- सचिन जवळकोटे
‘थोरले काका बारामतीकरां’ना नेहमीच दिल्लीपेक्षा महाराष्ट्र प्यारा. त्यातही पश्चिम महाराष्ट्र लाडका. त्यात पुन्हा सोलापूर, पुणे अन् सातारा प्रांत तर त्यांच्या हक्काचे. विश्वासाचे. या पार्श्वभूमीवर या परिसरात गेल्या दीड-दोन दशकांपासून ‘अजितदादा गट’ तयार झालेला. आता हे कमी पडलं की काय म्हणून ‘रोहितदादा’ही सोलापूरच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालू लागलेले. भविष्यात नेमकी कोणत्या दादांची वारसदारी इथं चालणार, याची नांदीच अलीकडच्या काही घटनांमधून दिसू लागलेली. लगाव बत्ती. सोलापुरी प्रांतातील काही गावांमध्ये ‘बारामतीकरां’ना मानणारा मोठा वर्ग अनेक दशकांपासून अस्तित्वात राहिलेला. ‘बारामती’नंतर सर्वाधिक प्रेमही याच ‘सोलापूर’वर ‘थोरल्या काकां’नी केलेलं. ‘भावी पीएम’ म्हणून माढ्याच्या जनतेनंही त्यांना दिल्लीत पाठवलेलं. मात्र नंतरच्या काळात ‘धाकटे दादा’ या परगण्यात नको तेवढं लक्ष घालू लागले. स्थानिक समीकरणं झपाट्यानं बिघडत गेली. स्वतंत्र ‘अजितदादा गट’ उदयास आल्यानंतर अनेक सरदारांनी ‘घड्याळा’ला रामराम ठोकलेला. बरेच सेनापतीही ‘बारामतीकरां’पासून दूर गेलेले. हे सारं ‘थोरल्या काकां’ना समजत नव्हतं की ते हतबल होते, हे काळाला ठाऊक. मात्र या घराण्याची तिसरी पिढी आता पुन्हा एकदा सोलापुरात आपलं नवं अस्तित्व दाखवून देऊ लागलीय. बारामतीच्या ‘रोहितदादां’नी विधानसभेला ‘कर्जत’मध्ये शिरकाव करत छानपैकी बस्तान बसविलं. त्यानंतर ते आता सोलापूरच्या घडामोडींकडेही बारीक लक्ष देऊ लागलेत. इथल्या विद्यापीठात उभारल्या जाणा-या पुतळ्याबाबत यांनी मंत्रालयात ‘सामंतां’सोबत खास बैठक घेतली. ऑक्टोबरमध्ये या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ होणार असून त्यावेळी हे ‘दादा’ आवर्जून उपस्थित राहणार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठामपणे सांगितलं जाऊ लागलंय. विशेष म्हणजे याचवेळी पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र युवक मेळावाही घेण्याचं नियोजन आखलं गेलंय.
याच ‘रोहितदादां’च्या कारखान्याला सोलापूर जिल्ह्यातून लाखो टन ऊस दरवर्षी पोहोच करण्यात आलेला. यासाठी करमाळ्यातल्या ‘गुळवें’सह काही मंडळी नेहमीच अग्रेसर. या उसाच्या निमित्तानं भीमा काठावरच्या हजारो शेतक-यांशीही या कारखान्याचा थेट संपर्क वाढलेला. ‘माळशिरस’मधल्या ‘गोरडवाडी’च्या तरुणांनाही ‘रोहितदादां’नी आपल्या ‘युवा मंच’वर आवर्जून घेतलेलं. माढ्यातली काही पोरंही त्यांना नुकतीच भेटून आलेली. एकेका तालुक्यातली तरुण पिढी हळूहळू आपल्यासोबत जोडून ‘दादा युवा मंच’ या जिल्ह्यात स्ट्राँग होत असतानाच ‘अजितदादां’नी ‘इस्लामपूर’च्या ‘जयंतदादां’ना पूर्वी कधी काळी दिलेला निरोप कार्यकर्त्यांमध्ये खासगी चर्चिला जाऊ लागलेला, ‘सोलापूरचा कोणताही निर्णय मला विचारल्याशिवाय परस्पर घेऊ नका.’.. आता बोला. पुतळ्याचा निर्णय तर सोडाच, कार्यकर्त्यांची निवडही म्हणे आता परस्पर होऊ लागलीय.
ता.क. : ‘रोहितदादां’चा वावर सोलापुरी टापूत वाढत असतानाच आता ‘पार्थ’लाही इथं आणण्याचा घाट दुस-या गटाकडून आवर्जून घातला जातोय. लगाव बत्ती..
महेश अण्णांचं ‘अंदरकी आडपिंचिंडू’!
तुम्हाला महापालिकेतले ‘महेशअण्णा’ आठवतात का? होय. तेच ते. मुरारजी पेठेतले. इलेक्शनपूर्वी ‘धनुष्यबाण’ घेऊन फिरत होते. तिकीट मिळेना म्हटल्यावर ‘कमळ’वाल्या ‘चंदूदादां’बरोबर सलगी वाढवू लागलेले. नंतर ‘अपक्ष’ उभारून ‘प्रणितीताईं’ना निवडून आणण्यात यशस्वी ठरलेले. ‘एकाच वेळी सर्वांना फिरविणं’ याला तेलुगूत ‘अंदरकी आडपिंचिंडू’ म्हणतात. आता तर म्हणे ते ‘घड्याळ’ बांधण्यासाठी प्रचंड उत्सुक बनलेत. खरंतर, निवडणुकीपूर्वीच पंढरपूरच्या ‘भारतनानां’नी त्यांची गाठ ‘बारामतीकरां’सोबत घालून दिलेली. ‘शेट्टीं’चा ‘हात’ सोडून नंतर पटकन ‘घड्याळ’ वापरणा-या ‘नानां’नी म्हणे ‘अण्णां’ना ‘पक्षनिष्ठा कशी टिकवायची असते’, यावर शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केलेलं. असो. तेव्हा काही ‘जुळणी’ झाली नव्हती. मात्र आता ‘लक्ष्मी-विष्णू’वाल्या ‘दिलीपभाऊं’ना सोबत घेऊन ‘अण्णां’नी स्वातंत्र्यदिनी ‘भरणेमामां’ची गुपचूप भेट घेतलेली. मात्र त्यांची ‘एमएलसी’ची अट ऐकून ‘मामा’ही दचकलेले. ‘अनगरकरां’सारखी कैक जुनी-जाणती नेतेमंडळी अजूनही पंगतीच्या रांगेत उभारलेली असताना या नव्या अनाहूत पाहुण्याच्या हातात पंचपक्वान्नाचं ताट कसं द्यायचं, असाही प्रश्न या ‘मामां’ना पडलेला. मात्र आगामी महापालिका निवडणुका त्यांच्या डोळ्यांसमोर तरळलेल्या. एकदा तरी ‘बाळीवेशी’पलीकडे आपल्या ‘घड्याळाचा गजर’ करायचा असेल तर दीड डझन मेंबरांसह ‘अण्णां’ना आपल्या पार्टीत घेणं, कधीही फायद्याचंच, हे त्यांच्या लक्षात आलेलं. मात्र, या पक्षांतरावरून ‘मातोश्री’वर पुन्हा गडगडाट झाला तर ‘मीडिया’वाले लगेच ‘सरकार गडगडणार’चा भोंगा वाजविणार, हेही ‘बारामतीकर’ ओळखून.. कारण आत्ताच कुठं ‘पारनेर’चं प्रकरण मिटविता-मिटविता सा-यांना नाकीनऊ आलेलं. मात्र ‘मेंबरां’ना बाजूला ठेवून ‘अण्णा’ एकटेच ‘घड्याळ’वाल्यांसोबत गेले तर ‘देवेंद्र्रदादां’ची चांदीच चांदी. स्वत:कडे ‘धनुष्यबाण’, काकांकडे ‘घड्याळ’ अन् ‘सासुबाईं’कडं ‘कमळ’. वाऽऽ रे वाऽऽ ऑल इन वन. जणू ‘बाय वन गेट थ्री’च की.. पण या धरसोड वृत्तीमुळे ‘एक ना धड भाराभर..’ असं होऊ नये म्हणजे मिळवली. लगाव बत्ती.
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)