सध्या आंब्याच्या सीझन चालू आहे. सुरुवातीला भाव खाऊन जाणारे आंबे नंतर एक, दोन पाऊस आल्यावर उतरतात. सध्या सर्व जातीच्या, एवढेच काय आंब्यांचा राजा असलेल्या कोकणच्या हापूसचेही भावही बऱ्यापैकी खाली आले. अशातच एका जातीच्या आंब्याचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही न आढळणारी ही आंब्याची जात आहे, ‘गुरुजी’ संभाजी भिडे यांच्या शेतातली. सध्या गुरुजींच्या या आंब्याचीच अख्ख्या देशात चर्चा आहे.परवाच माझा एक शेजारी घरी आला. लग्न होऊन दहा वर्षे झालीत पण बिचाºयाच्या घरात पाळणा हलला नाही. सर्व उपाय करून झाले पण उपयोग झाला नाही.जरा संकोचूनच तो म्हणाला... दादा... संभाजी भिडेंचा पत्ता माहीत आहे का ?मला भिडेंचा ‘आंबा महिमा’ वृत्तपत्रात वाचून माहीत होता आणि या शेजाºयाचीही अवस्था ठाऊक होती. त्यामुळे मी सरळच त्याला म्हटले... कशाला या भानगडीत पडतो. पुत्रप्राप्ती करून देणारे आंबे कधी असतात का?शेजारी : नाही...म्हणजे आमची ‘ही’ (म्हणजे त्याची बायको, अर्थात आमची वहिनी) म्हणते, आणखी एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.(तेवढ्यात त्याची ‘ही’ सुद्धा आली.)वहिनी : भावोजी...एकदा तुम्ही पत्ता द्याच. जाऊन येते कशी.ते गुरुजी फार मोेठे आहेत. एमएससीत म्हणे सुवर्णपदक घेतले. मोठ्या कॉलेजात प्राध्यापक होते. शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणखी काय, काय आहेत म्हणे...! शिवाय आपले पीएम, सीएम साहेबही त्यांना गुरुस्थानी मानतात. ते खोटे थोडेच बोलणार! १८० जणींनी त्यांच्या शेतातले आंबे खाल्ले, त्यातल्या १५० जणींना मुलगा झाला म्हणे.(म्हणजे... या ‘ही’ने गुरुजीचा फक्त पत्ता सोडून बाकी संपूर्ण विकीपीडिया आधीच काढून ठेवला होता आणि हो... पत्ता सापडणारही कसा...? पोलीस, सीआयडीलाही तो गवसत नाही.)मी : अहो...वहिनी, आंबा खाल्ल्याने मुलगा होत असेल तर संपूर्ण वैद्यक शास्त्रच बदलून जाईल ना!वहिनी : तुम्हाला नाही कळायचे भावोजी. आम्ही देवींचे व्रत ठेवतो त्यात सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी आंब्याचा महिमा सांगितला आहे. पुराण काळात देवी प्रसन्न होऊन स्वत: वत्सांना आंबा देत असे. ऋषी, मुनी सुद्धा हीच थेरपी वापरत असत.मी : वहिनी... त्या काळात आंबा खाऊन मूल होत होते तर सीतामार्इंना टेस्ट ट्युबमधून जन्म का घ्यावा लागला?शेजारी (मधेच) : जाऊ द्या ना दादा...ती संघ, भाजपाच्या नेत्यांची बेताल, बिनबुडाची वक्तव्ये होती.मी : पण तुमचे हे भिडे गुरुजीसुद्धा संघाचे प्रचारक होते ना!पण हे दाम्पत्य ऐकायला तयार नव्हते. शेवटी त्यांना पत्ता द्यायला मी तयार झालो. ही ‘आंबा थिअरी’ थोतांड आहे हे मला माहीत होते. पण कर्म, धर्म संयोगाने मूल झालेच तर त्यात माझाही वाटा आहे, हे हा शेजारी साºया जगाला सांगण्याची भीतीही होती. ही रिस्क घेऊन मी त्यांना सांगितले...हे गुरुजी तसे साताºयाकडचे आहेत, पण त्यांची शेती नक्की कुठे हे माहीत नाही. सातबारा पाहून सांगतो. एवढे बोलून त्यांना निरोप दिला.ते जात नाही तोच व्हॅट्सअॅपवर बातमी आली...भिडे गुरुजीकडे शेतीच नाही...!काय फेकू माणूस आहे ना! शोभतो खरा पीएम साहेबांचा गुरू...!
(dilip.tikhile@lokmat.com)