- के. नटवर सिंह( माजी परराष्ट्र मंत्री)
या वर्षीच्या प्रारंभी एम. जे. अकबर आणि मी आम्ही दोघांनी महात्मा गांधींवर पुस्तक लिहायचे ठरवले. गांधीवर हजारो पुस्तके आधीच असताना त्यात आणखी एकाची भर कशाला? परंतु गांधीवाद्यांचे अजून समाधान झालेले नाही, हेच खरे. आमचे पुस्तक १८ ते २५ वयोगटातील वाचकांसाठी आहे. त्यांना गांधीजी माहिती आहेत, त्यांच्या वरवर विचित्र वाटतील अशा कृती, उपवास, चरखा चालवण्याचा अट्टाहास या गोष्टी त्यांना ठाऊक आहेत; परंतु एक संत राजकारणी म्हणून त्यांच्यातले गुण ठाऊक नाहीत. 'सत्याचे प्रयोग' हे गांधींचे आत्मकथन दहा हजारात तरी एखाद्याने वाचले असेल की नाही याबद्दल शंका आहे. गांधी हे राजकारण्यांमधले संत होते की संतांमधील राजकारणी? या प्रश्नाचा वेध आम्हाला घ्यावयाचा होता. उत्तर सोपे नव्हते. जॉर्ज ऑरवेल, ई एम फॉस्टर, नेहरू आणि खुद्द आइन्स्टाइनलासुद्धा हे कोडे सोडवता आले नव्हते.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच गांधी या व्यक्तिमत्त्वाने मला पछाडले. भरतपूर हे माझे गाव. तिथल्या रेल्वे स्थानकावर जून १९४५ मध्ये मी गांधीजींना प्रथम पाहिले. शिमल्याला जाणाऱ्या फ्रंटियर मेलमध्ये तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून ते प्रवास करत होते. भरतपूरला गाडी ५ मिनिटे थांबली. गांधी टोपी घातलेल्या कार्यकत्यांनी डब्याकडे धाव घेतली. त्यादिवशी गांधीचे मौन होते. गर्दीला त्यामुळे आपोआपच आवर घातला गेला. त्यांची स्वाक्षरी घेण्याचा माझा प्रयत्न मात्र अपयशी झाला.- तर, आमचे पुस्तका या लेखनादरम्यान मला जाणवले, की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि गांधी यांच्यामध्ये झालेला पत्रसंवाद अतिशय महत्वाचा आहे. अहिंसा, असहकार चळवळ या दरम्यान ही पत्रे लिहिली गेली. ईश्वरी इच्छा असते. मॉडर्न रिव्यूच्या सप्टेंबर १९२४च्या अंकात टागोरांनी एक दीर्घ निबंध लिहिला आहे. गांधीजींबद्दल गुरुदेव लिहितात, गांधीचे विचार किंवा आचरण याबाबतीत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची मतभिन्नता व्यक्त करणे मला सद्भिरुचीला सोडून वाटते. खरे तर त्यात काही चूक आहे अशातला भाग नाही; पण माझे मन त्याला धजावत नाही. ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये इतका आदर, भक्तिभाव आहे, त्याच्या हातात हात घालून काम करायला मिळण्यात केवढा मोठा आनंद सामावलेला महान नैतिक व्यक्तिमत्वापेक्षा मला दुसरे काहीही आकर्षून घेत नाही. मात्र महात्माजींचे कार्यक्षेत्र मला माझे म्हणून स्वीकारता आले नाही. ही सल मात्र कायम माझ्या मनात राहील; पण शेवटी माणसाने कुठल्या क्षेत्रात काम करायचे यामागे ईश्वरी इच्छा असते. त्यानुसार मानसिकतेतही फरक पडतो. अनेकदा त्यांच्याबद्दल आदराच्या व्यक्तिगत भावनेमुळे आपण चरखापंथीय व्हावे असे वाटे, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते राहून गेले. चरख्याला मिळाले त्यापेक्षा उच्च स्थान प्राप्त करून देण्यासाठी मी सहभाग घ्यायला हवा होता. मी स्वीकारलेल्या बहुआयामी पुनर्रचनेच्या कार्यातील इतर महत्त्वाच्या घटकांपासून थोडे बाजूला जाऊन हे करता आले असते. पण ते झाले नाही खरे. मला खात्री आहे. महात्माजी मला समजून घेतील.
- गुरुदेव टागोर आणि गांधीजी एका दशकात जन्माला आले, टागोर १८६१ मध्ये आणि गांधी १८६९ मध्ये. दोघांचाही मृत्यू एकाच दशकात झाला टागोर १९४१ साली गेले; आणि गांधीजीची ३० जानेवारी १९४८ ला हत्या झाली.
- पुस्तकाच्या निमित्ताने हे सांगावेसे वाटले, एवढेच!