दिल्लीतील माकडंही लय भारी आहेत राजेहो. राजधानीतील व्हीव्हीआयपी झोनमध्ये त्यांचा मुक्त संचार असतो. एरवी आपल्याला या भागात जायचे असल्यास किमान चार ठिकाणी तरी सिक्युरिटी चेक होते. राष्ट्रपती भवनात जातो म्हटलं तर विचारूच नका... पण ही भटकी माकडं थेट कुठंही जाऊ शकतात. काल परवाच खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीच राज्यसभेत तक्रार केली की, ही माकडं थेट माझ्या शासकीय निवासात शिरू न सामानाची पळवापळवी करतात. आता बोला...मग कुणी बोलण्याआधीच आम्ही या माकडांच्या अशा या उच्छादामागील सायकॉलॉजीचा अभ्यास केला तेव्हा असे कळले की, सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या निमित्ताने या माकडांना आपल्या काही मागण्या सभागृहात मांडून त्या मंजूर करून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम तर त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांच्या निषेधाचाच ठराव मांडला. या मंत्री महोदयांनी म्हणे, थेट डार्विनच्या सिद्धांतालाच छेद दिला. माणूस हा माकडाच्या उत्क्रांतीतून जन्माला आला हा सिद्धांतच त्यांना मान्य नाही. ‘इतरांचे मला माहीत नाही पण माझे पूर्वज हे माकड नव्हतेच’ असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांचे हे वक्तव्य ‘ही सर्व मानव जात आमची वंशज आहे’ असे मोठ्या गुर्मीत सांगणाऱ्या या माकडांच्या जिव्हारी लागले. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून त्यांनी दिल्लीच्या व्हीव्हीआयपी भागात गोंधळ घातला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीचा ‘महाराष्ट्र’ करू असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.आता त्यांच्या मागण्या कोणत्या त्या बघू...१) सत्यपालसिंह काहीही म्हणोत पण, आम्हीच माणसाचे पूर्वज आहोत, हे सत्य आहे. आमचाच जातभाई‘अेप’ यापासूनच माणसाची उत्पत्ती झाली. त्यांचे ९९% जीन्स आपसात शेअर होतात, याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. शिवाय माकडचेष्टा, खुटीउपाडपणा, माकडाच्या हाती कोलीत अशी आमची सर्व गुणवैशिष्ट्ये(तुम्ही वाटल्यास त्याला अवगुण म्हणा) माणसाने जशीच्या तशी अंगिकारली. ‘हाथ कंगन को आरसी क्या’. तुमच्या या सभागृहातच किंबहुना या देशातील बहुतांश विधानमंडळात या गुणांची उधळण होत असते, हे काय आम्हाला माहीत नाही. तेव्हा आम्हाला माणसाचे पूर्वज म्हणून जाहीर करण्यात यावे.२) आम्हाला नेहमी भटके माकडं म्हणून हिणवण्यात येते. तेव्हा या भटके पुढे विमुक्त शब्द लावून भटके व विमुक्तांना मिळणाऱ्या सोईसवलती आम्हाला द्याव्यात.३) राजधानी दिल्लीत आम्हाला पकडण्यासाठी सापळे लावण्यात येत आहेत. बाहेरून पथकं बोलाविण्यात आली. प्रत्येक माकडामागे २४०० रूपये असा रेट आहे. यात किती घोटाळा होतो हे काय आम्हाला ठाऊक नाही? ५०० कोटीचे विमान १६०० कोटीत घेण्यासारखाच हा प्रकार आहे. तेव्हा हा खुटीउपाडपणा ताबडतोब थांबविण्यात यावा आणि आम्हाला राहण्यासाठी सन्मानजनक जागा देऊ न खानपानाची व्यवस्था करावी. मनेका गांधी आमच्या समर्थक आहेत, त्यांना यासंदर्भात एक निवेदन आधीच देण्यात आले. ‘माकडाच्या हाती कोलीत’ दिलेतर काय होते हे आपल्याला चांगले ठाऊक आहे. तेव्हा आमच्या उच्छादाला देशव्यापी स्वरूप येण्याआधीच उपाय योजावेत ही विनंती.- दिलीप तिखिले
माकडाच्या हाती कोलीत दिले तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 8:22 AM