- मिलिंद कुलकर्णी
धुळे महापालिकेच्या अतीशय अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत भाजपाने यश मिळवित खान्देशातील विजयी परंपरा कायम ठेवली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वपक्षीय बंडखोर आमदार अनिल गोटे यांचे आव्हान लीलया पेलत राजकारणातील ‘महाजनकी’ सिद्ध केली आहे.नाशिक, जामनेर, जळगावच्या पालिका निवडणुका आणि पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे धुळ्याची जबाबदारी मुळात उशिरा देण्यात आली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे दोन मंत्री धुळे जिल्ह्यात असताना महाजन यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपविण्यामागे मोठे कारण म्हणजे आक्रमक आणि आक्रस्ताळे स्वभावाच्या स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांना सांभाळण्याचे आव्हान हे होते. गोटे यांचा स्वभाव पाहता भामरे आणि रावल यांच्यासारखे सौम्य, मृदू स्वभावाच्या नेत्यांचा टीकाव लागणे अवघड असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन हा हुकूमाचा एक्का काढला.महाजन यांची कार्यशैली इतर नेत्यांपेक्षा वेगळी आहे. सभा, पत्रकार परिषदांमधून वक्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व गाजविणाऱ्यांपैकी ते नाही. सामान्य माणूस, कार्यकर्ता, विविध समाजघटकांमध्ये सरळ मिसळणारा आणि जनतेची नाडी अचूक ओळखणारा, त्यानुसार व्यूहरचना, रणनीती आखणारा हा नेता आहे. प्रत्येक नेता आणि कार्यकर्त्याची योग्य पारख करुन त्याच्याकडे नेमकी जबाबदारी सोपविण्यात वाकबगार म्हणून महाजन यांची ओळख आहे. अनिल गोटे यांनी तीन महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली होती. प्रत्येक प्रभागात सभा घेऊन प्रचारयंत्रणा कामाला लावली. त्यांच्या प्रचार सभांच्या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्वत:चा फोटो आणि कमळाचे चिन्ह असायचे. भामरे, रावल यांना त्यांनी कोठेही स्थान ठेवलेले नव्हते. स्वत:च्या उमेदवारांच्या मुलाखतीदेखील त्यांनी आटोपल्या. पक्षश्रेष्ठी आणि मंत्र्यांना विश्वासात न घेता त्यांनी एकतर्फी आणि एककल्ली प्रचार सुरु केला. महाजन यांनी धुळ्याची धुरा सांभाळल्यानंतर गोटेंना दुर्लक्षित करण्याचे काम सुरुवातीला केले. त्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष आणि आरोपांना उत्तर देण्यासाठी डॉ.भामरे यांच्याकडे सोपविलेली कामगिरी महत्त्वाची ठरली. यामुळे भाजपा कार्यकर्त्याचा आत्मविश्वास दुणावला.
भाजपाच्या यशाचे कारणगिरीश महाजन यांनी डॉ.सुभाष भामरे, जयकुमार रावल या मंत्र्यांसोबत जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांची मोट बांधली. पुणे, नाशिक व जळगावप्रमाणे इतर पक्षातील ‘इलेक्टीव मेरीट’ असलेल्या उमेदवारांना भाजपामध्ये प्रवेश दिला. वॉर्ड आणि बूथनिहाय यंत्रणा राबवली. सर्वेक्षण, समाजमाध्यमांचा प्रचारासाठी वापर अशा माध्यमातून वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी जाहीरसभेपूर्वी शहरातील निवडक प्रतिष्ठीत नागरिकांशी संवाद साधून त्यांना धुळ्याच्या विकासाविषयी आश्वस्त केले. जळगाव, नंदुरबार आणि नाशिकच्या नेते व कार्यकर्त्यांनी प्रभागाची जबाबदारी स्विकारुन केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे फलित म्हणजे हा विजय आहे.गोटेंचा आक्रस्ताळेपणा नडला‘अँग्री यंत्र मॅन’ या प्रतिमेच्या मोहात पडून ७१ वर्षीय अनिल गोटे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून केलेला आक्रस्ताळेपणा धुळेकरांना रुचला नाही. गुंडगिरी, अश्लिल भाषेचा वापर, निष्ठावंत, आयाराम-गयाराम हे मुद्दे घेऊन गोटे यांनी भाजपावर निशाणा साधला. पण स्वत: गोटे या आरोपापासून स्वत:ला मुक्त कसे करु शकतात, हा प्रश्न प्रभावी ठरला. त्यांच्या कोलांटउड्या धुळेकरांच्या पचनी पडल्या नाहीत. सलग १५ वर्षे विरोध करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवर्धन कदमबांडे यांच्याशी युतीचा कथित प्रस्ताव, ‘राष्ट्रवादी सेना’ म्हणून उपमर्द केलेल्या शिवसेनेच्या पाच उमेदवारांना स्वयंस्फूर्तपणे दिलेला पाठिंबा आणि नंतर त्यांच्याकडून लोकसंग्रामच्या १३ उमदेवारांना मिळालेली पाठिंब्याची परतफेड, मतदारांना त्यांच्या विश्वासार्ह प्रतिमेविषयी शंकीत करुन गेली. भाजपामधून बंड करताना किमान स्वत:च्या लोकसंग्राम पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणीदेखील न केलेल्या गोटेंच्या या कृतीचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. भाजपा आपल्याशी शेवटच्या क्षणी जुळवून घेईल हा गोटे यांचा ग्रह असावा असे एकंदर वाटते. परिणामी समान चिन्ह नसलेल्या पॅनलशिवाय गोटे निवडणुकीला सामोरे गेले. आणि सपशेल अपयशी ठरले.आघाडीला धक्कासलग दहा वर्षे ताब्यात असलेली महापालिका गमावण्याची पाळी राष्ट्रवादीवर आली, यामागे ‘अँटीइनकम्बन्सी फॅक्टर’ महत्त्वाचा जसा ठरला, तसा मातब्बर २० नगरसेवक ऐनवेळी भाजपामध्ये गेल्याने नेते कदमबांडे यांना नव्याने डाव मांडावा लागला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजपा आणि गोटे यांच्या वादाने आघाडीच्या प्रचारावर परिणाम झाला. गोटेंशी हातमिळवणीच्या चर्चेने तर हातचे गमावण्याची पाळी राष्ट्रवादीवर आली. (निवासी संपादक, लोकमत)