बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर एकीकडे तिच्या चाहत्यांना, नि:सीम भक्तांना कमालीचे दु:ख झाले आहे, तर दुसरीकडे तिच्या मृत्यूनंतर उडालेल्या वावड्यांमुळे व्हॉट्सअॅपवर हीणकस विनोदाचे पेव फुटले आहे. श्रीदेवीवर विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिचे अंत्यदर्शन घेण्याकरिता बॉलिवूड स्टार्सने गर्दी केल्याने एकीकडे हवशे-नवशे-गवशे यांनी गर्दी केली, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशपासून दक्षिणेच्या राज्यांतून तिचे चाहते साश्रुनयनांनी रांग लावून तिची चिरनिद्रा घेणारी मुद्रा पाहण्याकरिता आतुर झाले होते. श्रीदेवी यांच्या घराबाहेर, अंत्ययात्रेच्या मार्गावर तसेच विलेपार्ले स्मशानभूमीच्या परिसरात जमा झाले होते. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी तर श्रीदेवीवरील अंत्यसंस्कार हा अघोषित इव्हेंट असल्याचे ठरवले होते. शुभ्र कपडे परिधान केलेले स्टार्स मुलाखती देत होते; आणि त्यांच्या मागून कॅमेºयात दिसण्याकरिता वेडीपिशी जनता उड्या मारत होती. या साºयांना आवरताना पोलिसांची तारांबळ होत होती. लाठीमार, धक्काबुक्की, रेटारेटी यांची दृश्ये दिवसभर छोट्या पडद्यावर दिसत होती. त्याचवेळी श्रीदेवीचे नि:सीम चाहते हंबरडे फोडून तिच्यावरील प्रेमाच्या, तिच्या जमा केलेल्या छायाचित्रांच्या, तिच्या चित्रपटांना पाहण्याकरिता केलेल्या सव्यापसव्याच्या कहाण्या कथन करत होते. रस्त्यांवरही दोन परस्परविरोधी चित्रे होती, तर सोशल मीडियावर श्रीदेवीचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून, बाथटबमध्ये बुडून झाल्याचे उघड झाल्यापासून तर्कवितर्क, अफवा, बदनामीसदृश पोस्ट यांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. दुबई पोलिसांनी श्रीदेवीच्या मृत्यूमध्ये काही काळेबेरे नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही त्यामध्ये काळेबेरे असल्याचा संशय घेणे हे विकृततेचे लक्षण आहे. कायमच भ्रष्टाचार, घोटाळे दिसणारे व बेलगाम वक्तव्य करणारे ‘विकृत शिरोमणी’ सुब्रह्मण्यम स्वामी हे अशावेळी पाठीमागे कसे राहतील? त्यांनीही हा खून असल्याचा जावईशोध लावला. स्वामी यांनी या वादात दाऊदला ओढून आपला संघ परिवाराचा अजेंडा पूर्ण केला. त्यामुळे लोकांच्या चर्चांना आणखी ऊत आला. एकीकडे श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल संशय घेणारे शंकासुर, तर दुसरीकडे बाथटबमधील अंघोळ, स्त्रियांचे मद्यपान यावरून विनोदांचा सुकाळ झाला होता. श्रीदेवी ही अभिनेत्री असल्याने ‘पब्लिक फिगर’ होती, तशी ती तिच्या मुलांची आई होती. तिच्या मृत्यूनंतर असे हीणकस विनोद करणे, हे असभ्यतेचे लक्षण आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व अभिनेत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर अशाच अफवा व विनोदांचा पाऊस पडला होता. सेलिब्रिटी म्हणून जगणे हे कठीण असतेच, पण सेलिब्रिटी म्हणून मरणे हे त्याहून कठीण, क्लेशदायक असते.
गोंधळ हवशा-नवशांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:37 AM