तिबेट या आपल्या मातृभूमीतून परागंदा होऊन गेली ५८ वर्षे भारतात राजाश्रय घेऊन राहिलेले तिबेटचे ८१ वर्षांचे धर्मगुरु दलाई लामा रविवारी ‘नमामि ब्रह्मपुत्रा’ महोत्सवासाठी गुवाहाटीला गेले आणि त्यांचे हळवे मन उचंबळून आले. तिबेटमधील मानसरोवरात (तिबेटी भाषेत त्सांगपो) उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीशी असलेले दलाई लामांचे अतूट असे भावनिक नाते त्यांच्या भाषणातून प्रकट झाले. तिबेटला कायमचा रामराम ठोकून दलाई लामा १७ मे १९५९ रोजी ल्हासामधील उन्हाळी राजप्रासादातून बाहेर पडले होते व भारताच्या सीमेवर येण्यापूर्वी त्यांनी हीच ब्रह्मपुत्रा नदी ओलांडली होती. तेव्हापासून या नदीशी जुळलेले माझे नाते आजही कायम आहे व जेव्हा जेव्हा मी ब्रह्मपुत्रेच्या सान्निध्यात येतो तेव्हा मला तिच्या पावित्र्याची अनुभूती येते, असे दलाई लामा म्हणाले. मी भारत सरकारचा सर्वाधिक काळ वास्तव्यास राहिलेला पाहुणा आहे व भारतीय संस्कृतीचा दूत बनून मी आता या उपकाराची परतफेड करीत आहे, असेही शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या या तत्त्ववेत्याने आवर्जून सांगितले. विनयशीलता आणि शालिनता याचे मूर्तिमंत प्रतीक असलेले दलाई लामा यांनी हेही कबूल केले की, मी तिबेटमध्ये होतो तोपर्यंत मला बौद्ध धर्म हाच सर्वोत्तम धर्म असल्याचे वाटायचे. पण भारतात आलो, भिन्न धर्मीयांच्या संपर्कात आलो आणि प्रेम व करुणा हीच सर्व धर्मांची शिकवण असल्याचे मला पटले. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाने माझे जीवन समृद्ध झाले, असेही त्यांनी नमूद केले. धर्म ही पूर्णपणे व्यक्तिगत बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतरांच्या धर्माचाही बौद्धिक भूक भागविण्यासाठी अभ्यास करावा, असे सांगून त्यांनी सक्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतरास विरोध केला. या कार्यक्रमानंतर त्यांनी भारतीय लष्कराच्या आसाम रायफल्समधून निवृत्त झालेले हवालदार नरेन चंद्र दास यांची आवर्जून घेतलेली भेटदेखील त्यांच्या सहृदयतेची प्रचिती देणारी होती. ५८ वर्षांपूर्वी दलाई लामा आणि त्यांचे २० अंगरक्षक तिबेटची सरहद्द (मॅक्मोहन लाइन) ओलांडून भारतात आले तेव्हा तेथे स्वागत करून त्यांना सुखरूपपणे पुढे आणण्यासाठी त्यावेळी आसाम रायफल्सचे सात जवान खास तैनात केले गेले होत. त्यांच्यापैकी नरेन चंद्र दास हे एकटेच आज हयात आहेत. आज ८० वर्षांच्या असलेल्या या जवानाची दलाई लामा यांनी आवर्जून भेट घेतली व त्यास प्रेमभराने आलिंगन देऊन त्याच्या ऋणाची पोचपावती दिली. दलाई लामा व नरेन चंद्र दास यांची सीमेवर ती पहिली भेट झाली तेव्हा दलाई लामा २३ वर्षांचे, तर दास २२ वर्षांचे होते. दलाई लामा आणि त्यांचे अंगरक्षक घोड्यांवर होते व दास आणि इतर सैनिक त्यांच्यामागे धावत होते. त्या हृद्य आठवणी दोघांनीही मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या होत्या.
हळवे दलाई लामा
By admin | Published: April 04, 2017 12:00 AM