बलात्कार ही समाजाला लागलेली कीड आहे़ या कीडवर उपायांची व कठोर शिक्षेची कितीही फवारणी केली, तरी तिचा श्वास मात्र कोंडत नाही़ पोलिसांनी सुरू केलेल्या जनजागृतीमुळे ही कीड आता वेळीच ठेचली जात आहे. याचा प्रत्यय नुकताच एका घटनेतून आला़ ‘पोलीस दीदी’ या उपक्रमांतर्गत शालेय मुला, मुलींना ‘गुड टच, बॅड टच’चे धडे दिले जातात़ कोणाचा स्पर्श कसा, आक्षेपार्ह आहे़ असा स्पर्श झाल्यानंतर काय करावे, याचे प्रशिक्षणही दिले जाते़ शाळेत हे प्रशिक्षण घेतलेली एक सहा वर्षीय मुलगी तिच्यावर ओढवलेला प्रसंग टाळू शकली़ याचे श्रेय पोलिसांच्या कल्पकतेला निश्चितच द्यावे लागेल़ लहान मुलांना विश्वासात घेऊन स्पर्शाची ओळख करून देण्याचे कठीण काम पोलीस सध्या करत आहेत़ सहा वर्षीय मुलगी यामुळे आज सतर्क झाली़ पोलिसांनी व पालकांनीही या घटनेचा बोध घेत आपल्या मुलामुलींना लैंगिक अत्याचाराचे मूलभूत प्रशिक्षण द्यायला हवे़ बलात्कार रोखण्यासाठी जनजागृती करा, अशी सूचना निवृत्त न्या़ चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केली आहे़ या सूचनेची अंमलबजावणी करणार असल्याची हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयातही दिली आहे़ ही हमी कागदावरच न राहता, ती प्रत्यक्षात प्रभावीपणे उतरणे आवश्यक आहे़ शासनानेही त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आखायला हवा़ ९० च्या दशकात एड्ससारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शाळेत जाऊन मुलांना या आजाराची माहिती दिली जात होती़ शरीरसंबंध म्हणजे काय, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याची माहिती छायाचित्रे दाखवून दिली जात होती़ या उपक्रमामुळे हा गंभीर आजार आटोक्यात आणणे शक्य झाले़ आता पोलिसांनी सुरू केलेला ‘पोलीस दीदी’ उपक्रम प्रभावी ठरत आहे़ यापुढेही असेच उपक्रम राबवून दैनंदिन होणार बलात्कार रोखणे काही अंशी का होईना शक्य होणार आहे.
‘गुड टच, बॅड टच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:30 AM