जगभरात सगळीकडेच गनकल्चर खूपच वेगानं वाढतं आहे. जगातील सर्वाधिक प्रगत देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत तर ते सर्वात जास्त आहे. अमेरिकेत सर्वसामान्य माणसांच्या हातातही प्राणघातक हत्यारं सहजपणे येतात, दिसतात. अगदी शाळकरी मुलंही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे शाळेतल्या मुलांनी बंदूक, पिस्तूल घेऊन आपल्याच शाळेतल्या मुलांना, शिक्षकांना गोळ्या घातल्याची उदाहरणं आपण नेहमीच पाहत, ऐकत असतो. त्यात अलीकडच्या काळात आणखीच वाढ झाली आहे. कारण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अतिशय ढिला, मवाळ असलेला अमेरिकेचा कायदा!
पण हे फक्त अमेरिकेतच आहे का? - तर नाही. सध्या जगभरातच गनकल्चर खूप वेगानं फोफावलं आहे. थायलंडचंच उदाहरण घ्या. परवाच थायलंडची राजधानी बँकॉक इथे १४ वर्षांच्या एका शाळकरी मुलानं मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. त्यात दोन जण ठार तर काही जण जखमी झाले. मुळात ही अशी प्राणघातक हत्यारं मुलांच्या हातात येतातच कशी? कायदा पातळ असणं हे तर त्याचं एक कारण आहेच, पण सध्या ‘ऑनलाइन’चं जे खूळ जगभरात प्रत्येकाच्या मनात घुसलं आहे, त्याचाही तो परिपाक आहे. अगदी नेलपेंटपासून तर शूज, कपडे आणि महागड्या वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाइन मागवल्या जातात. त्यात आता हत्यारांचीही भर पडली आहे.
बँकॉकच्या पोलिसांनी शोध घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, या शाळकरी मुलाच्या हाती जी बंदूक आली ती ऑनलाइन मागवण्यात आलेली होती! ऑनलाइन ‘काहीही’ मागवता येत असलं तरी त्यालाही काही नियम आहेत. अशी प्राणघातक हत्यारं ऑनलाइनही मागवता येत नाहीत. पण मग या मुलाच्या हाती ही बंदूक आली कशी? - तर या मुलानं ऑनलाइन मागवलेली बंदूक म्हटलं तर ‘खेळण्या’तली बंदूक होती! कारण या बंदुकीत गोळ्या टाकून चालवण्यासाठी ती नव्हती, तर ती फक्त रिकामी चालवण्यासाठीच होती. त्यात खऱ्या गोळ्या टाकून ती चालवली असती, तरीही ती चालली नसतीच. त्यामुळे अर्थातच ती ‘प्राणघातक हत्यारं’ या वर्गात मोडणारी नव्हतीच. पण इथेच खरी मेख आहे. या शाळकरी मुलानं जी बंदूक ऑनलाइन खरेदी केली, त्यात थोडेफार मॉडिफिकेशन्स करून खऱ्या बंदुकीसारखी ती चालवता येणार होती. या ‘खोट्या’ बंदुकीचं रूपांतर ‘खऱ्या’ बंदुकीत कसं करायचं, याचे धडेही ऑनलाइनच मिळतात. या मुलानं हेच ऑनलाइन धडे गिरवले आणि खेळण्यातल्या बंदुकीचं रूपांतर खऱ्या बंदुकीत झालं!
थायलंडचे नव्यानंच नियुक्त झालेले पोलिस प्रमुख तोरसॅक सुक्वीमोल यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला. पण वाइटात चांगलं शोधायचं झाल्यास याच कारणामुळं आता थायलंडनं शस्त्रास्त्रांच्या ऑनलाइन खरेदी- विक्रीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन गन-कंट्रोलचा निर्णय आम्ही कठोरपणे अमलात आणू असं पोलिस प्रमुख तोरसॅक यांचं म्हणणं आहे. या बंदुकांमध्ये थोडासा बदल केल्यास ती लगेच प्राणघातक होतात, त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग गुन्हेगारांना आणि विक्रेत्यांना करता येणार नाही, यादृष्टीनं या हत्यारांच्या ऑनलाइन विक्रीवर आता कठोर प्रतिबंध लादण्यात येणार आहेत.
पोलिस प्रमुख तोरसॅक यांचं म्हणणं आहे, ऑनलाइन ‘आयात’ करण्यात आलेल्या या हत्यारांची बँकॉकमधील संख्या जवळपास दहा हजारांच्या वर आहे. अर्थात, हे केवळ हिमनगाचं टोक आहे, असा आम्हाला संशय आहे. प्रत्यक्षात त्यांची संख्या कितीतरी पटींनी जास्त असू शकेल.
ज्या वेबसाइटवरून अशी हत्यारं मागवता येतात, त्या वेबसाइटही आता ब्लॉक करण्यात येणार आहेत. बँकॉकमधील गुन्हेगार विशेषज्ञ क्रिसनफोंग पुथाकूल यांचं म्हणणं आहे, ऑनलाइन गन्स मॉडिफाय करण्यावर खरं तर बंदी आहे, पण त्याच्या ‘ऑनलाइन शाळा’ अगदी सर्रास चालतात.बेकायदा हत्यारं बाळगणाऱ्यांना थायलंडमध्ये दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आणि वीस हजार थाई बाहत इतका दंड होऊ शकतो, पण तज्ज्ञांच्या मते ही शिक्षा फारच किरकोळ आहे. त्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे. या हत्यारांमुळे ज्या प्रमाणात नुकसान होतं, त्याच प्रमाणात कायद्याचा धाकही असला पाहिजे..
पोलिस, सैनिकांनीच घेतले सामान्यांचे बळी!
थायलंडमध्ये असाही हिंसाचार नवीन नाही. गेल्या वर्षी तर एका माजी पोलिस अधिकाऱ्यानंच नर्सरीत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल ३५ लोक ठार झाले होते. त्यात २२ मुलांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्येही एका सैनिकानं केलेल्या गोळीबारात जवळपास २९ जण ठार झाले होते! ज्यांच्यावर लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी तेच इतके बेपर्वा वागत असल्यामुळे थायलंडचं सरकार सध्या फारच चिंतेत आहे.