-बाळासाहेब बोचरेअंतकाळी ज्याच्या,नाम आले मुखा !तुका म्हणे सुखा पार नाही. !!गुरू तुकाराम काळे बुवा यांचे माघी एकादशीला वैकुंठगमन झाले. त्यासाठी त्यांनी हयातभर केलेली तपश्चर्या अन् त्याग वारकरी संप्रदायामध्ये निश्चितच आदरास्थानी होता. असं मरण म्हणजे वारकरी फार भाग्याचे समजतात. त्यासाठी मोठी तपश्चर्याही करावी लागते. अन् आचरणही निष्पाप असावं लागतं. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे जन्मलेले तुकाराम बुवा हे आजरेकर फडाचे गुरू होते. या फडाचे प्रमुख आणि संस्थापक बाबासाहेब आजरेकर हे माऊलींचा सोहळा सुरू झाला तेव्हाच्या प्रमुखांपैकी एक होते. आजरेकर फडांची दिंडी ही माऊलींच्या सोहळ्यात रथामागे सातव्या क्रमांकावर चालते. वर्षभर कीर्तन व हरिनाम सप्ताह अन् वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यामध्ये आघाडीवर असलेला हा फड केवळ गुरू परंपरेवर चालतो. श्रद्धा, सेवा, निष्ठा, परंपरा अािण गुरू आज्ञेचे पालन ही या फडाची वैशिष्ट्ये आहेत. फडाच्या गुरूची निवड ही लोकशाही पद्धतीने केली जाते. ३१ वर्षांपूर्वी गुरू या मानाच्या स्थानी तुकाराम बुवा यांची लोकशाही पद्धतीने निवड झाली होती. आजरेकर फड हा देशमुख घराण्यातील असला तरी या फडाचे आजवरचे गुरू हे विविध जातीचे होते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात दररोज सायंकाळी या फडाकडून माऊलींसाठी दूध आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दिला जातो. या फडावरील वारकरी कधीच कांदा, लसूण खात नाहीत. जेवणानंतर पान मात्र आवर्जून खातात. परंपरा सांभाळणे आणि नियमावर लक्ष ठेवणे हे गुरूंचे काम. आजरेकर फडामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली परिसरासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविक असतात. या फडाला माऊलींच्या सोहळ्यात जागर व कीर्तनाचा मान आहे. हा फड केवळ माऊलींच्या अभंगावरच कीर्तन करतो. वर्षभर तीन राज्यांतील हरिनाम सप्ताहाचे दौरे करणे, फड सांभाळणे, परंपरा जपणे आणि सर्वांना समजून घेणे हे मोठे आव्हान असते. पण गुरू तुकाराम बुवांनी ते आपल्या आचरणातून ३१ वर्षे लीलया सांभाळले. शुद्ध आचरणाचे वारकरी तयार करणे हेच काम काळेबुवांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशताब्दी महोत्सवात या फडाने वर्षभर माऊलींसमोर अखंड हरिनाम जप केला. त्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची त्रिशतकोत्तर शताब्दी आणि त्यानंतर संत नामदेव महाराजांची सप्तशताब्दी यानिमित्ताने सलग तीन वर्षे या फडाचा हरिनाम सप्ताह आळंदीमध्ये चालला. एकाच फडाने केलेली ही सेवा हा या फडाचा लौकिक वाढवणारीच आहे. आजच्या पिढीला संप्रदायाची गोडी लावणे आणि ती जपणे, अखंडित ठेवणे हे मोठे आव्हान असताना तुकाराम बुवांनी ते आव्हान पेलले. एकदा बायपास सर्जरी झाली तरी त्याचा त्यांनी आपल्या धावपळीवर कधीच परिणाम दिसू दिला नाही. धावत्या युगाला तुकाराम बुवांची महती कळण्यापलीकडची असली तरी संप्रदायामध्ये त्यांचे गुरू हे स्थान त्यांनी आदरस्थानी ठेवले. माघी एकादशीला कीर्तन सेवा संपवून महाराज बसले अन् पांडुरंगाचं बोलावणं आलं असंच झालं. आणि हा परमात्मा वैकुंठवासी झाला.
गुरू तुमच्या दैवाला पार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:31 AM