नागपूर आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे सध्या आजाराशी लढताहेत. नागपूर जिल्ह्याला ‘डेंग्यू’ने डंख मारला आहे. गत २० दिवसात जिल्ह्यातील चार लोकांचा ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू आणि ‘स्क्रब टायफस’ या संक्रामक आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत. मात्र शहरातील आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात या आजाराशी संबंधित अद्ययावत उपचार मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. या संक्रामक आजाराचे प्रमाण वाढल्यास अनेक रुग्ण मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजाराशी कसा लढा देता येईल, याबाबत सरकारने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्यातील खात या गावात डेंग्यूमुळे १२ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर गावात फॉगिंग करण्यासाठी आणि रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक पोहोचले. हे पथक आधीच पोहोचले असले तर कदाचित ती मुलगी वाचली २२असती. अशीच घटना नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषद क्षेत्रात घडली. तेथेही एका नोकरदाराचा डेंग्यूमुळे बळी गेला. दोन्ही ठिकाणी कारण एकच अस्वच्छता ! त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने मृत्यू झाल्यावर एखाद्या ठिकाणी जाण्यापेक्षा गावपातळीवर दरवर्षी अशा आजारापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखल्या तर अनेकांचे जीव वाचतील. मात्र सरकारी मानसिकतेने ग्रासलेल्या लोकांना याच्याशी काही देणे घेणे नाही. मुळात ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार आहे. आपल्या देशात तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि विदर्भात या रोगाचे रुग्ण सापडतात. साधारणत: पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण दिसून येतात. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण सध्या नागपूर जिल्ह्यात आहेत, ही निश्चितच चिंतेची बाब आहे. याबाबत आरोग्य विभागाने आत्ममंथन करणेही तितकेच गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, महापालिका याही या आजाराच्या वाढत्या संक्रमणासाठी तितक्याच दोषी आहेत. याबरोबरच परिसर स्वच्छतेसाठी सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहणारे नागरिकांचे बेजबाबदार धोरण, याबाबत न बोललेले बरे. कारण आमच्या देशात केवळ गांधी जयंतीला लोक हातात झाडू घेतात आणि सेल्फी काढतात. बाकी ३६४ दिवस त्यांचा परिसर किंवा गाव स्वच्छता अभियानाला सुटी असते. सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून गाव स्वच्छता अभियानाची मोहीम राज्यभर चालविली. मात्र याला स्पर्धेचे स्वरूप आल्यानंतर काही ठिकाणी केवळ पुरस्कारासाठी गावे स्वच्छ केली गेली. नंतर पुन्हा जैसे थे.
सरकार सावध व्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 6:24 AM