राजेंद्र दर्डा,एडिटर इन चीफ, लोकमत - काळ बदलला. माणसं बदलली. आडव्या पट्ट्याचा कोट, धोतर असणारा आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ मात्र नाही बदलला. त्याच्या चष्म्याचा नंबरही नाही बदलला. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. ३१ मार्च १९९१, लोकमत टाइम्सच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कॉमन मॅन मला औरंगाबादेत भेटला. लोकमत भवनमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमात व्यंगचित्रांचे जादूगार आर. के. लक्ष्मण हे विशेष पाहुणे होते. त्यांनी व्यंगचित्रे काढावीत, अशी सर्वांची अपेक्षा होती. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला स्टँडवर लावलेला फळा आणि त्यावर लटकवलेला पांढरा कागद पाहून स्वत: आर. के. यांना कळून चुकले होते, की व्यंगचित्र काढल्याशिवाय सुटका होणार नाही आणि म्हणूनच मी सूचित करताच ‘मला त्याची कल्पना होतीच’ असे काहीसे हसत बोलून ते फळ्याकडे वळले. ते फळ्याजवळ उभे राहिले. सर्व श्रोते क्षणात प्रेक्षक बनले. नुसते प्रेक्षक नव्हे, तर उत्स्फूर्त प्रेक्षक. आर.कें.नी स्केच पेन काढला आणि फक्त एकच रेषा ओढली. काही कळलं नाही. मात्र दुसरी रेषा काढताच सर्वांनीच ओळखले, हे तर त्यावेळचे पंतप्रधान चंद्रशेखर ! पाच मिनिटांच्या आत चंद्रशेखर यांच्यासमोर राजीव गांधी, खाली व्ही. पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे चेहरे चितारून चौघांच्या मध्ये ‘कॉमन मॅन’ काढला. या चौघांच्या राजकीय तडाख्यात कॉमन मॅन अडकला, असेच सुचवायचे असावे त्यांना. आर.के. यांनी पुन्हा दुसऱ्या कागदावर त्यांचा ‘सामान्य माणूस’ चितारला. या सामान्य माणसाच्या हातात एक काडी आणि त्या काडीवर लावलेला फलक सर्वांची उत्सुकता वाढवत गेला. या फलकावर ‘लोकमत टाइम्सला शुभेच्छा’ असे लिहून स्केच पेन खाली ठेवला. आर.के. यांच्या हस्ते मला अंबाजोगाईत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या ‘कॉमन मॅन’च्या सहवासातील तो सोहळा आजही जशाच्या तसा आठवतो मला. टाईम्स आॅफ इंडियामधील त्यांची व्यंगचित्रे मी तासन्तास पाहत बसायचो. एखाद्या सामान्य माणसाला भेडसावणारे हिमालयाएवढे उत्तुंग विषय हाताळताना आर.के. लक्ष्मण यांच्या रेषेची उंची नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते ते कळतच नाही. अशा या रंगरेषेच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट आर.के. लक्ष्मण यांच्या जाण्याने हा जीवनपट एकदम पुन्हा आठवू लागला आहे.आर.के.लक्ष्मण यांच्या हस्ते आचार्य अत्रे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाईच्या ‘सावज’ प्रतिष्ठानच्या वतीने मला देण्याचा मानस जेव्हा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष भगवानराव लोमटे ऊर्फ बापू यांनी व्यक्त केला, तेव्हा आर.के. लक्ष्मण यांच्या भेटीची उत्सुकता होती. प्रतीक्षा आणि प्रतीक्षेचा दुरावा संपल्यानंतर मिळणारा आनंद शब्दापलीकडचा असतो. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आर.के. लक्ष्मण यांच्या तारखा मिळेनात म्हणून लोमटे बापू अस्वस्थ असायचे. अंबाजोगाई नगरीतील हा मनस्वी माणूस एकदा निर्णय घेतला की तो तडीपार नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा. अखेर काही महिने लोटले आणि लक्ष्मण यांची तारीख मिळाली. अंबाजोगाईचा तो प्रसंग अजूनही मला आठवतो. दिवस होता १३ फेब्रुवारी २००० चा. अंबाजोगाईच्या पब्लिक ग्राऊंडवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधीजींचे अनुयायी, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य ए.मा. कुलकर्णी हे त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अंबाजोगाई गाव लहान असले तरी विद्येचे माहेरघर आणि दगड काढला तरी अस्खलित इंग्रजीत बोलणारी माणसे असे हे मिश्रण. ए.मा. गुरुजी बोलायला उठले आणि आर.के. लक्ष्मण यांच्या रेषेला स्पर्श करत त्यांनी रेषेच्या फटकाऱ्यात आणि लेखणीच्या माध्यमाची जादु सांगताना कुंचल्याचा जादूगार आर.के.लक्ष्मण आणि लेखणीचा जादूगार आर.के. नारायणन् यांच्या प्रेमात मी कसा पडलो हे सांगत ते अचानक म्हणाले आज माझ्या सोबत फक्त कुंचला आहे. वाक्याचा तो धागा उचलतच आर.के. लक्ष्मण यांनी स्मित करत माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला आणि ते म्हणाले ‘पेन इधर है’. त्यांचा तो हजरजबाबीपणा आणि माझ्या पाठीवर प्रेमाने फिरविलेला हात, तो क्षण अजूनही मी विसरू शकत नाही. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसे किती साधी असतात याचा अनुभवही लक्ष्मण यांच्या सहज बोलण्यातून मला जाणवला.प्रत्यक्षात कोणाशीही-कधीही न बोलणारा आर.के.यांचा हा कॉमन मॅन सर्वांनाच जवळचा वाटायचा. तो प्रत्येकाच्या मनात डोकवायचा. म्हणून ‘लोकमत’च्या माध्यमातून या ‘कॉमन मॅन’ला बोलते करण्याचा प्रयत्न मी ५ फेब्रुवारी २०१२ला केला. आर.के. यांच्या याच ‘कॉमन मॅन’ने ‘लोकमत’च्या अतिथी संपादकांची जबाबदारी पेलली. या दिवशी ‘लोकमत’च्या वाचकाला प्रत्येक पानावर ‘कॉमन मॅन’ भेटला आणि अनेक बातम्यांच्या माध्यमातून बोललादेखील ! हा अंक पाहून आर. के. देखील भारावून गेले. डोळ्यांतूनच ते अनेक भावना व्यक्त करून गेले. ‘नावात काय?’ असे शेक्सपिअर जरी म्हणत असला, तरी रेषांच्या फटकाऱ्यात काय आहे? याचा अनुभव मी आणि माझ्यासारख्या असंख्य कलारसिकांनी घेतला. गगणाला गवसणी घालणारी निर्भिडता, विषयाची खोली त्या सुक्ष्म रेषा अचुकपणे मांडतात. रेषेतील बोलके चेहरे, समाजातील विदारकता टिपणारी ती रेषा आता फक्त अधोरेखित झालीय न संपणाऱ्या प्रवासाला जाणाऱ्या पांढऱ्या कॅन्व्हॉसवर.
मार्गदर्शक समीक्षक
By admin | Published: January 28, 2015 4:34 AM