... तर देवच विरोधकांचे भले करू शकतो!

By रवी टाले | Published: June 21, 2019 03:43 PM2019-06-21T15:43:14+5:302019-06-21T15:56:42+5:30

विरोधक घेत असलेल्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात मात्र, मोदी सहकार्याचा हात पुढे करीत असताना विरोधकच हात आखडता घेत असल्याची प्रतिमा निर्माण होण्याचा धोका आहे.

God can do good to the opponents! | ... तर देवच विरोधकांचे भले करू शकतो!

... तर देवच विरोधकांचे भले करू शकतो!

Next
ठळक मुद्देनरेंद्र मोदी ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळतात, असा आरोप मागे सोनिया गांधींनी केला होता.मोदींवर बहिष्कार घालून विरोधकांना ध्येय गाठता येणार नाही.विरोधक पुन्हा तीच भूमिका घेऊन मोदींचा विरोध करू बघत असतील, तर मग देवच त्यांचे भले करू शकतो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘एक देश, एक निवडणूक’ या त्यांच्या आवडत्या संकल्पनेवर चर्चा करण्यासाठी, संसदेत किमान एक सदस्य असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना निमंत्रण दिले होते. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष इत्यादी प्रमुख पक्षांनी त्या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यानंतर पंतप्रधानांनी गुरुवारी रात्री संसद सदस्यांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीवर राष्ट्रीय जनता दलाने बहिष्कार घालण्याची घोषणा केली. कारण काय तर म्हणे, मेजवानीवर खर्च होणार असलेला पैसा बिहारमध्ये मेंदूज्वर अथवा चमकी तापाने ग्रस्त बालकांच्या उपचारासाठी खर्च करायला हवा!
आपल्या देशात वर्षभर कुठे ना कुठे, कोणती ना कोणती निवडणूक प्रक्रिया सुरूच असते. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून पंतप्रधान मोदींचा भारतीय जनता पक्ष गत काही काळापासून ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना पुढे रेटत आहे. या संकल्पनेचे जसे काही लाभ आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत. त्यावर भरपूर चर्वितचर्वण झाले आहे. विविध तज्ज्ञांनी त्यांची मते मांडली आहेत. या संकल्पनेला विरोध असलेल्या राजकीय पक्षांसाठी खरे म्हणजे पंतप्रधानांनी आयोजित केलेली बैठक ही एक उत्तम संधी होती. पंतप्रधानांची भूमिका कशी चुकीची आहे, हे त्यांच्या समक्ष सप्रमाण सिद्ध करून दाखविण्याची ही संधी विरोधकांनी घालवायला नको होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदींना अमोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान देत होते. मग आता अनायसे सगळ्या जरी नाही तरी एका मुद्यावर तशी चर्चा करण्याची संधी मोदींनी स्वत:च देऊ केली असता, ती घालविण्याचे कारण काय?
लोकशाहीमध्ये संवाद प्रक्रियेला सर्वाधिक महत्त्व आहे. मतेमतांतरे, विचारांचे आदानप्रदान हाच लोकशाहीचा आत्मा आहे. सर्वसामान्यांना स्वीकारार्ह असलेल्या निर्णयांप्रत पोहोचण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे. संघर्ष टाळण्याचा, मिटवण्याचाही संवाद हाच मार्ग आहे. इतर राजकीय प्रणालींच्या तुलनेत हेच तर लोकशाहीचे सौंदर्यस्थळ आहे. दुर्दैवाने गत काही काळापासून काही राजकीय पक्ष नरेंद्र मोदींशी संवादच नको, अशी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे मोदींचे तर काही नुकसान होत नाही. उलट त्यांना लाभच होत आहे असे दिसते.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच विरोधक त्यांना हेकेखोर, आढयताखोर, एकचालकानुवर्ती, हुकूमशहा, खुनशी इत्यादी विशेषणे लावत आहेत. त्यामुळे मोदींना काही तोटा झाला नाही. उलट ते सलग चारदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आणि त्यानंतर सलग दोनदा पंतप्रधान पदावर आरुढ झाले. दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यापासून ते सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भाषा करत आहेत. गत कार्यकाळातील ‘सब का साथ, सब का विकास’ या त्यांच्या लोकप्रिय घोषणेचा विस्तार करीत, ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ अशी नवी घोषणा त्यांनी सत्तेत आल्या आल्या दिली. त्यानंतर नव्या सरकारच्या पहिल्या संसद अधिवेशनातील पहिल्याच भाषणात, विरोधकांनी संख्याबळाची चिंता करू नये, त्यांचे विचार आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, अशी ग्वाही दिली. त्यांच्या या नव्या भूमिका तोंडदेखल्या असण्याची शंका विरोधकांना असू शकते आणि ती रास्तही असू शकते; परंतु प्रत्त्युत्तरादाखल विरोधक घेत असलेल्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात मात्र, मोदी सहकार्याचा हात पुढे करीत असताना विरोधकच हात आखडता घेत असल्याची प्रतिमा निर्माण होण्याचा धोका आहे.
नरेंद्र मोदी ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळतात, असा आरोप मागे सोनिया गांधींनी केला होता. स्वत:साठी चायवाला, फकिर, कामदार अशी बिरुदे वापरून सर्वसामान्य नागरिकांना साद घालण्यात त्यांचा नक्कीच हातखंडा आहे. त्यापैकी काही बिरुदे त्यांनी स्वत:च स्वत:साठी वापरली आहेत, तर काही बिरुदे विरोधकांनी डागलेल्या टीकास्त्रांमधून लावून घेतली आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये उफाळलेल्या जातीय दंगलींच्या अनुषंगांनी केलेल्या टीकेचा, त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकींमध्येच नव्हे, तर अगदी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतही फायदा करून घेतला होता. पंतप्रधान झाल्यावरही आपण ‘ल्युटेन्स दिल्ली’तील नसल्याने आपल्याला सापत्न वागणूक मिळते, एक कामदार पंतप्रधान झाल्याचे नामदारांना खुपत आहे, आपण पंतप्रधान झाल्याचे ‘खान मार्केट’च्या पचनी पडलेले नाही, अशी पेरणी करून त्यांनी सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळवली होती.
नरेंद्र मोदी या व्यक्तीला विरोध असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही संवादच साधायचा नाही, त्यांनाही वाळीत टाकायचे, अशी भूमिका जर विरोधक घेत असतील तर ते स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतील. तुम्ही दिलेले प्रचंड बहुमत पाठीशी असल्यावरही आपण संख्येने अल्प असलेल्या विरोधकांसमोर सहकार्याचा हात पुढे करीत आहोत आणि विरोधक मात्र तो हात झिडकारून टाकत आहेत, अशी मांडणी करत पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती मिळविण्याची आयती संधी विरोधक मोदींना उपलब्ध करून देत आहेत, असे म्हणावे लागेल!
मोदींवर बहिष्कार घालून विरोधकांना ध्येय गाठता येणार नाही. त्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्यासपीठावर त्यांचा प्रतिवाद करावा लागेल. ठोस मुद्दे घेऊन जनतेसमोर जावे लागेल. केवळ आरोपांची राळ उठवून भागणार नाही, तर आरोपांच्या पुष्ट्यर्थ ठोस पुरावेही द्यावे लागतील. दुर्दैवाने ते करायचे सोडून विरोधक आक्रस्ताळेपणा करीत असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निर्माण झाले होते. मतदारांनी विरोधकांची ती भूमिका साफ नाकारल्याचे निवडणूक निकालांनी स्पष्ट केल्यानंतरही विरोधक पुन्हा तीच भूमिका घेऊन मोदींचा विरोध करू बघत असतील, तर मग देवच त्यांचे भले करू शकतो!

Web Title: God can do good to the opponents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.