हरयाणात ‘पोल पंडितां’चे सपशेल पानिपत!

By रवी टाले | Published: October 10, 2024 08:30 AM2024-10-10T08:30:39+5:302024-10-10T08:32:14+5:30

जसजसा दिवस चढत गेला, तसतसे काॅंग्रेस नेत्यांसोबतच पोल पंडितांचे चेहरेही कोमेजत गेले अन् कमळासोबत भाजप नेत्यांचे चेहरे मात्र फुलत गेले !

haryana assembly election 2024 result and exit polls became unsuccessful | हरयाणात ‘पोल पंडितां’चे सपशेल पानिपत!

हरयाणात ‘पोल पंडितां’चे सपशेल पानिपत!

रवी टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

हरयाणा विधानसभा निवडणूक निकालाचा जेवढा धक्का काॅंग्रेस पक्षाला बसला नसेल, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक, निवडणूक निकालांचे भविष्य वर्तविणाऱ्या पोल पंडितांना बसला आहे. तशी ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलची पोलखोल यापूर्वीही अनेकदा झाली आहे. हल्ली तर ओपिनियन पोल कोणीही गांभीर्याने घेत नाही. एक्झिट पोलवर थोडा फार तरी विश्वास ठेवला जातो. त्यामागील कारण म्हणजे जेवढ्या संस्था एक्झिट पोल करतात, त्यापैकी निदान एखाद्या संस्थेच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष तरी प्रत्यक्ष निकालाशी साधर्म्य सांगणारे असतात. गत लोकसभा आणि ताज्या हरयाणा विधानसभा निवडणूक निकालाने मात्र एक्झिट पोल करणाऱ्या प्रत्येकच संस्थेला तोंडघशी पाडले आहे. लोकसभा निवडणूक निकालाचे जवळपास अचूक भाकीत वर्तविलेले पूर्वाश्रमीचे पोल पंडित योगेंद्र यादव हेदेखील हरयाणाच्या आखाड्यात पार चीतपट झाले. प्रत्येक एक्झिट पोलचा निष्कर्ष काॅंग्रेसला स्वबळावर दणदणीत बहुमत मिळेल आणि भारतीय जनता पक्षाचा आकडा ३० च्या आसपास असेल, असाच होता. मतमोजणीचे प्रारंभिक कल हाती आले, तेव्हा प्रत्यक्ष निकालही तसाच असेल, असे वाटत होते; पण जसजसा दिवस चढत गेला, तसतसे काॅंग्रेस नेत्यांसोबतच पोल पंडितांचे चेहरेही कोमेजत गेले अन् कमळासोबत भाजप नेत्यांचे चेहरे फुलत गेले! 

गत वर्षभरात एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकण्याची ही चौथी वेळ आहे. गतवर्षाच्या अखेरीस पार पडलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतही एक्झिट पोल करणाऱ्या संस्था तोंडघशी पडल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणूक आणि आता हरयाणा विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. नाही म्हणायला जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक निकाल आणि एक्झिट पोलचे निष्कर्ष बव्हंशी सारखे असल्याने पोल पंडितांची थोडीफार तरी लाज राखली गेली. 

आता नेहमीप्रमाणे एक्झिट पोलचे निष्कर्ष का चुकतात, याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्या संस्था ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल करतात, त्याच संस्थांच्या प्रमुखांनी अनेकदा अशा चर्चांमध्ये भाग घेतला आहे. अशा चर्चांमधील एक समान धागा हा आहे की, एक्झिट पोल मतांच्या संभाव्य टक्केवारीचे भाकीत बव्हंशी अचूक वर्तवू शकतात; परंतु त्या टक्केवारीचे जागांमध्ये रूपांतर करणे हे फार किचकट काम आहे. विशेषतः काट्याच्या लढतीत, तर ते फारच जिकिरीचे असते. हरयाणात नेमके तेच झाले. भाजप आणि काॅंग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय फरक दिसत असला, तरी उभय पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत मात्र अगदी थोडा फरक आहे. पोल पंडित त्यामुळेच तोंडघशी पडले असावेत. बहुधा यामुळेच काही विकसित देशांमध्ये एक्झिट पोल केवळ मतांची संभाव्य टक्केवारी सांगतात, जागांचे भाकीत वर्तवीत नाहीत! 

मतांच्या संभाव्य टक्केवारीचे गणित मांडताना, स्वत:ची बाजू उच्चरवात मांडणाऱ्या समाजघटकांना झुकते माप देण्याची आणि तुलनेत कमजोर समाजघटकांकडे दुर्लक्ष करण्याची चूक पोल पंडित नेहमीच करतात. हरयाणात इतरांच्या तुलनेत मोठा असलेला जाट समाज भाजपविरोधात आक्रमक होता. त्या समाजाचा आवाज हा संपूर्ण हरयाणाचा आवाज असल्याचे समजण्याची चूक जशी काॅंग्रेस नेतृत्वाने केली, तशीच ती पोल पंडितांनीही केली असल्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत कमकुवत समाजघटक सार्वजनिक व्यासपीठांवर व्यक्त न होता, गुपचूप एकत्र येत, त्यांच्या भावना मतपेटीच्या किंवा मतदान यंत्राच्या माध्यमातून व्यक्त करीत असतात. लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्वास नडलेल्या भाजप नेतृत्वाने ते अचूक हेरले आणि गैर जाट समाजघटकांना सांधण्याचे प्रयत्न कोणताही गाजावाजा न करता केले. अशा मतदारांनी एक्झिट पोलच्या वेळी भीतीपोटी अथवा अन्य कारणांमुळे त्यांचा कल स्पष्टपणे नमूद केला असेलच असे नाही. तसे झाले असल्यास पोल पंडितांना तरी चुकीचे कसे ठरवणार? 

जातनिहाय जनगणना आणि राज्यघटनेचे अस्तित्व या दोन मुद्द्यांच्या आधारे विरोधी पक्ष प्रयत्नपूर्वक मोट बांधलेल्या हिंदू मतपेढीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कमकुवत समाजघटकांना भाजपकडे वळविण्याचे, मतदानासाठी बाहेर काढण्याचे काम केले असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय ‘अब की बार, चार सौ पार’ या नाऱ्यामुळे निर्धास्त होऊन लोकसभा निवडणुकीत मतदानाला बाहेर न पडलेला भाजपचा परंपरागत मतदारही यावेळी हिरीरीने मतदानासाठी पोहोचला असावा. या सर्व घडामोडी समजून घेण्यात पोल पंडित कमी पडले असण्याची दाट शक्यता आहे. अनेक जाटबहुल मतदारसंघांमध्ये जाट मते काॅंग्रेस आणि आणि प्रभावशाली अपक्ष उमेदवारांमध्ये विभागली गेली आणि गैर जाट मतांच्या आधारे भाजप उमेदवार विजयी झाले, असे निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना लक्षात येते. त्यासाठी भाजपच्या चाणक्यांनी खेळी केली असल्यास, ती समजून घेण्यात पोल पंडित अपयशी ठरले, हे स्पष्ट आहे. 

आता पोल पंडित त्यांच्या परीने त्यांच्या अपयशाचे आकलन करतीलच; पण पाश्चात्य देशांमध्ये बऱ्यापैकी यशस्वी ठरलेले एक्झिट पोल भारतात, मात्र मुळे रुजवू शकले नाहीत, हे आता मान्य केलेच पाहिजे. केवळ मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज वर्तवून पोल पंडित भविष्यात तोंडघशी पडण्यापासून वाचू शकतात; पण एक्झिट पोलचे मुख्य आश्रयदाते असलेल्या वृत्त वाहिन्या त्यांना तसे करू देतील का? 
    ravi.tale@lokmat.com
(काही अपरिहार्य कारणामुळे हरीश गुप्ता यांचा साप्ताहिक स्तंभ आजच्या अंकात नाही.)

 

Web Title: haryana assembly election 2024 result and exit polls became unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.