Delhi Election: बंदे में हैं दम...देशाचा ‘मूड’ बदललेला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 05:42 AM2020-02-12T05:42:28+5:302020-02-12T08:15:58+5:30

केवळ सामाजिक पार्श्वभूमी असलेली व्यक्ती दिल्लीची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते याचाच अर्थ राजकीय दडपणात मतदार येत नाहीत. विजय मिळताच अरविंद केजरीवालांनी ‘राष्ट्र निर्माण के लिए आप से जुडे’ असे दिल्लीकरांना आवाहन केले. याचाच अर्थ पुढच्या पाच वर्षांत त्यांची ही नीती मोदींच्या ‘राष्ट्रवादा’पुढे दंड थोपटणार आहे.

The guy has guts... | Delhi Election: बंदे में हैं दम...देशाचा ‘मूड’ बदललेला

Delhi Election: बंदे में हैं दम...देशाचा ‘मूड’ बदललेला

Next

अरविंद केजरीवाल हे दिल्लीत सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या केजरीवालांनी ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान दिल्लीतील सुजाण जनतेने त्यांना भरघोस मते देऊन केला आहे. आजच्या निकालाने देशाचा ‘मूड’ बदललेला दिसतो.

जनतेला धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे विषय नकोत, तर सलोखा हवा आहे. पायाभूत सुविधांच्या तुलनेत ३७०, सीएए, एनआरसी हे मुद्दे मतदारांसाठी दुय्यम ठरतात, हेही आजच्या निकालाने सिद्ध झाले आहे. केजरीवालांना आव्हान देण्यासाठी अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ, सव्वादोनशे खासदार, विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री, नेते मैदानात उतरले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेत गल्लीबोळात मंत्री-खासदारांना पाठविले. पत्रके वाटली. कलम ३७०, बाटला हाऊस चकमक, सीएए, एनआरसी, शाहीनबाग, जामिया मिलिया विद्यापीठ ते पाकिस्तान हे विषय भाजप नेत्यांच्या भाषणात होते. काही नेते केजरीवालांना आतंकवादी ठरवून मोकळे झाले. चवताळलेल्या एका मंत्र्याने ‘गोली मारो...’ अशी वक्तव्ये केली. भाजप नेत्यांच्या प्रचारात कोणतेही स्थानिक मुद्दे नव्हते आणि कॉँग्रेसने सुरुवातीपासूनच तलवार ‘म्यान’ केली होती. धुव्रीकरणातून मतविभाजनाचा फटका केजरीवालांना बसू शकतो, हे गृहीत धरूनच भाजपने रणनीती आखली. मोदी-शहा यांची भाषणे केवळ राष्टÑवादापुढेच पिंगा घालणारी होती. ज्यांना स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्टÑवाद महत्त्वाचा वाटत होता असा थोडाफार मतदार भाजपकडे वळला. परंतु निकालाअंती केवळ तीन-चार जागा वाढण्यापलीकडे भाजपच्या हाती विशेष काही लागले नाही.

केजरीवालांकडे केवळ विकासाचा मुद्दा होता. त्यांनी राबविलेल्या योजनांवर दिल्लीकर फिदा होते. हीच नाळ पकडत त्यांनी मी तुम्हाला मोफत पाणी दिले, २०० युनिट मोफत वीज दिली, महिलांना दिल्ली परिवहनच्या बसमध्ये मोफत प्रवास, सरकारी शाळा सर्वोत्तम केल्या, मोहल्ला क्लिनिक, शहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मदत केली तरीही, तुमचा मुलगा आतंकवादी ठरतो का? ही केजरीवालांची भावनिक साद शेवटच्या आठवड्यात आम आदमी पार्टीचा घसरता आलेख सावरण्यास खूपच फलदायी ठरली. त्यांच्या भाषणात विष नव्हते आणि कोणत्याही धर्माबाबत द्वेषभावना नव्हती. उलट त्यांनी ‘हनुमान चालिसा’ वाचून हनुमानापुढे नतमस्तक होत स्वत:ला शाहीनबागपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. २०१५ मध्ये सत्तेत आल्यावर भाजपचे केवळ तीन आमदार होेते. केजरीवालांची सुरुवातीची दोन वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपालांवर आरोप करण्यात गेले. केंद्र सरकार काम करू देत नसल्याचे युद्ध न्यायालयापर्यंत पोहोचले. सर्वोच्च न्यायालयास मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांची कार्यकक्षा आखून द्यावी लागली. त्यानंतरच केजरीवालांना विविध योजना मुक्तपणे राबविता आल्यात. गेल्या तीन वर्षांत केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि त्यांच्या टीमने दिवस-रात्र खूप कामे केलीत.

केवळ सामाजिक पार्श्वभूमी असलेली व्यक्ती दिल्लीची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते याचाच अर्थ राजकीय दडपणात मतदार येत नाहीत. मोठमोठाली मंदिरे, मशिदी उभारून रोजगाराचे प्रश्न मिटतील? महागाई कमी होईल? अन्न-वस्त्र-निवाºयाचा प्रश्न मिटेल? याबाबत मतदार जागरूक झाला आहे. जो धर्माचे विष ओकण्याचे थांबवेल तोच राजकारणात टिकेल. कॉँग्रेसला आणि भाजपला जे जमले नाही ते केजरीवालांनी करून दाखवले. पण या उत्सवी वातावरणात केजरीवालांना नव्या जबाबदारीची जाणीव कायम राहावी. वीज, पाणी, प्रदूषण, परिवहन, शिक्षण, आरोग्य व सुरक्षेसाठी आप सरकार देशभरासाठी नवा प्रवाह निर्माण करू शकते. ही पाच वर्षे त्यासाठीच दिल्लीकरांनी दिली. याचे भान नेहमी जागृत राहावे. कारण नवा सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रवाह दिल्लीतूनच निर्माण होण्याची सद्यस्थितीत नितांत गरज आहे.
 

Web Title: The guy has guts...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.