-मिलिंद कुलकर्णी
आत्महत्या. रोज होतायत. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, महिला...असे समाजातील सगळ्या घटकांमधील व्यक्ती आत्महत्या करताना दिसतात. वय, शिक्षण, आर्थिक गट असा भेदाभेद पण याठिकाणी नाही. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असतात. पुन्हा जी समोर येतात आणि पडद्याआड राहतात ती, अशी कारणे वेगवेगळी असतात. का होतंय असं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. उत्तर सापडत नाहीये. तंत्रज्ञानाने जग जवळ आलेय, पण संवाद हरवतोय...हे सगळे सांगत असतात, त्यात तथ्य वाटू लागतेय. अडचणी, समस्या प्रत्येकाला असतात, पण कडेलोट होईल एवढी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आधाराला मित्र, जोडीदार, नातलग असायला हवा. ही उणीव प्रामुख्याने दिसून येते.दहावी, बारावी परीक्षांचा मोसम आला की, आत्महत्यांचे प्रमाण वाढते. पेपर चांगला गेला नाही, चांगले मार्क मिळणार नाही, चांगल्या कोर्सला प्रवेश मिळणार नाही, ही कारणे त्यामागे असतात. कुटुंबियांच्या पाल्यांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा, मार्कांची जीवघेणी स्पर्धा, क्लास, कॉलेज, अभ्यास या धकाधकीतून थकलेले विद्यार्थी असे चित्र सभोवताली दिसते. परीक्षा कालावधीत शिक्षण विभागातर्फे जिल्हापातळीवर समुपदेशकदेखील नियुक्त केले जातात. पण त्याचा कितपत लाभ होतो, हे कळायला मार्ग नाही. मुळात घरातच संवाद वाढला, पाल्यांचा कल ओळखून अभ्यासक्रमाची निवड, अपयशाच्या काळात मानसिक आधार दिला गेला तर मुले या मार्गाला वळणार नाही. बेगडया प्रतिष्ठेपायी आपण मुलांना वेठीला धरु लागलो आहोत, त्याचे परिणाम मग आयुष्यभर त्या कुटुंबाला भोगावे लागतात.
शेतकरी आत्महत्येविषयी मंथन सुरु आहे. स्वामीनाथन आयोग, कर्जमाफी, वीजबिल माफी, कृषिमूल्य आयोगाकडून योग्य दराची हमी असे पर्याय सुचविले जात आहे. आंदोलने होत आहे. परंतु ठोस उपाययोजना होत नसल्याने आत्महत्या सुरुच आहे. शेतकऱ्याचा माल बाजारात पोहोचला की, दर कोसळतात, लागवडीचा खर्च निघत नाही. स्वत: उत्पादित केलेल्या मालाची किंमत ठरवू न शकण्याचे कृषि क्षेत्र हे एकमेव क्षेत्र म्हणावे लागेल. शेतीचं गणित बिघडले आहे, त्याचे परिणाम बळीराजाच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहे. ६० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत असताना सरकार, समाज यांच्याकडून गांभीर्याने विचार होत नाही, हे चिंताजनक आहे. जागतिक व भारतीय बाजारपेठेतील घडामोडी, शासनाच्या आर्थिक निर्णयात होणारे बदल, मंदीचे सावट याचा परिणाम व्यापार व उद्योग क्षेत्रावर झाला आहे. परिणामी अभूतपूर्व मंदीच्या चक्रव्युहात व्यापार, व्यवसाय सापडला आहे. याचा फटका छोट्या व्यापारी आणि उद्योजकांना बसला आहे. या क्षेत्रातदेखील आत्महत्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे.
कुटुंबांपासून दुरावलेली माणसे हा आणखी एक चिंतेचा विषय आहे. अहंकार, विक्षिप्तपणा, हेकेखोर वृत्तीमुळे दुरावा निर्माण होतो. सामंजस्य, मनाचा मोठेपणा, क्षमाशील वृत्ती ही गुणवैशिष्टे आपल्यासाठी नाहीच, असा समज करुन माणसे स्वकीयांना दूर लोटतात. माणसांच्या गर्दीतही एकटे उरतात. मध्यंतरी जळगावला घडलेल्या घटनेने समाज सुन्न झाला. निवृत्तीनंतर पत्नीपासून विभक्त राहणारी व्यक्ती निवृत्तीवेतन घेण्यासाठी जळगावात आली. एका लॉजवर मुक्काम केला. तेथेच रात्री हृदयविकाराने निधन झाले. गावात पत्नी असून तिला दुस-यादिवशी ही दु:खद वार्ता कळाली. संवाद किती महत्त्वाचा हे वेगवान संवादमाध्यमांच्या काळात आवर्जून जाणवू लागले आहे.