- किरण अग्रवाल
शरीरावरील जखमा भरून निघत असतात, मात्र मनावर झालेल्या आघाताची वेदना कायम अस्वस्थ करीत राहते. कोकणच्या किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागात झालेली अतिवृष्टी व नद्यांना आलेला महापूर असाच अनेकांसाठी वेदनादायी ठरला आहे. होत्याचे नव्हते करून गेलेल्या या अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांच्या मनावर ज्या जखमा झाल्या आहेत त्या केवळ मदतीच्या पॅकेजेसने भरून निघणाऱ्या नाहीत. या पॅकेजेसने संबंधितांचे दुःख काहीसे हलके जरूर होईल, परंतु या आघाताचे व्रण दूर करायचे तर त्यासाठी शासनाला व समाजधुरीणांनाही एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील. असे प्रयत्न केवळ प्रासंगिक पातळीवर अश्रू पुसण्यापूरते व दिलाशाच्या दोन शब्दांचेच राहता उपयोगाचे नाही, तर भविष्यकाळात अशा संकटांपासून बचावण्यासाठीच्या उपयात्मक योजनांबाबतही ते होणे गरजेचे आहे.
कोरोनाचे संकट अजून पूर्णतः संपलेले नाहीच, पण त्याच्या दुसऱ्या लाटेतून काहीसे बाहेर पडू पाहत असतानाच निसर्गाच्या फटक्याने नवीन संकटाला सामोरे जाण्याची वेळ आणून ठेवली आहे. गेल्या काही दिवसात कोकणसह कोल्हापूर, सांगली, सातारा व राज्याच्या अन्यही काही परिसरात जो धुवाधार पाऊस झाला त्याने अनेकांची स्वप्ने धुऊन काढली आहेत. चिपळूणमधील हाहाकार असो, की पाण्यात वेढलेले कोल्हापूर; येथील भयकारी चित्रे मनाचा थरकाप उडवणारी आहेत. परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, नांदेड, पुणे आदी ठिकाणीही नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. ग्रामीण भागात नदीकाठावरील शेती खरडली गेली असून नुकतीच झालेली खरिपाची पेरणी वाहुन गेली आहे. पूर पाणी आता ओसरते आहे, पण डोळ्यातले अश्रू ओसरणारे नाहीत. घरादारात, दुकानात चिखल साचला आहे; तर अनेकांची चूल अजूनही पेटू शकलेली नाही. त्यातून जी खिन्नता, विषण्णता आली आहे ती आर्थिक नुकसानीपेक्षाही मानसिकदृष्ट्या मोठी परिणामकारक आहे. त्याच्या म्हणून ज्या जखमा आपदग्रस्तांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत त्या भरून येणे कठीणच आहे.
अशा संकटसमयी कोलमडून पडलेल्या नागरिकांना तातडीने दिलासा देणे व सरकार तुमच्या पाठीशी आहे हे दाखवून देणे गरजेचे असते, त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी आपदग्रस्त भागाचे दौरे केले व नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली हे समाधानाचेच म्हणायला हवे. राज्यपाल महोदयांनी तर चिपळूणमधील पूरग्रस्तांना दिलासा देताना ''देश तुमच्या पाठीशी आहे'' अशा शब्दात धीर दिला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यासाठी शासकीय यंत्रणा कामालाही लागली आहे. आपत्तीचे राजकारण न करता सर्वांनी मिळून नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला त्यांचे काम करू द्या, पूरग्रस्त पाहणीचे टुरिझम करू नका असा सल्ला देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदतीची घोषणाही केली. भाजपानेही आपल्या आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, युथ फॉर डेमोक्रॅसी सारख्या संस्थाही मदतीसाठी पुढे आल्या आहेत. जागोजागची स्थानिक सामाजिक मंडळेही त्याकरिता सरसावली असून मदतीचा हा हात नक्कीच दिलासादायक ठरला आहे.
महत्वाचे म्हणजे, सरकारी पॅकेजेसमधून मिळणाऱ्या पै- पैशाची, अन्नधान्याची मदत ही ओढवलेल्या दुःखावर तात्कालिक फुंकर घालणारी असली तरी मनावर झालेले आघात दूर करण्यासाठी मानसशास्त्राच्या अंगाने विचार व उपाययोजना होणे गरजेचे आहे. संकटातून ओढवलेली अनेकांची विवशता पाहता अर्थकारणाबरोबरच समाजकारणाचे पदर यात महत्त्वाचे ठरावेत. फक्त मदतीचे सोपस्कार करूनही चालणार नाही, आता पुर पाणी ओसरून गेल्यानंतर तेथे भेडसावू शकणाऱ्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता त्याहीदृष्टीने उपाय योजना केल्या जाणे गरजेचे आहे. दुःख अपार आहे, तसे समस्याही अगणित असतील; त्याचे निराकरण केवळ मंत्रालयात बसून होणार नाही तर त्या त्या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नेमून घोषित केलेली मदत शेवटच्या घटकापर्यंत नीट पोहोचते आहे की नाही याचे व केल्या जाणाऱ्या उपाय योजनांचे पर्यवेक्षण करावे लागेल. पिक विमा योजनेसारख्या बाबी अधिक लाभदायी कशा ठरतील याकडे लक्ष पुरवावे लागेल, तसेच प्रतिवर्षी पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता नद्या-नाल्यांना शहर परिसरात संरक्षक भिंत बांधण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविल्याचे पाहता भविष्यकाळात अशा संकटापासून बचावण्यासाठीच्या उपायांकडेही लक्ष द्यावे लागेल. एकूणच संकटसमयी पक्षभेद विसरून धावून जाण्याचा आजवरचा जो इतिहास आहे तो कायम करण्याची ही वेळ आहे इतकेच यानिमित्ताने.