जगभरातला कोणताही देश घ्या, तिथले गुन्हे, गुन्हेगार शोधून काढण्यात कुत्र्यांचा वाटा फार मोठा असतो, आहे. भारतातही याचं प्रमाण खूप मोठं आहे. अनेक मोठमोठे गुन्हे तर या प्रशिक्षित कुत्र्यांमुळेच उघडकीस आले आहेत. जगभरात वेळोवेळी या कुत्र्यांचा विशेष पारितोषिक देऊन सन्मानही करण्यात आला आहे. कुत्र्यांच्या जोडीला आणखी एक प्राणी आहे, तो म्हणजे घोडा. अनेक देशांत गुन्हे हुडकून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित घोड्यांचाही वापर केला जातो. ड्रग्ज आणि विस्फोटकांचे गुन्हे शोधून काढण्यात तर कुत्र्यांचा हातखंडा आहे. याशिवाय मोडकळीस आलेल्या इमारती पडल्यावर, भूकंप झाल्यावर ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या जिवंत लोकांना हुडकून काढणे, फरार गुन्हेगारांना शोधण्यास मदत करणे, अग्निशामक दलाला मदत करणे, उपद्रवी गर्दीला नियंत्रणात आणणे... यासारख्या अनेक प्रकरणांत कुत्र्यांचा वापर केला जातो. काही देशांत यासाठी कुत्र्यांबरोबरच घोड्यांचाही वापर केला जातो. सरकारची आणि सरकारी खात्यांची इतकी इमानेइतबारे सेवा करूनही या प्राण्यांना काय मिळतं? - तर दोन वेळचं जेवण आणि राहाण्यासाठी जागा! ‘सेवानिवृत्त’ झाल्यानंतर तर या प्राण्यांचे हाल कुत्रंही खात नाही, अशी त्यांची दशा होते. कारण जेवण आणि राहाणं या दोन्ही गोष्टींपासूनही नंतर ते वंचित होतात. सरकार आणि डिपार्टमेंट त्यांची देखभाल करणं, त्यांच्यावर खर्च करणं बंद करतं. अशा प्राण्यांना मग कुणातरी प्राणिप्रेमी व्यक्तीला किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेला देऊन टाकलं जातं. ज्या प्राण्यांनी गुन्हे शोधण्यासाठी आपल्याला आयुष्यभर मदत केली, त्यांना असंच सोडून देताना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही फार दु:ख होतं; पण तेही काही करू शकत नाहीत. त्यातल्या त्यात हे प्राणी कुठल्या तरी चांगल्या संस्थेकडे किंवा व्यक्तीकडे जावेत यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करतात.युरोपियन देश पोलंडनं मात्र या समस्येवर उपाय शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांच्या आग्रह, विनंतीनुसार पोलंडच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात नव्या कायद्याचा एक प्रस्तावच तयार केला आहे. पोलंडचे गृहमंत्री मॉरिस कॉमिन्स्की यांनी कायद्याचा हा मसुदा म्हणजे आपली नैतिक जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. ज्या प्राण्यांनी इतकी वर्षे इमानेइतबारे सरकारी सेवा केली, त्यांच्या वाट्याला ‘निवृत्तीनंतर’ अशी वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे. या प्राण्यांनी एखाद्या माणसाला जरी वाचवलं असेल, केवळ एखाद्याच खतरनाक गुन्हेगाराला पकडून देण्यासाठी मदत केली असेल, तरी या प्राण्यांप्रति आपण कृतज्ञ राहायला हवं, असं भावनिक आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं.या कायद्याच्या मसुद्यावर अजूनही काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर संसदेच्या आम सहमतीसाठी हे विधेयक संसदेसमोर सादर केलं जाईल. या वर्षाच्या अखेरीस हे विधेयक संसदेत संमतीसाठी ठेवलं जाईल आणि ते मंजूर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. हे विधेयक संमत झालं, तर सरकारी सेवा करणाऱ्या या प्राण्यांना सेवानिवृत्तीनंतर तहहयात पेन्शन दिली जाईल आणि त्यांच्या व्यवस्थेचा सारा खर्च उचलला जाईल. वॉर्सा येथील प्रसिद्ध स्निफर डॉग ऑर्बिटा याला हँडल करणारे पोलीस अधिकारी पॉवेल कुचनिओ यांचं म्हणणं आहे, हे प्रशिक्षित कुत्रे निवृत्त झाल्यानंतरही त्यांची देखभाल आणि चिकित्सा यावर मोठा खर्च येतो. त्यांना जर पेन्शन मिळाली, तर त्याची त्यांना आणि त्यांच्या नव्या मालकांनाही मोठी मदत होईल. या प्राण्यांची चांगली देखभाल व्हावी आणि इतकं मोठं देशकार्य करणाऱ्या या प्राण्यांचं उर्वरित आयुष्य सुखात जावं यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी बऱ्याच काळापासून हा विषय सरकारकडे लावून धरला होता. त्यांच्याप्रति ते भावुकही झाले होते. त्यांच्या आग्रहामुळेच सरकारला कायद्याचा हा मसुदा तयार करावा लागला. पोलंडमध्ये अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी या प्राण्यांनी, विशेषत: कुत्र्यांनी पोलिसांना मोठी मदत केली आहे. एवढंच नाही, काही पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे प्राणही त्यांनी वाचवले आहेत. या इमानी प्राण्याची सेवानिवृत्तीनंतर आबाळ होत असल्याने काही पोलिसांनी स्वत:हूनच त्यांच्या खर्चाची जबाबदारी उचलली होती.
१२०० कुत्रे आणि ६० घोडे! सरकारी माहितीनुसार, पोलंडमध्ये दरवर्षी अनेक कुत्रे आणि घोडे पोलिसांच्या मदतीसाठी प्रशिक्षित केले जातात. सध्याच्या घडीला १२०० पेक्षा जास्त कुत्रे आणि साठहून अधिक घोडे पोलिसांना मदत करण्यासाठी सरकारी सेवेत आहेत. कुत्र्यांमध्ये जर्मन आणि बेल्जियन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी साधारण दहा टक्के प्राणी ‘सेवानिवृत्त’ होतात. कायदा झाल्यानंतर या सगळ्या प्राण्यांना पेन्शनचा लाभ मिळेल.