अस्पृश्य ठरविण्याची खेळी ही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी गेले वर्षभर खेळली. यातून उत्पलचा स्फोट झाला. त्याने पक्षालाच सोडचिठ्ठी दिली व पूर्ण गोवा थक्क झाला. पर्रीकर यांचा लहान मुलगा अभिजात हा गेल्या दोन वर्षांत पंतप्रधानांना दोन-तीन वेळा भेटला. अभिजात हा त्याच्या स्वत:च्या व्यवसायात स्थिर व्हावा या हेतूने पंतप्रधानांनी त्यास वेळोवेळी मार्गदर्शन केल्याची माहिती मिळते. अभिजात यास राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मनोहर पर्रीकर यांचे जास्त प्रेम अभिजातवर होते व पर्रीकर आजारी होते तेव्हाही अभिजात हा आयुष्यात स्थिर होण्यासाठी धडपडत होता. पर्रीकर यांना कर्करोगाचे निदान झाल्याचे समजले तेव्हा सर्वांत जास्त हादरला होता, तो अभिजात. पर्रीकर यांच्या पत्नीचा मे २००० मध्ये अचानक मृत्यू झाला, तेव्हा अभिजात खूप लहान होता. त्यानंतरच्या काळात पर्रीकर यांनीच अभिजातला सर्वार्थाने सांभाळले. मात्र, पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांचे वैशिष्ट्य असे की, दोघांनीही मोठेपणी कधीच सरकारी कामात हस्तक्षेप केला नाही. पर्रीकर मुख्यमंत्री व संरक्षण मंत्रिपदी असताना गोव्याची सगळी सत्ता सूत्रे पर्रीकरांच्याच हाती असायची; पण त्यात मुलांची लुडबुड कुणालाच कधी दिसली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावरही उत्पल पर्रीकर कधी येत नसत.
पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजी मतदारसंघात पहिली पोटनिवडणूक झाली त्यावेळीच उत्पलने तिकिटावर दावा केला होता; पण भाजपने उत्पलला त्यावेळी तिकीट दिले नाही. गोव्यातील पदाधिकाऱ्यांनी उत्पलला दूरच ठेवले. पर्रीकर इस्पितळात होते तेव्हा उत्पलने भाजपच्या गोवा कोअर टीमला खूपच दूर ठेवले; त्यामुळे आता कोअर टीमचे सदस्य उत्पलला जवळ करीत नाहीत, अशी गोव्यात चर्चा आहे.
उत्पल व भाजप यांच्यातील कटुता ही गेल्या वर्षभरातील आहे. उत्पल मध्यंतरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटून आले. त्यानंतर अमित शहा यांनीही उत्पलला बोलावून घेऊन संवाद साधला होता. या भेटींमध्ये पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय उत्पल यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या कानी घातला होता. उत्पलना भाजपने विविध ऑफर्स देऊन पाहिल्या पण उत्पल यांनी तत्त्वाचा मुद्दा करून सर्व ऑफर्स फेटाळल्या. त्यांनी बंड पुकारल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्पलशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण उत्पल यांनी आता सगळे दरवाजे बंद केले आहेत. कारण त्यांना पणजीत लढायचेच आहे. उत्पल यांच्या प्रचार मोहिमेत मनोहर पर्रीकर यांचे बंधू अवधूत हेदेखील उतरलेले आहेत. उत्पल हा केवळ पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट द्यावे हे भाजपच्या धोरणात बसत नाही, अशा अर्थाचे विधान मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे विधान उत्पल यांच्या व पर्रीकर कुटुंबीयांच्या जिव्हारी लागले आहे. बंड करण्याचा विचार तिथेच पक्का झाला. केंद्रीय भाजप नेतृत्व उत्पलला न्याय देऊ शकले नाही. उत्पल यांचे बंड हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही अपयश असल्याचे देशभर मानले जात आहे.
(लेखक गोवा लोकमते निवासी संपादक आहेत)