स्टिफन विल्यम हॉकिंग या विकलांग असलेल्या आणि तरीही अंतरिक्ष विज्ञानाच्या व पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात वैश्विक मान्यता मिळविलेल्या शास्त्रज्ञाचे वयाच्या ७६ व्या वर्षी झालेले निधन विज्ञान व खगोलशास्त्राच्या क्षेत्राला पोरके करून गेले आहे. हलता-बोलता व चालताही येत नसल्याने कृत्रिम यंत्राच्या साहाय्याने गळ्यातून आवाज काढून जगभरच्या विज्ञान परिषदांना मार्गदर्शन करीत राहिलेल्या हॉकिंग यांचे ज्ञानसंपन्न व विज्ञानसमृद्ध भाषण ऐकणे व पाहणे हा एकाचवेळी आनंददायी व व्यथित करणारा प्रकार होता. कुणीतरी व्हीलचेअरवर आणून माईकसमोर बसविलेला हा शास्त्रज्ञ त्याच्या तोंडाने बोलू शकत नसे. मेंदूने व मनाने बोलत असे. ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील कूट वाटावे असे प्रश्न तो ज्या सहजपणे उलगडून व समजावून देत असे की त्याच्या ज्ञान शाखेतील ज्ञात्यांएवढाच सामान्य जनांनाही ते सहजपणे समजावे. वैज्ञानिक असूनही समाजाशी संपर्क राखणाऱ्या या विकलांग विज्ञानवाद्याने ‘काळाचा इतिहास’, ‘विश्वनिर्मिती’, ‘विश्वाचे स्वरूप’ आणि ‘कृष्णविवरांचे रहस्य’ यासारखी एकाहून एक संशोधनपर पुस्तके सिद्धस्वरूपात तर लिहिलीत आणि त्याचवेळी ‘शहाणपण म्हणजे बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची क्षमता’, ‘ज्ञानाचा खरा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम हा आहे’ आणि ‘सगळ्या घटना काळाने निश्चित केल्यानुसारच घडतात असे म्हणणारी माणसेही रस्ता ओलांडताना थबकलेली व दोन्ही दिशांना पाहात असलेलीच मला दिसली’ अशी सहज सुंदर व सुभाषितवजा वाक्येही लिहून गेला. विख्यात मध्ययुगीन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याच्या मृत्यूला ज्या दिवशी ३०० वर्षे पूर्ण झालीत त्याच ८ जानेवारी १९४२ या दिवशी आॅक्सफर्डमध्ये जन्म घेतलेल्या या ब्रिटिश वैज्ञानिकाने आपल्या अचाट बुद्धी वैभवाने सारे विज्ञान क्षेत्र अचंबितच केले नाही तर पायाशी आणले. हाडामासाचा नुसता लोळागोळा झालेला हा माणूस क्षेत्रात अंतरिक्षापलीकडचे कसे पाहू शकतो आणि त्यातल्या कृष्णविवरांचे कोडे कसे उलगडू शकतो हा विज्ञान क्षेत्रातील ज्ञात्यांएवढाच अजाणांच्या विस्मयाचा विषय होता. तो साºयांना नम्र करणाराही होता. जे ग्रहगोल व नक्षत्रे तुमच्या-आमच्या जीवनाला वळण देतात असे धर्मशास्त्र सांगते त्यांचे खरे पदार्थरूप स्पष्ट करणाºया हॉकिंग यांनी आयुष्यभर जगाला ज्ञान-विज्ञानाचा खरा मार्ग दाखविला व त्यावरून चालून जाण्याचे आणि समाधान प्राप्त करण्याचे मार्गदर्शन केले. पण धार्मिक अंधश्रद्धा आणि परंपरागत समजांच्या मागे लागून आपली सत्यदर्शनाची दृष्टी गमावलेल्या समाजाला अशा संशोधकांकडे केवळ उपेक्षेनेच नव्हे तर दयाबुद्धीनेही पाहायला लावले. त्यामुळे विज्ञान आणि समाज यांची वाटचाल समांतर आणि परस्परांना प्रभावीत न करता चाललेली दिसते. न्यूटन, आईन्स्टाईन किंवा हॉकिंग यांच्या वाट्याला आलेले एकटेपण असे उपेक्षित पण अंतरंगसमृद्ध असते. अशा माणसांना समाजाच्या मान्यतांची व पुरस्कारांच्या प्राप्तीची ओढ नसते. आपले क्षेत्र, त्यातले संशोधन आणि त्यात रममाण झालेली त्यांची अचाट बुद्धी हेच त्यांचे सर्वस्व, साधन व साध्यही असते. काळ आणि अंतर यांचे गूढ विज्ञानाएवढेच तत्त्वज्ञानालाही आजवर अनेक प्रश्न विचारीत आले. (असे प्रश्न धर्मांना आणि धर्मश्रद्धांना पडत नाहीत. त्यांना त्यांची सारी उत्तरे त्यांच्या श्रद्धेय ग्रंथात दिसत नसतानाही सापडत असतात.) हॉकिंग यांचा सर्वात मोठा साक्षात्कार या दोन वास्तवातील संबंधाची त्यांना झालेली जाणीव व त्याविषयी त्यांनी लिहिलेले व जगाला सांगितलेले संशोधन हे आहे. हॉकिंग यांचे महात्म्य हे की त्यांनी त्या शोधाचा शेवट जवळ आणत त्यातील सत्ये समाजाच्या हाती दिली. असा थोर वैज्ञानिक चालू-बोलू शकणारा नसावा हा नियतीचा संकेतही मग तपासावा असा आहे. ज्ञान-विज्ञानाचा उगम देहात वा मनात होत नाही. तो सावध व शोधक मेंदूतच होतो. बुद्धी, प्रज्ञा आणि संशोधन हीच ज्ञानाच्या वृद्धीची खरी क्षेत्रे असल्याचे व त्यासाठी तल्लख मेंदूच आवश्यक असतो हे सांगणारे हे वास्तव आहे. स्टिफन हॉकिंग यांना निरोप कसा द्यायचा? त्यांना नम्र अभिवादन करायचे आणि म्हणायचे ‘गुडबाय, सर स्टिफन’.
‘गुडबाय, सर स्टिफन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:29 AM