काँग्रेस पक्ष पराभूत, पण काँग्रेसी संस्कृती विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 04:32 AM2019-08-10T04:32:20+5:302019-08-10T04:33:36+5:30
काँग्रेस पक्ष विस्कळीत होत असला, तरी काँग्रेसी संस्कृती मात्र जिवंत राहणार आहे!
- संतोष देसाई, राजकीय अभ्यासक
भारतीय जनता पक्ष अनेक क्षेत्रांत काँग्रेसचीच प्रतिकृती बनत चालला आहे, असे वाटू लागले आहे. त्यात अजून घराणेशाहीचे दर्शन घडत नसले आणि काँग्रेसप्रमाणे त्यांना अल्पसंख्यांकांविषयी आत्मीयता वाटत नसली, तरी अन्य बाबतीत त्या पक्षाचे काँग्रेसशी असलेले साम्य वाढू लागले आहे, असे निर्विवादपणे म्हणता येईल. मुक्त बाजारपेठेपासून तो पक्ष गेल्या पाच वर्षांत दूर गेला आहे. काँग्रेसचेच कल्याणकारी कार्यक्रम त्याने पुढे चालविले असून, त्यात स्वत:ची भरही घातली आहे. या कल्याणकारी कार्यक्रमांमुळे २०१९च्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश मिळाले, अशी त्या पक्षाची धारणा आहे. याशिवाय त्यात बालाकोटच्या हल्ल्यामुळे व नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे भरच पडली आहे.
भाजपने सादर केलेल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांना फारसा स्पर्श केलेला दिसत नाही, पण उद्योग व्यवसायात एकूण आशावादी दृष्टिकोन दिसत आहे. कारण त्यांना भविष्यात काय ओढवणार आहे, याची जाणीव आहे. या सरकारला औद्योगिक क्षेत्रात फार मोठे परिवर्तन घडवून आणण्याची इच्छा दिसत नाही. आर्थिक दृष्टीने भाजपने काँग्रेसचाच फार्म्युला वापरायला सुरुवात केली आहे. राजकीय क्षेत्रातही स्वत:चा दृष्टिकोन व्यापक आहे, असे दाखविण्यासाठी विविध मार्ग शोधले जात आहेत. त्या पक्षाला उच्चवर्णीयांकडून, तसेच ब्राह्मणांकडून स्वीकारले जायला मर्यादा आहेत, पण तो ओबीसी आणि आदिवासींना आकर्षित करू शकला आहे. मुस्लीम समाजाला स्वीकारण्यास त्याला अडचणी येत असल्या, तरी अन्य गटांना तो काँग्रेसप्रमाणेच स्वीकारू लागला आहे. मग त्याचे ते छत्र हिंदुत्वाचे का असेना!
संधीसाधू लोकांना पक्षात स्थान देताना त्या पक्षावर काँग्रेसची छाप स्पष्टच जाणवते. कसेही करून विरोधकांची सरकारे पाडून तेथे आपल्या पक्षाची सरकारे स्थापन करण्याचे प्रयत्न त्याने चालविले आहेत, ही पद्धत त्याने अनेकदा अवलंबिली. कर्नाटक हे त्याचे अलीकडचे उदाहरण आहे. वास्तविक, तेथील त्यांचा नेता काही स्वच्छ प्रतिमा असलेला नाही. त्यांनी आवश्यक तेवढे सदस्य स्वत:कडे वळविताना केलेली कृत्ये चांगली नव्हती. गोव्यात त्या पक्षाने जे काही केले, त्यामुळे त्याने पक्षातील समर्थकांचा राग ओढवून घेतला. तेथील भाजपचे कृत्य पूर्णपणे संधीसाधूपणाचे होते.
सुरुवातीला हा पक्ष लोकशाही तत्त्वांचे पालन करणारा वाटत होता, पण आता तो काँग्रेसच्या वळणावर गेल्याचे दिसते. त्याच्यातही जाणवणाऱ्या हायकमांडची स्थापना झालेली दिसते. पूर्वी पक्षात वेगवेगळे विचार व्यक्त होत असत. आता ते बंद झाले आहे. आता पक्षात होयबांची गर्दी वाढली आहे. ज्येष्ठ नेतेही आपल्या पक्षनिष्ठेचे प्रदर्शन करू लागले आहेत. जुन्या लोकांचा पक्षातील प्रभाव संपला आहे. संपूर्ण कॅबिनेटमध्ये राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी वगळता सगळे नवे चेहरे पाहावयास मिळतात. एके काळी पक्षात असलेल्या शिस्तीचा लोप होताना दिसत आहे. काही ठिकाणी तर नेतृत्वाला शिस्तही निर्माण करता आली नाही. त्याचे प्रत्यंतर आकाश विजयवर्गीय प्रकरणात पाहायला मिळाले. त्याच्या विरोधात पंतप्रधानांनी टीका केल्यावरही राज्यातील भाजप शाखेने त्याच्याविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पक्षातील नेत्याने आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले, तर त्याविरुद्ध ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या आकांडतांडवाकडे दुर्लक्ष करायचे असते, हाच संदेश या घटनेतून दिला गेला. पंतप्रधानांच्या वागणुकीने त्याला पुष्टीच मिळते!
टीकेसमोर झुकायचे नाही, ही प्रवृत्ती सर्वच पक्षात पाहावयास मिळते. तशीच ती भाजपमध्येही दिसू लागली आहे. उलट अशा कृत्याचे पक्षाच्या निष्ठावंतांकडून समर्थनच होत असते. दुसऱ्या पक्षाकडून कोणत्याही कृत्यावर टीका झाल्यास त्या कृत्याचे समर्थन करण्याची वृत्ती विकसित होत असल्याचे दिसून येते. मग ते कृत्य कितीही वाईट असेना का! भाजपमध्ये ज्या खासगी सेना होत्या, त्यांना मोकळीक देण्यात आली आहे, पण त्यांच्या हुल्लडबाजीला सोसल्याने मोठ्या घटकापासून पक्ष दूर जाण्याचा धोका संभवतो. भाजपने आपल्या पक्षात सर्वांना दाखल करण्यास सुरुवात केल्याने पक्षात येणाऱ्या या नवोदितांची स्पर्धा पक्षातील जुन्या नेत्यांसोबत होईल, तसेच ज्यांना किंमत चुकवून पक्षात घेण्यात आले आहे, ते सौदेबाजी करतील. त्यांच्या गरजा पक्षाला पूर्ण कराव्या लागतील. सत्तालोलुपांचे अर्थकारण हे ध्येयनिष्ठांच्या राजकारणापेक्षा वरचढ होईल. पैशासाठी पक्षात येणाऱ्यांची संख्या जशी वाढेल, तशी पक्षाशी एकरूप होण्याची प्रवृत्ती कमी होईल. आज जी ताकद वाटते, तीच उद्या पक्षाचे भविष्य कुरतडून टाकील. काँग्रेस पक्षात असंतुष्टांची संख्या वाढली. कारण अनेक लोक सत्ता आणि त्यापासून मिळणारे फायदे यासाठीच पक्षात होते.
भाजपने काँग्रेसचे रूप धारण करणे ही त्याची कमजोरी आहे की, कोणत्याही यशस्वी राजकीय पक्षाला काँग्रेसच्याच पाऊलखुणांवरून वाटचाल करणे भाग पडते? भारतीय जनता पक्ष सर्वसमावेशकता (मुस्लीम समाज वगळून) धारण करण्यास इच्छुक आहे की, त्याला विरोधकांना संपवून टाकायचे आहे? एक गोष्ट स्पष्ट आहे, ती ही की काँग्रेस पक्ष विस्कळीत होत असला, तरी काँग्रेसी संस्कृती मात्र जिवंत राहणार आहे!